कितीही पैशांचा पाऊस पाडू द्या, मोदींचा पराभव निश्चित; संजय राऊत यांनी डागली तोफ
राज्यात मतदान असलेल्या ठिकाणी भाजपकडून पैशांचे वाटप करण्यात आले. त्याचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. हे आरोप नसून हे सर्व उघडपणे दिसत आहे. मात्र, निवडणूक आयोगा आणि सर्व तपास यंत्रणा डोळ्यांवर पट्टी बांधून बसल्या आहेत, असा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. तसेच त्यांना ऐन उन्हाळयात कितीही पैशांचा पाऊस पाडू द्या, नरेंद्र मोदी यांचा पराभव निश्चित आहे, असा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला.
राज्यात आज ज्या ठिकाणी मतदान होत आहे, त्यात छत्रपती संभाजीनगर, पुणे या जागांचा समावेश आहे. यासह आज मतदान असलेल्या ठिकाणी पैशांचे वाटप, पैशांची देवाण-घेवाण, आवक-जावक स्पष्ट दिसत आहे. हे आरोप नसून हे वास्तव समोर दिसत आहे. या विरोधात रवींद्र धंगेकर पोलीस ठाण्यात ठिय्या देत बसले आहेत. नरेंद्र मोदी यांनी फक्त ज्ञान देऊ नये, राज्यात काय सुरू आहे, ते बघावे. देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्री आहेत, त्यांनी कायदा-सुव्यवस्थेकडे लक्ष द्यावे, कायद्याची बूज राखावी, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
नगरमध्ये खुलेआम पैसे वाटताना जनतेने विखे पाटलांच्या चिरंजीवांना पकडले आहे. हे सर्व स्पष्ट झाले आहे. रायगडमध्येही तेच झाले आहे. आपण मुख्यमंत्र्यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ते नाशिकमध्ये दोन तासांसाठी आले होते. त्यावेळी त्यांच्या सुरक्षा रक्षकांच्या हातात मोठ्या बॅगा दिसत आहेत. त्यात 500 सूट आहेत की सफारी आहेत, असा सवाल करत संजय राऊत यांनी टोला लगावला. त्या बॅगा कसल्या आहेत, कोणत्या हॉटेलमध्ये गेल्या. तिथून त्याचे वाटप कोणाला झाले, याचे व्हिडीओही आम्ही लवकरच देणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री खाऊ घेऊनआलेतोक्षण!
नाशिक मध्ये रात्रीस खेळ चाले. नुसता पै पाऊस…
दोन तासांच्या दौऱ्या साठी इतक्या जड बॅगा पोलिस का वाहातआहेत?
यातून कोणतामाल नासिकला पोहचला?
निवडणूकआयोग फालतू नाकाबंदीआणि झडत्या करत आहे.महाराष्ट्रात अधिकृत बॅगा वाटप सुरुआहे.
@ECISVEEP pic.twitter.com/2gOaPxVeZm— Sanjay Raut (@rautsanjay61) May 13, 2024
आमच्या गाड्या, हेलिकॉप्टर तपासण्यात येते. आमची झाडाझडती घेता, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या हेलिकॉप्टरचीही तपासणी करण्यात आली. सांगलीत आमच्या गाड्या आणि हेलिकॉप्टर तपासण्यात आले. नाकाबंदी करण्यात येते. मात्र, नरेंद्र मोदी, अमित शहा, भाजपचे मंत्री, मुख्यमंत्री मोठ्या बॅगा खोके नेते आहेत. त्यांची तापसणी कोणी करायची, असा सावलही राऊत यांनी केला. निवडणूक आयोगाला हे दिसत नाही काय, त्यांच्या डोळ्यावर झापड आले काय, आमचे फोन रेकॉर्ड करणाऱ्या कर्तव्यदक्ष पोलीस महासंचालिका गॉगल लावून बसल्या आहेत काय, असा सवाल त्यांनी केला.
असे सर्व घडत असताना ईडी चांगल्याप्रकारे काम करत आहे, असे मोदी सांगतात. मात्र, ईडी ही मोदींची गँग, लुटारू टोळी आहे. हे ईडीला दिसत नाही काय. पैसे वाटप होत असताना ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स उन्हाळ्यात राज्यात पैशांचा पाऊस पडत आहे. त्यांना कितीही पैशांचा पाऊस पाडू द्या, मोदींचा पराभव निश्चित आहे. भाजपकडे विकासाचा मुद्दाच नाही. मोदी विकासावर किंवा देशावर बोलले आहेत काय? बारामतीत अजित पवार यांच्या नियंत्रणातील बँका रात्रभर पैसे वाटपासाठी सुरू होत्या. निवडणूक आयोगाला हे दिसत नाही काय, असा सवालही त्यांनी केला. मुख्यमंत्र्यांचा व्हिडीओतून स्पष्ट होत आहे. त्या नऊ बॅगांमध्ये काय होते. त्या बॅगांमधून सुमारे 12 ते 15 कोटी रुपये नाशिकमध्ये उतरवण्यात आले. त्यानंतर विविध ठिकाणी त्याचे वाटप झाले. याबाबतचे पुरावे आम्ही देणार आहोत, असेही संजय राऊत यांनी सांगितले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List