तुमच्यासारख्या व्यक्तीसोबत बसणे हेदेखील पाप; ममता बॅनर्जींकडून राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी
पश्चिम बंगालचे राज्यपाल सी.व्ही. आनंद बोस यांच्यावर झालेल्या विनभगांच्या आरोपांवरून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी या प्रकरणी राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच राजनैतिक आणि जबाबदारीच्या पदावर असतानाही अशी कृत्ये करणाऱ्या व्यक्तीसोबत बसणे हेदेखील पाप असल्याचे ममता बॅनर्जी म्हणाल्या. त्यांना आपल्याला कामानिमित्त भेटायचे असेल तर त्यांनी एखाद्या रस्त्यावर भेटायला बोलवावे, तेथे आपण जाऊ. मात्र, त्यांना भेटण्यासाठी राजभवनात जाणार नाही, असेही बॅनर्जी म्हणाल्या.
राज्यपाल सी. व्ही. आनंद बोस यांनी विनयभंगाचे आरोप झाल्यानंतरही त्यांनी राजीनामा का दिला नाही, असा सवाल ममता बॅनर्जी यांनी केला आहे. ते राजीनामा का देत नाही, याचे स्पष्टीकरण त्यांनी जनतेला देण्याची गरज आहे, असेही त्या म्हणाल्या. एका प्रचारसभेत राज्यपालांवर झालेल्या विनयभंगाच्या आरोपांबाबत त्यांनी आक्रमक पवित्रा घेत त्यांच्यावर तोफ डागली. बोस आपल्या पदाचा राजीनामा देत नाहीत तोपर्यंत आपण राजभवनात पाऊल ठेवणार नाही असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.
राज्यपाल म्हणतात की राज्यात ‘दीदीगिरी’ सहन करणार नाही, पण मीच त्यांना सांगते की यापुढे तुमची ‘दादागिरी’ राज्यात चालणार नाही. तुम्ही स्वत:ला कोण समजता? तुम्ही महिलांचा छळ का करता? राज्यपालांविरोधात अशा प्रकारचे आरोप केले जात असतील तर त्यांनी नैतिकतेचे भान ठेवत राजीनामा द्यायला हवा. ते राजीनामा का देत नाही, ते त्यांनी स्पष्ट करावे. राजभवनमध्ये कंत्राटी काम करणाऱ्या एका महिलेने राज्यपालांवर विनयभंगाचा आरोप केला होता. राज्यपाल आनंद बोस यांनी त्यांच्या निवासस्थानी महिलेचा विनयभंग केल्याचे तिने सांगितले. त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी आक्रमक पवित्रा घेत राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List