जुन्नर तालुक्यात तीन बिबटे जेरबंद
पिंपरीपेंढार येथील गाजरपट शिवारात नानुबाई कडाळे या महिलेला ठार करणारे संशयित दोन नरभक्षक बिबटे जेरबंद करण्यात वनखात्याला अखेर यश आले आहे. पिंपळवंडी येथे एक बिबट्या जेरबंद झाल्याने दिवसात तीन बिबटे जेरबंद झाल्याने नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. पिंपळवंडी, उंब्रज, काळवाडी व पिंपरीपेंढार परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला असून, सलग तीनजणांवर हल्ले केले आहेत. बिबट्याने लेंडेस्थळ येथील एक महिलेवर हल्ला करून जखमी केले होते. तर, काळवाडी येथे एक आठ वर्षांचा बालक ‘रुद्र’ बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाला होता.
या दोन्हीही घटना ताज्या असतानाच, काल सकाळी पिंपरीपेंढार येथील एका महिलेवर बिबट्याने हल्ला करून ठार केले होते. या घटनांनंतर वनखात्याने पकडण्यासाठी पिंजरे लावले होते. शुक्रवारी सकाळी लेंडेस्थळ या ठिकाणी लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या पकडला गेला, तर सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास पिंपरीपेंढार या ठिकाणी एक बिबट्या जेरबंद झाला. तर, तासाभरातच घटनास्थळी लावलेल्या पिंजऱ्यात सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास दुसरा बिबट्या जेरबंद करण्यात वनखात्याला यश आले आहे.
दरम्यान, काळवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या रुद्र महेश फापाळे या चिमुरड्याच्या पालकांना दहा लाखांची मदत वन विभागाने सुपूर्त केली. काळवाडी येथील यात्रेवर रूद्रच्या मृत्यूने शोककळा पसरली होती. नेहमीप्रमाणे यात्रा भरलीच नाही. ग्रामस्थ पै-पाहुणे कोणालाच यात्रेत स्वारस्य नव्हते, असे ग्रामस्थ विनोद काकडे यांनी सांगितले. साधारणतः ८ चौरस किलोमीटरला एक बिबट्या असे प्रमाण समजले जाते. असे असताना ३ किलोमीटर परिघात एकाच दिवसात तीन-तीन बिबटे पकडले जातात, हे चिंताजनक आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List