कपिल पाटलांच्या रॅलीत 3 तरुणांना बेदम मारहाण; पराभवाच्या भीतीने भिवंडीत भाजप कार्यकर्त्यांचा राडा
भाजपचे भिवंडीतील उमेदवार कपिल पाटील यांच्यासमोर महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश म्हात्रे यांनी तगडे आव्हान उभे केले आहे. त्यामुळे पराभवाच्या भीतीने भाजपच्या कार्यकर्त्यांचा अक्षरशः तोल सुटला आहे. कपिल पाटील यांच्या प्रचारासाठी काढलेल्या रॅलीतील टोळक्याने तीन तरुणांना बेदम मारहाण करत त्यांची लुटमारही केली आहे. भिवंडी पश्चिम विधानसभा क्षेत्रातील ताडाळे परिसरात हा धुमाकूळ घातला असतानाच दुसरीकडे अपक्ष उमेदवार नीलेश सांबरे यांच्या चौक सभेला लाईट दिल्याने पद्मानगर भागात पिठाच्या चक्कीवाल्याला चोपत त्याच्या दुकानाची तोडफोड केली. त्यामुळे भिवंडीत भाजपच्या सुरू असलेल्या गुंडगिरीविरोधात मतदारांनी संताप व्यक्त केला आहे.
भिवंडी लोकसभा मतदारसंघातून कपिल पाटील सलग दोन वेळा निवडून आले आहेत. आता तर ते पंचायतराज मंत्री आहेत. असे असताना या मतदारसंघाचा विकास झालेला नाही. शहरी भागात चांगले रस्ते, आरोग्य तसेच रेल्वे प्रवाशांच्या प्रश्नाकडे कानाडोळा केला आहे. ग्रामीण भागातही तीच अवस्था आहे. त्यातच महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश म्हात्रे यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेत कपिल पाटील यांच्यासमोर तगडे आव्हान उभे केले आहे. त्यामुळे भिवंडीत परिवर्तन घडेल अशी चर्चा असल्याने भाजप नेत्यांच्या पायाखालची वाळूच सरकली आहे. त्यातूनच भाजपचे कार्यकर्ते संपूर्ण शहरात दहशत माजवत असल्याचा आरोप होत आहे. कपिल पाटील यांच्या प्रचारासाठी भिवंडी पश्चिम भागातील ताडाळी परिसरात बाईक रॅली काढण्यात आली होती. कपिल पाटील यांचा ताफा पुढे गेल्यानंतर त्यातील पाच ते सहा जणांच्या टोळक्याने आपल्या गाड्या रस्त्यावर आडव्या तिडव्या उभ्या करून रस्ता ब्लॉक केला.
नेमकं काय घडलं?
बाईक रॅलीतील संजू गुप्ता व अन्य भाजप कार्यकर्त्यांनी आपल्या बुलेट गाड्या ताडाळे रस्त्यावर उभ्या केल्या होत्या. त्यावेळी गौरीपाडा भागात राहणारे रोहित उपाध्याय व त्यांचा मित्र यज्ञेश जाधव हे दोघे तेथून दुचाकीवरून आत होते. या दोघांनी गुप्ता व त्याच्या साथीदारांना ‘कृपया तुमच्या गाड्या बाजूला घ्या, आम्हाला जाऊ द्या’ अशी विनंती केली. त्यावर गुप्ता याने हा एरिया माझा आहे, असे सांगत शिवीगाळ करत दोघांना मारहाण केली. त्यावेळी मदतीला आलेल्या नितेश जाधव या तरुणालादेखील भाजपच्या कार्यकत्यांनी गाड्यांना अडकवलेल्या झेंड्याच्या दांडक्यांनी बेदम मारहाण केली. इतकेच नाही तर जाताना गळ्यातील दोन तोळ्याची चेन घेऊन पसार झाले. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गुप्ता पानेदेखील रोहित व यज्ञेश यांच्याविरोधात तक्रार दिली आहे.
माझं हातावरचं पोट.. मला का मारता?
पद्मानगर भागात अपक्ष उमेदवार नीलेश सांबरे यांची चौक सभा होती. यासाठी विद्युत पुरवठा जवळील पीठ गिरणीतून करण्यात आला होता. मात्र कार्यक्रम संपताच भाजपचे साई पिस्के, राकेश एमुल तसेच अन्य कार्यकत्यांनी सोनी याला जाब विचारत मारहाण केली. त्यावर माझं हातावरचं पोट आहे.. माझं नुकसान करू नका अशी विनवणी सोनी यांनी केली. मात्र भाजपच्या कार्यकत्यांनी एक न ऐकता दुकानाची तोडफोड केली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List