महिन्याभरात दोन वेगवेगळ्या मतदारसंघात मतदान करण्याचा चमत्कार, चंद्रपुरातील मतदानाची चर्चा
लोकसभा निवडणुकीत चंद्रपूर क्षेत्रासाठी मतदान करणारे मतदार आज पुन्हा चौथ्या टप्प्यासाठी मतदान करीत आहेत. एकाच निवडणुकीत दोनदा मतदान होणार आहे.
तेलंगणातील आदिलाबाद लोकसभा मतदारसंघात आज चौथ्या टप्प्याचे मतदान सुरू आहे. आणि यात मतदान करण्यासाठी रांगेत लागलेले हे मतदार आहेत चंद्रपूर जिल्ह्यातील. याच मतदारांनी पहिल्या टप्प्यात म्हणजे 19 एप्रिल रोजी महाराष्ट्रातील चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत मतदान केले आहे. महिनाभरात एकाच निवडणुकीत दोन वेगवेगळ्या मतदारसंघात मतदान करण्याचा चमत्कार घडला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती या दुर्गम तालुक्यातील साडेबारा गावे तेलंगणा सीमेला लागलेली आहेत. या गावांवर तेलंगणा आपला अधिकार सांगत आला आहे. पण ही गावे मूळ महाराष्ट्रात आहेत. दूरवर असलेली ही गावे नेहमीच विकासापासून, शासकीय योजनांपासून दूर राहिली आहेत. याचा फायदा घेत तेलंगणा सरकारने या लोकांना रेशन कार्ड, मतदान पत्र, अंगणवाडी, शाळा, वीज अशा सुविधा देत आपल्याप्रती सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न चालवला आहे. येथील लोकांना स्वतःचा फायदा दिसत असल्याने ते दोन्ही राज्यातील योजनांचा लाभ उचलत आहेत.
स्वस्त धान्य असेल, घरकुल योजना असेल किंवा इतर योजना असतील, याचा लाभ ते घेत आहेत. मतदानसुद्धा ते दोन्ही राज्यात करतात. तेलंगणातील प्रत्येक निवडणुकीत येथील लोक सहभाग घेतात. या साडेबारा गावात एकूण 5 हजार 117 मतदार आहेत. या प्रत्येकाकडे दोन मतदार ओळखपत्र, रेशन कार्ड, आधार आहे. आज तेलंगणातील आदिलाबाद लोकसभा मतदारसंघात निवडणूक होत आहे. त्यासाठी गावकऱ्यांनी हजेरी लावली आहे.
सीमावर्ती साडेबारा गावे
येसापूर
अंतापूर
पद्मावती
इंदिरानगर
पलसगुडा
लेंडीगुडा
वेलापठार
नारायणगुडा
परमडोली
शंकरलोधी
महाराजगुडा
लेंडीजाडा
कोठा
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List