‘लंके किस झाडकी पत्ती है’ अजित पवार यांना लवकरच समजेल; रोहित पवार यांचा पलटवार
निलेश लंके किस झाड कि पत्ती है, हे निवडणूक निकालानंतर अजित पवार यांना समजेल. तसेच देवेंद्र फडणवीस आणि मोदी यांनाही लंके यांची ताकद दिसून येईल, असा पलटवार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला. निलेश लंके यांच्या प्रचारासाठी झालेल्या सभेत ते बोलत होते.
या वेळी बोलताना पवार म्हणाले की, हल्ली दादांची भाषा खबपच बदलली आहे. बारामतीच्या निवडणुकीचा हा परिणाम झाला असावा, असा टोलाही त्यांनी लगावला. तुम्ही कितीही मोठे पैलवान असला तरीही शरद पवार हे वस्ताद आहेत. एक डाव हातचा राखूनच वस्ताद शिकवत असतो हे मोठ्या पैलवानाने समजून घ्यावे. तालुक्यातील भगवानगड योजना आम्ही मंजूर केली. मात्र ठेकेदार त्यांच्या विचाराचा असूनही ही योजना अजून का पूर्ण होऊ शकली नाही, असा सवालही त्यांनी केला.
येथील लोकप्रतिनिधींचे ठेकेदार रस्त्यावर मारामाऱ्या करत असल्याने या भागातून खासदार म्हणून लंके तर आमदार म्हणून प्रताप ढाकणे यांना विधानसभेत पाठवावे लागेल. या तालुक्यात पाण्याचे मोठे दुर्भिक्ष असतानाही स्थानिक प्रतिनिधी या विषयवार बोलायला तयार नाहीत. मागील वेळेस विखे हे तुम्हाला पिस्तूल हवे कि विकास अशी भाषा करत होते. मात्र या निवडणुकीत आता ते पिस्तूल घेऊन गाडीत बसले आहेत.लंके यांची मोहटा देवीवर श्रद्धा असून त्यांनी प्रचाराची सुरवात मोहटा देवीगडवरून केली असून आता त्यांच्या विजयाची सभा सुद्धा पाथर्डीत घेण्यासाठी या तालुक्यातून मोठे मताधिक्य लंके यांना द्या, असे आवाहन रोहित पवार यांनी केले.
ही हुकूमशाही विरोधात लोकशाही अशी निवडणूक आहे. फडणवीस हे मोदी यांच्याकडे पाहून मतदान करा, असे सांगतात. मात्र मालक बघून बैल विकला जात नाही हे त्यांनी समजून घ्यावे. लंके यांचा विजय ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. शेतीमालाला सध्या भाव नसून देशाला कृषिमंत्री आहे की नाही, अशी परिस्थिती आहे. जो डाळ, साखर वाटतो तो आमच्याकडे कधीच खासदार होत नाही. त्याला आम्ही रेशन दुकानदार करतो, असा टोलाही त्यांनी विखे यांना लगावला.
यावेळी निलेश लंके म्हणाले की, कोणता पत्ता कधी फेकायचा हे मला चांगले माहित आहे. माझ्यासाठी पालकमंत्र्यांना गल्लीबोळात फिरण्याची वेळ आली आहे. ते डॉक्टर असले तरीही त्यांची डिग्री खोटी असल्याचे त्यांचे चुलते सांगतात. मी भोळा असलो तरीही ठकास ठक आहे. आपला रथ जगन्नाथाचा असून तो आता दिल्लीत पोहचणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List