आमचा उमेदवार चोरला, NOTA दाबा, भाजपला धडा शिकवा; इंदूरमध्ये काँग्रेसचे जनतेला आवाहन
मध्य प्रदेशातील इंदूर लोकसभा मतदारसंघ राजकीय घडामोडींमुळे सध्या चर्चेत आला आहे. इंदूर मतदारसंघात काँग्रेसने उमेदवारी दिलेले अक्षय कांती बम यांनी अखेरच्या क्षणी उमेदवारी मागे घेतली. त्यानंतर त्यांनी भाजपत प्रवेश केला. या मतदारसंघात भाजप आणि काँग्रेसमध्ये मुख्य लढत होती. मात्र बम यांनी अर्ज मागे घेतल्याने भाजपचा फायदा झाला आहे. भाजपने फोडाफोडीचे राजकारण केले असून त्यांना धडा शिकवण्यासाठी ईव्हीएमवरील नोटाचे बटण दाबा, असे आवाहन काँग्रेसने जनतेला केले आहे.
इंदूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार अक्षय कांती बम यांनी शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज मागे घेत भाजपशी हातमिळवणी केली. त्यामुळे काँग्रेसला मोठा फटका बसला आहे. आता रिंगणात काँग्रेसचा उमेदवार नसल्याने काँग्रेसने नोटासाठी जोरदार प्रचार सुरु केला आहे. 13 मे रोजी ‘नोटा’समोरील बटण दाबा आणि भाजपला धडा शिकवा असे आवाहन काँग्रेसने मतदारांना केले आहे.
आमचा पक्ष कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा देणार नाही. मात्र, भाजपला धडा शिकवण्यासाठी जनतेने नोटा मतांचा विक्रम करावा, असे काँग्रेसने म्हटले आहे. काँग्रेसचा उमेदवार काही लोकांनी चोरला आहे. त्या लोकांनी तुमचा मतदानाचा हक्क हिरावून घेतला आहे. या चोरांना धडा शिकवायचा असेल तर नोटा बटण दाबा आणि लोकशाही वाचवा, असे काँग्रेसने म्हटले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List