28 हजारांहून अधिक हॅण्डसेट होणार ब्लॉक; 20 लाखांहून अधिक मोबाईलचे व्हेरिफिकेशन
सायबर गुन्हेगारीला आळा घालण्याच्या दृष्टीने एक मोठे पाऊल उचलत दूरसंचार विभागाने 28,200 मोबाईल हॅण्डसेट ब्लॉक करण्याचे आणि सुमारे 20 लाख मोबाईल कनेक्शनची पुन्हा पडताळणी करण्याचे निर्देश दिले आहेत. सायबर गुन्हे आणि ऑनलाईन घोटाळय़ांमध्ये टेलिकॉम स्रोतांचा होणारा वापर रोखण्यासाठी व फ्रॉड नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी दूरसंचार विभागाने गृह मंत्रालय, राज्य पोलीस यांच्या सहकार्याने हे पाऊल उचलले आहे.
सायबर गुह्यांमध्ये सिमकार्ड आणि मोबाईल हॅण्डसेटचा वापर होतो असे सिमकार्ड 31 मेपर्यंत ब्लॉक करण्याचे आदेश दूरसंचार विभागाने टेलिकॉम ऑपरेटर्सना दिले आहेत. अशा सिमकार्डच्या मदतीने कोटय़वधी रुपयांची फसवणूक झाल्याचे दूरसंचार विभागाचे मत आहे. हे सिमकार्ड पुन्हा व्हेरिफाय केले जातील आणि पडताळणी होईपर्यंत ब्लॉक केले जातील.
कोणत्याही प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी दूरसंचार विभागाने नागरिकांना त्यांच्या जुन्या मोबाईल कनेक्शनची पुन्हा पडताळणी करण्यास सांगितले आहे. त्यामुळे सायबर गुन्हेगारांना आळा बसेल, असे सायबर सुरक्षा तज्ञांचे म्हणणे आहे.
टेलिकॉम ऑपरेटरच्या कार्यालयात व्हेरिफिकेशन
सिमकार्ड पडताळणी प्रक्रिया येत्या 1 ते 30 जूनपर्यंत चालेल, असे दूरसंचार विभागाने म्हटले आहे. टेलिकॉम ऑपरेटरच्या कार्यालयात जाऊन तुम्ही तुमचा नंबर व्हेरिफाय करू शकाल. हे पाऊल देशातील दूरसंचार यंत्रणा मजबूत करण्यासाठी उपयुक्त ठरेल, असे दूरसंचार विभागाने म्हटले आहे.
सायबर गुह्यांसाठी आणि घोटाळय़ांसाठी वापरले जाणारे हजारो हॅण्डसेटही ब्लॉक केले जात आहेत. अशा हॅण्डसेटमध्ये आता कोणतेही सिमकार्ड वापरता येणार नाही.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List