मोदी गरीबांचे नाही, फक्त अब्जाधीशांचे मसिहा; नंदुरबारच्या सभेत प्रियंका गांधी यांचा हल्लाबोल
नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा घालवली आहे. ते गरीबांचे नाही फक्त अब्जाधीशांचे मसिहा आहेत, अशा शब्दात काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर हल्ला चढवला. अख्खे जग जर तुमच्याबरोबर आहे, तर निवडणूक काळात मंचावर येवून लहान मुलांसारखे रडण्याचे नाटक का करतात, असा सवालही केला.
नंदुरबार येथे महाविकास आघाडीचे उमेदवार गोवल पाडवी यांच्या प्रचारार्थ शनिवारी जाहीर सभेत त्या बोलत होत्या. माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी या दुर्गारूपी महिलेने पाकिस्तानचे दोन तुकडे केले. या शहीद झालेल्या महिलेला तुम्ही देशद्रोही म्हणतात. खरे तर तुम्हीच इंदिरा गांधी यांच्याकडून हिम्मत, शौर्य, दृढता शिकली पाहिजे, असा सल्ला दिला. याआधीचे पंतप्रधान लोकशाही मानणारे होते, आदर करणारे होते. तुम्ही या पदाची प्रतिष्ठा घालवली आहे. जनतेसमोर येवून दहा वर्षात काय-काय कामे केली हेही सांगण्याची तुमची हिम्मत नाही, अशा शब्दात प्रहार केले. यावेळी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, के. सी. पाडवी, उमेदवार गोवल पाडवी, शिरीष नायक यांच्यासह पदाधिकारी हजर होते.
…आणि कुठे मोदींच्या पोकळ गप्पा
मी शबरीमातेचा पूजारी आहे, असे नरेंद्र मोदी यांनी नंदुरबारच्या सभेत सांगितले होते. प्रभू श्रीरामांनी शबरीमातेचा सन्मान केला, ते सत्यवचनी होते. मात्र, मोदींची सच्चाई काय? शेकडो महिलांचा अपमान बघूनही मोदी गप्प का राहिले? ते दोन कोटी रोजगार, जनतेच्या खात्यात पंधरा लाख देणार होते, त्याचे काय झाले? शेतकरी, कष्टकरी, आदिवासी बांधव यांच्यासाठी तुमच्याकडे पैसे नाहीत. मात्र, दोन विमानांच्या खरेदीसाठी पैसे आहेत. तुम्ही राष्ट्रपतींना सन्मान देत नाही, लोकशाहीच्या विरोधात जाऊन, दबाव आणून, आमदारांना विकत घेऊन सरकार स्थापन करतात. कुठे प्रभू श्रीराम, शबरीमाता आणि कुठे मोदींच्या पोकळ गप्पा, अशा शब्दात प्रियंका गांधी यांनी जोरदार टीका केली.
‘त्या’ देणग्या की हप्ते वसुली
z इलेक्टोरल बॉण्डवरून त्यांनी मोदींना लक्ष्य केले. त्यांनी कोविड लस तयार करणारी पंपनी, गुजरातमधील कोसळलेल्या त्या पूल बनवणाऱयाकडून देणग्या घेतल्या. ज्यांच्यावर छापे पडले, त्या लोकांकडून देणग्या घेतल्या आणि छापे थांबले. देणग्या घेतल्या, केस बंद केल्या. त्या देणग्या होत्या की ती हप्ते वसुली, हेच आपले पंतप्रधान का, असा सवाल केला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List