‘बाहेरील’ उमेदवाराविरोधात ‘स्थानिक’ उमेदवाराचे पारडे जड!
>>देवेंद्र भगत
मुंबईचे प्रवेशद्वार असलेल्या उत्तर मुंबई मतदारसंघात गेल्या दहा वर्षांपासून भाजपचा खासदार असताना नागरिकांच्या समस्या जैसे थेच आहेत. यातच भाजपने मतदार संघाबाहेरील पियूष गोयल यांना उमेदवारी दिल्याने महाविकास आघाडीकडून निवडणुकीच्या रिंगणात असणारे काँग्रेसचे स्थानिक उमेदवार भूषण पाटील यांचेच पारडे जड आहे. स्थानिकांचे प्रश्न, नागरी समस्या, वाहतुकीच्या समस्या, रखडलेला पुनर्विकास असे महत्त्वाचे प्रश्न सोडवण्यासाठी स्थानिक नेताच योग्य असल्याची भावना मतदारांकडून व्यक्त होत आहे.
उत्तर मुंबईत सलग दोन वेळा खासदार म्हणून निवडून आलेले गोपाळ शेट्टी यांना भाजपने डावलून पियूष गोयल यांना माथी मारल्याने खुद्द भाजपच्याच कार्यकर्त्यांमध्ये असंतोष आहे. त्यामुळे तिकीट नाकारल्यानंतर खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गोपाळ शेट्टी यांच्या घरी जाऊन समजूत काढण्याची वेळ आली होती. त्यामुळे गोपाळ शेट्टी यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली नसली तरी त्यांचे कार्यकर्ते पियूष गोयल यांना किती मदत करतात हा खरा प्रश्न आहे. विशेष म्हणजे उमेदवारी मिळाल्यानंतर पियूष गोयल यांनी बोरिवलीत घर घेऊन राहण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या ‘स्थानिक’ होण्याच्या प्रयत्नांना जनता भुलणार नाही, असेही बोलले जात आहे.
दहा वर्षे भाजपची सत्ता असूनही समस्या जैसे थे!
उत्तर मुंबई मतदारसंघ गेली सलग दहा वर्षे भाजपच्या ताब्यात आहेत. असे असताना रहिवाशांना अजूनही नागरी समस्यांचा सामना करावा लागला आहे. गोराईसारख्या भागात साधे रस्ते-पाणी अशा सुविधांची वानवा आहे. झोपडपट्टी आणि उत्तुंग इमारती अशी संमिश्र वस्ती असलेल्या या भागात भाजपचे सहापैकी चार आमदार आहेत. यामध्ये मनीषा चौधरी, योगेश सागर, अतुल भातखळकर आणि सुनील राणे यांचा समावेश आहे. मात्र चार आमदार असूनही स्थानिकांचे प्रश्न जैसे थेच असल्याने दहा वर्षांनंतरही भाजपकडून जुन्याच समस्या सोडवण्याचे आश्वासन मतदारांना दिले जात आहे. त्यामुळे भाजपच्या या खेळीला मतदार प्रतिसाद देणार नाही, अशीच स्थिती आहे.
शिवसेना, महाविकास आघाडीची ताकद
भाजपचे उमेदवार पियूष गोयल हे उच्च विद्याविभूषित असले तरी ते पहिल्यांदाच लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत. तर महाविकास आघाडीचे उमेदवार काँग्रेसचे भूषण पाटील हे स्थानिक नेते असून गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. उत्तर मुंबईत त्यांनी काँग्रेसची धुरा यशस्वीपणे सांभाळली असून त्यांनी विधानसभा निवडणूकही याआधी लढवल्याने त्यांना अनुभवदेखील आहे. ‘बेस्ट’ समिती सदस्यपदावरही त्यांनी काम केले आहे. यातच शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मोठी ताकद या मतदारसंघात असल्याने त्यांना प्रचंड मोठा प्रतिसाद मिळत आहे. शिवाय एपूणच महाविकास आघाडी असल्याने भूषण पाटील यांचा विजय निश्चित मानला जात आहे.
असे आहेत मतदार
मराठी | 5,50,700 | 31 टक्के
गुजराती/राजस्थानी | 4,86,700 | 28 टक्के
उत्तर भारतीय | 3,61,200 | 21 टक्के
मुस्लीम | 1,57,500 | 9 टक्के
ख्रिश्चन | 53,000 | 3 टक्के
सिंधी/इतर | 34,300 | 2 टक्के
एकूण – 17,61,000
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List