अभिव्यक्ती- हिरामंडी : दास्तान-ए-कोठा संस्कृती!
>>डॉ. मुकुंद कुळे
‘हिंदुस्थानी स्वातंत्र्यलढ्याची ठिणगी तुझ्या गाण्यातून–आवाजातून लोकांपर्यंत पोचू दे… तू तुझ्या नेहमीच्या गाण्यांबरोबरच आजादीची गाणीदेखील गा.’ असं जिला आवाहन केलं गेलं ती होती बनारसची एक कोठेवाली तवायफ– विद्याधरीबाई! या आवाहनाने मुख्य प्रवाहात येण्याची संधी तिला मिळाली आणि तिने हसत हसत या संधीला गळामिठी घातली. हे आवाहन करणारी व्यक्ती साधीसुधी नव्हती, तर ते होते महात्मा गांधी! कोठा संस्कृतीतील असे हे अनेक अलक्षित कोपरे… अशी ही तत्कालीन उत्तर हिंदुस्थानची आन–बान–शान असणाऱया या कोठेवालींची आणि त्यांच्या आयुष्याची गोष्ट संजय लीला भन्साळीने ‘हिरामंडी’मध्ये सुरेख गुंफली आहे.
विद्याधरीबाई
भारत न रह सकेगा हरगिज गुलामखाना,
आजाद होगा होगा आया है वो जमाना।
भारत वतन हमारा भारत के हम हैं बच्चे,
माता के वास्ते है मंजूर सर कटाना।।
आपल्या एका रंगलेल्या मैफलीत विद्याधरीबाईंनी कोठीवर हा आजादीचा मुजरा गायला आणि उपस्थित सगळे सर्दगर्द झाले… किंबहुना त्यांच्यावर ‘तोबा तोबा’ म्हणण्याची पाळी आली. मैफलीला मोठमोठे जमीनदार, रईसजादे, धनदांडगे व्यापारी उपस्थित होते. त्यांच्यासाठी हे अनपेक्षित होतं. ते पावूनच गेले, पण विद्याधरीबाई हिंदुस्थानी स्वातंत्र्य लढ्याने भारावून गेली होती. आजवर ती रसिक जनांसाठी गात आली होती, आता तिला देशासाठीही गायचं होतं. तेव्हा हिंदुस्थानातील असं एक संस्थान नव्हतं, जिथे विद्याधरीबाईंच्या गाण्याचे जलसे झाले नसतील. त्यांचा आवाज आणि त्यांच्या गाण्याच्या हुकुमतीवर-अदेवर दिवाने झालेले तर लाखोंनी होते. तरीही सगळ्यांसाठी त्या होत्या – बनारसची एक कोठेवाली तवायफ! म्हणूनच जेव्हा मुख्य प्रवाहात येण्याची संधी मिळाली, त्यांनी हसत हसत या संधीला गळामिठी घातली. कुणीतरी त्यांना आवाहनच केलं होतं की, तू तुझ्या नेहमीच्या गाण्यांबरोबरच आजादीची गाणीदेखील गा. हिंदुस्थानी स्वातंत्र्य लढ्याची ठिणगी तुझ्या गाण्यातून-आवाजातून लोकांपर्यंत पोचू दे… आणि हे आवाहन करणारी व्यक्ती साधीसुधी नव्हती, तर ते होते महात्मा गांधी!
1930चा सुमार असेल. महात्मा गांधी कामानिमित्ताने बनारसला गेले होते. स्वातंत्र्य लढ्यात महिलांचादेखील सहभाग असावा म्हणून ते प्रयत्नशील होते. त्या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून बनारसला त्यांनी बनारसच्या कोठेवालींनादेखील या लढ्यात सहभागी होण्याचं आवाहन केलं. इतकंच नाही, तर तवायफ म्हणून करीत असलेला परंपरागत व्यवसाय सोडून द्या, असंही त्यांनी आवाहन केलं. त्या आवाहनानुसारच त्या वेळी उत्तर हिंदुस्थानातील गाण्याच्या दुनियेतील शानोशौकत असलेल्या हुस्नाबाई आणि विद्याधरीबाई या दोघींनी गांधींना लगेच प्रतिसाद दिला. एवढंच नव्हे, तर हुस्नाबाईंच्या अध्यक्षतेखाली ‘अखिल भारतीय तवायफ संघा’ची स्थापनादेखील करण्यात आली. परंपरेने चालत आलेली कोठा संस्कृती नाकारून तिथल्या महिलांनी बाहेर पडावं आणि चारचौघींसारखं आयुष्य जगावं हा या संस्थेचा उद्देश होता. तो पुढील काळात किती साधला गेला शंकाच आहे. कारण तेव्हा स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेल्या पांढरपेशा महिलांनीच जिथे या कोठेवाल्या महिलांच्या स्वातंत्र्य लढ्यातील सहभागाला विरोध केला होता, तिथे सर्वसामान्य समाज या महिलांना कसा स्वीकारणार होता, हा मोठाच सामाजिक प्रश्न होता.
अर्थातच विद्याधरीबाईंनीदेखील लगेच आपला कोठा बंद केला नाही. उलट त्या दणक्यात कार्पाम करू लागल्या आणि खोऱयाने पैसा कमावू लागल्या. मात्र जे कमावून आणलं त्यातलं अर्ध्याहून अधिक त्यांनी स्वातंत्र्य चळवळीसाठी देणगी म्हणून दिलं. गांधींसारख्या महात्म्याने आपल्याला स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होण्याचं आवाहन करावं आणि आजादीची गाणी गायला सांगावं याचंच त्यांना कोण अप्रूप वाटलं होतं! म्हणूनच स्वातंत्र्य मिळेपर्यंत त्या जिथे जिथे गायल्या, त्या प्रत्येक कार्पामात त्यांनी आजादीचा मुजरा जरूर गायला. एवढंच कशाला, गांधींच्या ‘परदेशी मालावर बहिष्कार’ या धोरणाला पाठिंबा देत विद्याधरीबाईंनी आपल्या परदेशी कपड्यांचीदेखील होळी केली होती म्हणे! तसंच त्या काळात विद्याधरीबाईंचा बनारसमधला कोठा म्हणजे भूमिगत स्वातंत्र्य सैनिकांचं लपण्याचं हक्काचं ठिकाणही होतं. परिणामी त्यांच्या कोठ्यावर ब्रिटिशांनी अनेक वेळा पायधूळ झाडली. मात्र त्यांच्या हाती कधीच काही लागलं नाही. कारण हे स्वातंत्र्य सैनिक कधी सारंगीये म्हणून वावरत, तर कधी तबलीये म्हणून… पण विद्याधरीबाई काय, हुस्नाबाई काय किंवा त्यांच्यासारख्या आणखी कुणी काय, त्यांच्या स्वातंत्र्य लढ्यातल्या कामाची दखल कुणी का घ्यावी? त्या थोड्याच मध्यमवर्गीय समाजातल्या गरत्या बायका होत्या?
हे सारं आठवलं ते संजय लीला भन्साळी यांच्या नुकत्याच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या ‘हिरामंडी’ नावाच्या वेब सीरिजमुळे. या मालिकेतला हिरामंडी नावाचा परिसर आज पाकिस्तानात असलेल्या लाहोरमधला आहे खरा, पण कधीकाळी लाहोर हिंदुस्थानातच तर होतं आणि फक्त लाहोरच कशाला- लखनऊ, बनारस, बिहारमधील मुझफ्फरपूर अशा आजही हिंदुस्थानात असलेल्या उत्तरेकडील अनेक प्रांतांतील तवायफ महिलांचे कोठे आणि त्यांचा परिसर प्रसिद्ध होताच की! मात्र परिसर वेगळा असला आणि त्या परिसराचं नाव हिरामंडी किंवा मीना बाजार असलं तरी काय फरक पडतो? कोठ्यांवरील महिलांचं आयुष्य तर एकसारखंच होतं. एकाच वेळी रंगीबेरंगी आणि रंगहीन, पण या महिलांच्या आयुष्याची दखल लब्धप्रतिष्ठित समाजाने खऱया अर्थाने कधी घेतलीच नाही. उलट त्यांची वस्ती असलेल्या परिसरावर कायमचा ‘बदनाम गली’चा शिक्का मारून टाकला, परंतु कुणी समजून-उमजून डोकावलं असतं या कोठेवाल्या तवायफ महिलांच्या घरा-दारात तर त्यांनाही दिसून आलं असतं, केवळ कलावंताचं जिणं नाही, तर समाजासाठी त्यांनाही काहीतरी करायची असलेली आस आणि आच! पण त्यांना कुणी कधी आपलं म्हटलंच नाही. एवढंच नाही, तर त्यांना समाजाच्या मुख्य धारेतही कधी सामावून घेतलं नाही. एक महात्मा गांधीच निघाले पहिले या कोठेवाल्या महिलांना स्वातंत्र्य लढ्यासारख्या देशव्यापी आंदोलनात सामील करून घेणारे. मग त्या तरी कशाला मागे राहिल्या असत्या! नाच-गाणं, जडजवाहीर, शाही थाटमाट हा तर त्यांच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग होताच, पण याचा अर्थ त्यांना समाजाविषयी, देशाविषयी आस्था नव्हती असा थोडाच होतो? गांधीजींना ते नेमकं उमगलं. विशेष म्हणजे संजय लीला भन्साळीनेदेखील ‘हिरामंडी’मध्ये कोठा संस्कृतीचा झगमगाट दाखवताना वास्तव आयुष्यातील त्यांची परवड तर दाखवलीच, शिवाय या महिलांनी स्वातंत्र्य लढ्यात दिलेल्या योगदानाचीही दखल घेतली. कोठा संस्कृतीतील असे अनेक अलक्षित कोपरेच खरं तर पुन्हा उजळून काढण्याची गरज आहे. कारण आता आतापर्यंत त्यांचं जगणंच नाही, तर त्यांचं नाचगाणंही बदनामच केलं गेलं होतं.
आता भले समृद्ध कला वारसा म्हणून जगभरात हिंदुस्थानी संगीत-नृत्य नावाजलं जात असेल. मात्र याच ‘समृद्ध’ हिंदुस्थानी कला वारशाला पन्नास-पाऊणशे वर्षांपूर्वीपर्यंत अगदी हीन लेखलं जात होतं. हिंदुस्थानी संस्कृतीला लागलेला कलंक म्हणूनच या गायन-नृत्याकडे पाहण्याचा तथाकथित पांढरपेशा समूहाचा दृष्टिकोन होता. कारण या संगीत-नृत्याच्या परंपरेचा वाहक होता इथला कलावंत संप्रदाय! देवाचं मन रिझवण्यासाठी गायन-नृत्य करण्यातूनच हिंदुस्थानातील देवदासी प्रथेचा उगम झाला. पुढे कालौघात देवाच्या या ‘देवदासी’ पुजारी, राजा व सामान्यांच्याही ‘भोगदासी’ कधी झाल्या ते कळलंच नाही. किंबहुना तथाकथितांनी ही परंपराच निर्माण केली होती…आपल्या सोयीसाठी!
मात्र या सामाजिक-सांस्कृतिक स्थित्यंतरातही देवदासींनी आपल्या नृत्य-गायनादी कला जपून ठेवल्या. म्हणूनच म्हणतो की, आज आपण ‘आपल्या आपल्या’ म्हणतो त्या कला परंपरा आपल्या होत्याच कुठे? त्या तर होत्या देवाच्या मंदिरात नृत्य-गायन करणाऱया देवदासींच्या, राजदरबारात नाचणाऱया राजनर्तकींच्या, कोठ्यावर मुजरा करणाऱया तवायफ महिलांच्या ते अगदी दिवाणखान्यात-कनातीत नाच-गाणं करणाऱया महार-मांग-कोल्हाटी बायांच्या.
म्हणून तर सुशिक्षित लब्धप्रतिष्ठितांच्या घरात नाच-गाणं शिकायला सख्त बंदी होती. आपल्या मुलींनी नाच-गाणं शिकणं म्हणजे या पांढरपेशा समूहाच्या दृष्टीने ‘बाजारबसवी’ होणंच होतं. त्यामुळेच हिंदुस्थानी कलेतिहासाकडे नजर टाकली, तर नाटक-सिनेमा-ध्वनिमुद्रण या साऱयाच क्षेत्रांत सुरुवातीच्या काळात कलावंत परंपरेतील महिलांचाच अधिक भरणा असलेला दिसतो. कारण नाच-गाणं त्यांच्या रक्तातच वाहत होतं. या कला म्हणजे त्यांच्यासाठी जणू त्यांचा जैविक मातृवारसाच होता, परंपरेने चालत आलेला.
अभिजनांच्या तर या कला कधीच नव्हत्या, त्या केवळ बहुजनांच्याच कला होत्या. त्यातही निम्नस्तरातील कायमच अव्हेरल्या गेलेल्या समाजाच्या! म्हणून तर 19 व्या शतकात इंग्रजी शिकलेल्या तत्कालीन पहिल्या हिंदुस्थानी पांढरपेशा शिक्षित पिढीने या कला बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं. व्हिक्टोरियन मोरॅलिटीच्या प्रभावाखाली येत या उच्चभ्रू, शिक्षित समूहांनी मूळ कलावंत असलेल्या या महिलांना सरसकट वेश्याच ठरवून टाकलं आणि या कला परंपरा नष्ट करून टाकण्याचा विडाच उचलला. त्यासाठी Aहूग् हल्tम्प् स्दनसहू सारखी (नृत्यविरोधी चळवळ) मोहीमही त्यांनी सुरू केली. परिणामी कलावंत समाजाची नाचगाण्याची परंपरा नासवली गेली. त्यातूनच दासीआटम (आताचं भरतनाट्यम) किंवा कथ्थक-ठुमरीसारखं नाच-गाणं करणाऱया महिलांना सरसकट वेश्या ठरवण्यात आलं, पण या महिला शरीरपोत्या नव्हत्या. एका वेळी त्या एकाशीच एकनिष्ठ असायच्या आणि त्या वेळी एखाद्या पतिव्रतेपेक्षा शरीराचं पावित्र्य राखायच्या. केवळ नाच-गाणं हेच त्यांचं उपजीविकेचं प्रमुख साधन होतं, शरीर नव्हे! म्हणून तर उत्तरेतील तवायफ महिलांच्या कोठ्यावर तरुण युवक-युवतींना अदब, शिस्त आणि प्रेमाची शिकवण घेण्यासाठी हक्काने पाठवलं जायचं. कारण हे कोठे म्हणजे सरसकट रंडीखाने नव्हते, तर समाजात वावरताना कसं वागलं-बोललं पाहिजे याची तमीज शिकवणारी जणू ती चालती बोलती विद्यापीठं होती.
संजय लीला भन्साळीने तत्कालीन उत्तर हिंदुस्थानची आन-बान-शान असणाऱया या कोठेवालींची आणि त्यांच्या आयुष्याची गोष्ट ‘हिरामंडी’मध्ये सुरेख गुंफली आहे. ही कोठा संस्कृती काय किंवा शरीरपीचा व्यवसाय काय, त्यांचं समर्थन नाहीच करता येणार, पण केवळ पृष्ठभागावर जे दिसतंय त्यावरून कुणी त्यांच्या चरित्र आणि चारित्र्याचं मोजमाप काढू नये इतकंच!
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List