रायबरेलीत अमित शहा यांच्या सभेत पत्रकाराला लाथाबुक्क्यांनी मारहाण; सभेसाठी पैसे दिले होते का? विचारताच हल्ला
रायबरेली येथे पेंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सभेला येण्यासाठी आम्हाला 100 रुपये देण्यात आल्याचे सभामंडपाबाहेर काही महिलांनी राघव त्रिवेदी नावाच्या पत्रकाराला सांगितले. ही गोष्ट खरी आहे का असे त्याने सभेदरम्यान भाजपच्या कार्यकर्त्यांना विचारले. त्यामुळे संतापलेल्या तब्बल 40 ते 50 कार्यकर्त्यांच्या जमावाने राघवला अक्षरशः लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच अश्लाघ्य भाषेत शिवीगाळही केली.
याप्रकरणी स्टेशन हाऊस ऑफिसर राजेश सिंह यांनी सांगितले की, गृहमंत्र्यांच्या रॅलीनंतर त्रिवेदी यांना काही लोकांनी मारहाण केल्याचा आरोप केला आहे या संजीत साहनी यांच्या तक्रारीच्या आधारे एफआयआर दाखल करण्यात आला आहे. काँग्रेस नेते आणि छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनीही रुग्णालयात जाऊन त्रिवेदी यांची भेट घेतली.
पोलिसांची बघ्याची भूमिका
राघवला मारहाण होत असताना त्याने पोलिसांकडे मदतीसाठी याचना केली. पण, पोलिसांनी केवळ बघ्याचीच भूमिका घेतली. राघवने पत्रकारांकडेही मदत मागितली. पण, राघवचा पॅमेरामन आणि इतर पत्रकार तिथून पळून गेले. राघवला मारहाण होतच राहिली. त्यानंतर राघवला व्यासपीठाच्या मागे काsंडून ठेवण्यात आले. त्यानंतर पुन्हा बाहेर काढून दूर नेऊन आणखी मारहाण करण्यात येणार होती. तितक्यात राघव बेशुद्ध झाला. त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
प्रियंका गांधी यांची संतप्त टीका
राघव त्रिवेदी यांना भाजपच्या लोकांनी बेदम मारहाण केली. गृहमंत्री बोलत राहिले आणि पोलीस निःशब्द होऊन बघत राहिले. रॅलीत सहभागी होण्यासाठी पैसे दिल्याचे सांगणाऱया काही महिलांशी बोलल्यामुळेच त्यांना मारहाण करण्यात आली, अशी संतप्त टीका एक्सवर काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी हिंदीत केली आहे.
राहुल गांधी यांनी दिला पत्रकाराला पाठिंबा
शहा यांच्या रॅलीत मारहाण झालेल्या धाडसी पत्रकाराच्या पाठीशी त्यांचा पक्ष उभा आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली प्रेस स्वातंत्र्याच्या बाबतीत भारत 159 व्या क्रमांकावर का आहे हे देशाच्या गृहमंत्र्यांच्या सभेत कष्टाळू पत्रकाराविरुद्ध पोलिसांच्या संरक्षणात झालेल्या या गुंडगिरीमुळे स्पष्ट होते, असे राहुल गांधी यांनी एक्सवरील हिंदीत केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
मुल्ला म्हणून हिणवले
राघवच्या दाढीमुळे त्याला कार्यकर्त्यांनी मुल्ला म्हणून हिणवले, असे राघवने सांगितले. तसेच मी मुल्ला नाही. पण, मुल्ला असणे गुन्हा आहे का? असा सवालही राघवने पत्रकारांशी बोलताना केला.
100 ते 150 ठोसे पोटात मारले
राघवला रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यावेळी त्याला नीट बोलताही येत नव्हते. त्याच्या पोटात 40 ते 50 कार्यकर्त्यांनी तब्बल 100 ते 150 ठोसे पोटात मारल्याचे राघवने सांगितले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List