प्रासंगिक – ‘होरायझन’

प्रासंगिक – ‘होरायझन’

>> डॉ. गजानन शेपाळ

ज्येष्ठ चित्रकार आणि दृश्यकला लेखक मल्लिकार्जुन सिंदगी यांच्या निवडक पेंटिंग्जच्या ‘होरायझन’ प्रदर्शनाचे उद्घाटन आज मुंबईतील जहांगीर कला दालनात होत आहे. 20 मे 2024 पर्यंत हे प्रदर्शन सुरू असेल. त्यानिमित्त चित्रकार सिंदगी आणि त्यांच्या चित्रकलेचा परिचय करून देणारा लेख…

‘मल्लिकार्जुन सिंदगी’ या नावाने महाराष्ट्रातील सुमारे दोन दशकांचे कलाक्षेत्र गाजवले. ‘गाजवले’ हा शब्द एवढय़ाचसाठी की, महाराष्ट्रातील कलाध्यापकांचे न सोडवले जाणारे प्रश्न, महाराष्ट्रातील लंगडय़ा (?) ‘कला शिक्षणा’चा अभ्यासक्रम आणि महाराष्ट्रातील ‘दृश्य कला शिक्षणास’ विशेषतः महाविद्यालयीन स्तरावरील कला शिक्षणात आवश्यक असणाऱया सुधारणा, त्रुटींचं निराकरण आणि प्राथमिक-माध्यमिक कलाध्यापकांना मिळणारी कमीपणाची वागणूक…या व अशा अनेक सार्वजनिक प्रश्नांवर ‘सिंदगी’ यांनी आग्रही मते मांडून अनेकांची ‘जिंदगी’ उभी केली.

‘व्यवसायात खोटं बोलावं लागतं’ हे काही मनाला पटलं नाही म्हणून पारंपरिक व्यवसायाची पार्श्वभूमी असतानादेखील मल्लिकार्जुन सिंदगी यांनी स्वतःला आवडणाऱया ‘चित्रकला’ विषयाची कास धरली. त्यातूनच त्यांनी सोलापुरात म्हेत्रे सरांच्या मार्गदर्शनातून पायाभूत अभ्यासक्रम पूर्ण केला. पुढे पुणे गाठले. कारण लहानपण आई-वडिलांविना पोरकेपणात गेल्यामुळे ‘तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या उक्तीनुसार त्यांनी पुणे गाठून ‘कला शिक्षण प्रशिक्षण’ हा अभ्यासक्रम पूर्ण केला. पुण्यातच ते रमले. पुण्याच्या सुशीलाबाई वीरकर हायस्कूलचे मुख्याध्यापक कमलाकर यशवंत घळसाशी यांच्या शिफारसीवर कलाध्यापकाची नोकरी सुरू केली.

एक नव्हे, दोन नव्हे तब्बल 14 भाषा अवगत असणारे सिंदगी यांना मुळातच बोलायची आवड असल्याने त्यांना ‘विद्यार्थीप्रिय शिक्षक’ हे मानाचे विशेषण लाभले. तब्बल 37 वर्षे कलाध्यापन करणाऱया कलायोगी सिंदगी सरांनी सेवानिवृत्तीनंतर आणखीनच जोमाने समाजकारण केले. गरजवंतांना मदत करणे हा तर त्यांचा स्थायीभावच…!

2018 च्या लॉकडाऊनमध्ये त्यांचा जणू दुसराच जन्म झाला. आताचे आयुष्य हे बोनस आहे, असे मानून त्यांनी त्यांच्यात इतकी वर्षे कोशात अडकलेल्या चित्रकारास बाहेर काढले. कागदं बोलायला लागली, निसर्गातील सौंदर्याबाबतच्या चित्रात्मक कथा रंगायला लागल्या, कॅनव्हास ‘रंगपंचमी’ साजरी करू लागले. या साधकाने तब्बल 65 हजार स्केचेस साकारले, ज्यातून त्यांना पेंटिंग्जचे विषय ध्यानात येऊ लागले आणि पाहता पाहता सुमारे साडेचारशे ते पाचशे कॅनव्हास हे रंगसाज लेवून श्रीमंत झाले. आता पुढे काय? हा प्रश्न आकार घेत असतानाच निवडक पेंटिंग्जचे मुंबईच्या जहांगीर कला दालनात प्रदर्शन आयोजित करून पेंटिंग्ज साकारतानाचा अनुभव, तो आनंद जो स्वतःने घेतला, तोच आनंद समस्त आदरणीय कलारसिकांना लाभावा या भावनेतून त्यांनी ‘होरायझन’ दृष्टिक्षेपात आणले. 14 मे ते 20 मे 2024 च्या सप्ताहात जहांगीर कला दालनाच्या तिसऱया गॅलरीत सिंदगींचे ‘होरायझन’ पाहायला मिळणार आहे. यामध्ये त्यांची अमूर्त शैलीतील तरीही सर्वसामान्य कलारसिकांशी ‘मूर्त संवाद’ साधू शकणारी पेंटिंग्ज पाहायला मिळतील. त्यात त्यांचे कुंचल्याचे फटकारे, त्या फटकाऱयांमधील सिंदगींचा आत्मविश्वास आणि निसर्गातील बारकाव्यांच्या नोंदी घेत त्यांना त्यांच्या कॅनव्हासचा ‘चित्रविषय’ बनविलेले पाहताना पाहणारा थक्क झाला नाही तरच नवल!

[email protected]

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;