हिंदुत्ववादी नेत्यांना धमकीप्रकरणी गुजरात पोलिसांकडून तरुणाला अटक; मोबाईलचा पुरावा नष्ट केल्याने गूढ वाढले
देशातील काही हिंदुत्ववादी नेत्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी गुजरात मध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यात सुरत क्राईम ब्रान्चच्या विशेष पथकाने नरसी येथील एका युवकास चौकशीसाठी ताब्यात घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे. प्राथमिक तपासात या युवकाने आपला मोबाईल नष्ट केल्याची माहिती समोर आल्याने “त्या” संपूर्ण प्रकरणात याची नेमकी भूमिका काय ? याविषयीचे गूढ मात्र कमालीचे वाढले आहे.
पोलीस सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहिती नुसार पाकिस्तान मधून चालविण्यात येणाऱ्या जैश बाबा नावाच्या व्हॉटसॅप ग्रुपमध्ये गुजरात, बिहार मधील काही युवक सामील होते.या व्हॉटसॅप ग्रुपच्या माध्यमातून हिंदूविरोधी, भडकाऊ संदेश पाठवले जात होते.तसेच हिंदुस्थानातील काही प्रमुख सनातनी, हिंदुत्ववादी नेते, न्यूज चॅनलचे पत्रकार यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने कट रचण्याबाबत चॅटिंग केली जात होती. दरम्यान या प्रकरणाचा पर्दाफाश करत सुरत पोलिसांनी काही आरोपीना अटक करून गुन्हा दाखल केला होता.संबंधित व्हॉटसॅप ग्रुप, आरोपीचे इतर चॅटिंग तपासले असता धक्कादायक गोष्टी उघड झाल्या.आरोपी सोबतच्या व्हॉटसॅप चॅटिंग मध्ये नरसी येथील शेख शकील शेख सत्तार या युवकाचा सहभाग समोर आल्याने त्याच्या शोधात सुरत क्राईम ब्रँचची एक टीम रविवारी नरसीत आली होती.
सुरत पोलिसांच्या मदतीला नांदेड क्राईम ब्रँचचे अधिकारी, रामतीर्थ पोलीस देखील सोबत होते.पोलिसांच्या पथकाने शेख शकील शेख सत्तार (20) यास ताब्यात घेवून येथील चौकीत काही प्रश्न विचारत झाडाझडती घेतली. तसेच पुढील तपासकामी सोबत घेवून येथून रवाना झाले. शकीलने आपला मोबाईल नष्ट केल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले असून रामतीर्थ पोलिसांनी यास दुजोरा दिला आहे. त्यामुळे त्या मोबाईल मध्ये नेमकी काय माहिती होती याचे गूढ मात्र कमालीचे वाढले असून सुरत मध्ये दाखल त्या गुन्ह्याच्या प्रकरणात शेख शकीलचा नेमका रोल काय होता ही बाब येत्या काही दिवसात स्पष्ट होणार असली तरीही तूर्त नरसी येथील वातावरण मात्र अनेक तर्कवितर्कांनी ढवळून निघाले आहे.सोमवारी नांदेड येथील विशेष पथकाने नरसीत येवून सदर युवकाच्या कुटुंबाची पार्श्वभूमी जाणून घेतल्याचे कळते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List