इंग्रजांना घालवले तर मोदी काय चीज आहेत? शरद पवार यांचा घणाघात
केंद्र सरकारकडून सत्तेचा गैरवापर सुरू आहे. विरोधात बोलणाऱयांना खोटय़ा केस टाकून तुरुंगात टाकले जाते. देश हुकूमशाहीच्या रस्त्याने चालला आहे. या देशात ज्यांच्या साम्राज्यात सूर्य मावळत नाही, असे म्हणणाऱया इंग्रजांना महात्मा गांधी घालवू शकले, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी काय चीज आहेत, असा सवाल करत त्यांनाही सत्तेतून घालवू, असा विश्वास राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केला.
शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांची हडपसर येथे सांगता सभा झाली, यावेळी ते बोलत होते. माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते अंकुश काकडे, नीलेश मगर, महादेव बाबर यावेळी उपस्थित होते.
भाजपला कोणी केलेली टीका आणि वेगळे मत सहन होत नाही. मनाविरोधात बोलले की खोटय़ा केस टाकून तुरुंगात टाकत असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला. दहा वर्षांत काय केले हे सांगण्यापेक्षा मोदी व्यक्तिगत हल्ले करत आहेत. असत्यावर आधारित बोलत आहेत. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात उल्लेख नाही, अशा गोष्टी मांडतात. भगिनींच्या गळ्यातील मंगळसूत्र काढून घेतील, असे सांगतात. सांगण्यासारखे काही नसल्याने असत्य प्रचार करत आहेत. राहुल गांधी यांची टिंगलटवाळी करतात. गांधी कुटुंबाने देशासाठी योगदान दिले असून, त्याच्या एक टक्का तरी मोदी यांनी योगदान दिले का? याचे उत्तर द्यावे, असे आव्हानही पवार यांनी केले.
त्यांच्या आसपासही उभे राहणार नाही
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी आमच्या सोबत यावे, या मोदी यांच्या वक्तव्याचा शरद पवार यांनी कडक शब्दांत समाचार घेतला. पवार म्हणाले, ज्या पक्षात व्यक्तिगत स्वातंत्र्य नाही, देशाच्या ऐक्याचा विचार नाही, विचारधारेत समाजातील सर्व घटकांना आत्मविश्वास देण्याचा कार्यक्रम नाही, धर्मवादी विचारांचा पुरस्कार केला जातो, अशा पक्षाच्या आसपासही मी आणि उद्धव ठाकरे आयुष्यात कधी उभे राहणार नाही. तर, या लोकांना सत्तेतून बाहेर काढण्यासाठी जे काही करता येईल, ते केले जाईल, असेही पवार यांनी सांगितले.
मोदी यांनी एवढय़ा सभा घेऊनही परिणाम दिसत नाही
पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांची राज्यात एक सभा होत होती. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी एका राज्यात आठ सभा घेत आहेत. तो त्यांचा अधिकार आहे. मात्र, आजपर्यंत असे कधी घडले नाही. आताच का घडत आहे? एवढय़ा सभा घेऊनही हवा तो परिणाम दिसत नाही, त्यामुळे ते सातत्याने सभा घेत आहेत. शासनाचा जमाव घेऊन त्या माध्यमातून निवडणुकीचे निकाल वेगळे लागतील का, याची खबरदारी घेणे हे सूत्र मोदी यांचे असल्याचे दिसते. मात्र, त्यांना याचे उत्तर द्यावे लागेल, असेही पवार यांनी सांगितले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List