डुकराची किडनी बसवलेल्या व्यक्तीचे निधन
दोन महिन्यांपूर्वी अमेरिकेत रिचर्ड स्लेमन यांच्या शरीरात डुकराच्या किडनीचे प्रत्यारोपण करण्यात आले होते. डुकराची किडनी मिळवणारा पहिला व्यक्ती म्हणून इतिहास रचणाऱया रिचर्ड स्लेमन यांचे शनिवारी निधन झाले.
मॅसॅच्युसेट्सच्या जनरल हॉस्पिटलमध्ये 62 वर्षीय रिचर्ड स्लेमन यांच्यावर डुकराची किडनी ट्रान्सप्लांट सर्जरी झाली होती. चार तास ही शस्त्रक्रिया झाली होती. तेव्हा डॉक्टरांनी अंदाज व्यक्त केला होता की, त्यांच्या शरीरात डुकराची किडनी किमान दोन वर्षे तरी टिकेल, मात्र तसे झाले नाही. स्लेमन यांच्या मृत्यूचे कारण समजलेले नाही. डॉक्टरांच्या मते किडनी ट्रान्सप्लांट संबंधित कारणांमुळे त्यांचा मृत्यू झालेला नाही.
2018 मध्ये स्लेमन यांना किडनीचा त्रास सुरू झाल्यानंतर त्यांच्यात मानवी किडनीचे प्रत्यारोपण करण्यात आले, मात्र गेल्या वर्षी स्लेमन यांनी पुन्हा किडनीचा त्रास सुरू झाला तेव्हा स्लेमन यांनी डुकराच्या किडनीचे प्रत्यारोपण करावे, असे डॉक्टरांनी सुचवले. स्लेमन यांच्या निधनाने जनरल हॉस्पिटलच्या टीमने दुःख व्यक्त केले. एका निवेदनाद्वारे स्लेमन यांच्या कुटुंबीयांनी डॉक्टरांचे आभार मानले. डॉक्टरांनी केलेल्या झेनोट्रान्सप्लांटमुळे आमच्या कुटुंबाला रिक यांच्यासोबत आणखी सात आठवडे राहायला मिळाले. त्या काळातील आठवणी सदैव आमच्या हृदयात राहतील, असे कुटुंबीयांनी म्हटले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List