भर उन्हाळय़ात साथीच्या आजारांचा ताप; झोपडपट्टय़ांच्या ड्रममध्ये डेंग्यू, मलेरियाचा दबा!
पावसाळा तोंडावर आल्यामुळे पालिका वेगाने काम करीत असताना मुंबईच्या झोपडपट्टय़ांमधील ड्रममध्येच डेंग्यू, मलेरिया दबा धरून बसल्याचे समोर आले आहे. गेल्या आठवडाभराच्या कीटकनाशक विभागाने केलेल्या तपासणीत 209 ठिकाणी मलेरियाचा अॅनोफिलीस डास, तर तब्बल 1644 ठिकाणी डेंग्यू निर्माण करणारा एडीस आढळला आहे. ही ठिकाणे पालिकेने नष्ट केली असून डास आढळलेल्या सुमारे दीडशेहून अधिक जणांना पालिकेने नोटीस बजावली आहे.
पालिकेच्या माध्यमातून पावसाळापूर्व कामे वेगाने सुरू असून विविध संस्थांच्या परिसरात पाण्याच्या टाक्या डास प्रतिबंधक करण्याची कार्यवाही 15 मेपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. तसेच विभाग पातळीवर विविध यंत्रणांनी सक्रियपणे सहभागी होत महानगरपालिकेसोबत डास उत्पत्ती स्थानांची संयुक्त शोधमोहीम राबवण्याच्या सूचनाही त्यांनी यंत्रणांना दिल्या असून कर्तव्यात कसूर करणाऱया संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर कीटकनाशक विभागाकडून मुंबईतील डेंग्यू, मलेरियाचे डास उत्पत्ती करणारी ठिकाणे शोधून नष्ट केली जात आहेत. यामध्ये सुरू असलेल्या तपासणीत आढळलेल्या साथीच्या आजाराच्या ठिकाणांमध्ये झोपडपट्टय़ांची संख्या सुमारे 70 टक्क्यांवर आहे. विशेष म्हणजे झोपडपट्टी भागात पाणी साठवण्यासाठी ठेवलेल्या ड्रममध्ये हे डास आढळत आहेत. त्यामुळे नागरिकांनी आठवडय़ातून एकदा ड्रम रिकामा करावा आणि स्वच्छ पुसून घ्यावा असे आवाहन पालिकेच्या कीटकनाशक विभागाकडून करण्यात आले आहे.
वर्षभराची स्थिती
मुंबईत जानेवारी ते एप्रिल 2024 या कालावधीमध्ये मलेरियाचा अॅनोफिलीस डास 3152 ठिकाणी आढळला आहे. म्हणजेच आतापर्यंत एकूण 3361 ठिकाणी अॅनोफिलीस आढळला आहे.
साथीचे आजार पसरवण्यास जबाबदार असणाऱयांना पालिकेने नोटीस बजावली आहे. जानेवारी ते मार्च या कालावधीत 5252 नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
जानेवारी ते एप्रिल या कालावधीत डेंग्यूचा एडीस डास 32092 ठिकाणी आढळला. तर जानेवारी ते 7 मेपर्यंत एकूण 33736 ठिकाणी हा डास आढळला आहे.
अशी घ्या काळजी
पाणी साचून राहत असल्याने दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रो, टायफॉइड, कॉलरा, कावीळ असे आजार तर कीटकांच्या प्रभावामुळे मलेरिया, डेंग्यू, चिकुनगुनिया असे आजार पसरतात.
त्यामुळे हे पावसाळी आजार टाळण्यासाठी नागरिकांनी घर-परिसर स्वच्छ ठेवावा, पाणी साचू देऊ नये, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नये असे आवाहन पालिकेने केले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List