सिनेमा- सामाजिक परंपरेवर अप्रत्यक्ष आघात
>> प्रा. अनिल कवठेकर
गेल्या अनेक वर्षांत हजारो चित्रपट आतापर्यंत पाहिले असतील. चित्रपटाच्या शेवटी पोलीस कशासाठी येतात हा विनोदाचा विषय होता, पण ‘लापता लेडीज’ हा चित्रपट त्याला अपवाद आहे. या चित्रपटाने पोलिसांची भूमिका सामाजिक समस्यांमध्ये कशी असावी हे अत्यंत मार्मिकपणे सूचित केले आहे. या चित्रपटाची अनेक सौंदर्यस्थळे सांगता येतील. हिंदी बहुभाषिक भागांमध्ये असलेला डोक्यावरचा पदर अर्थात घुंगट! हा घुंगट घेतल्यानंतर स्त्राrला फक्त पुरुषाचे पाय दिसतात आणि त्या स्त्राrने केवळ आपल्या नवऱयाचे पायच पाहावे हीच सांस्कृतिक आणि पारंपरिक भूमिका त्या घुंगटमागे असणाऱया भूमिकेला छेद देणारा हा ‘लापता लेडीज’ आहे.
2001 च्या दरम्यान घडलेली ही कथा आहे. म्हणजे आतापासून 20-22 वर्षे मागे. दीपक हा फुलबरोबर विवाह झाल्यावर तिला घेऊन स्कूटरवरून ट्रिपल सीट बसून निघतो. मग होडीतून नदी पार करत, नंतर बसच्या टपावर बसून स्टेशन नसलेल्या एका गावात येतो. दीपक आणि त्याची पत्नी फुल हे दोघेही ट्रेनमध्ये चढतात. त्या बोगीमध्ये अगोदरच तिच्यासारखीच लाल रंगाची साडी आणि तोंडावर ओढणी घेतलेल्या दोन नवविवाहित तरुणी त्यांच्या पतीसह बसलेल्या असतात. प्रवासी चढतात, उतरतात. जागा होते आणि नवविवाहित दीपक व फुलच्या जागा बदलतात. रात्री ट्रेन जेव्हा मूर्ती स्टेशनवर पोहोचते तेव्हा दीपकला जाग येते. तो घाईघाईने आपल्या बायकोला उठवतो आणि दोघेही स्टेशनवर उतरतात. रात्रीच्या वेळी गावात पोहोचतात. तोपर्यंत दीपकला तो कोणाला घेऊन आलेला आहे हे माहीत नसते. स्वागत करताना त्याची आई तिला घुंगट काढायला सांगते आणि तिचा चेहरा पाहताच ओवाळणीचे ताट खाली पडते. मग उलगडा होतो की, दीपक दुसरीच नवरी घेऊन आलेला आहे आणि चित्रपटाला प्रारंभ होतो.
स्टेशन गेल्यानंतर फुलला कळतं की, आता ती हरवलेली आहे, कारण जेव्हा दुसरा नवरा पंकज तिला हाक मारून बोलावतो तेव्हा तीच सांगते की, मी ती नाही. तेव्हा त्याच्या लक्षात येते की, ती हरवलेली आहे. तो तिचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतो; पण त्याच्यासोबत त्याचे आई-वडील व इतर मंडळी असल्यामुळे तोही तिच्या नादी लागत नाही. त्याला मात्र इतके कळते की, त्याची बायको जया 15 तोळे सोने व मोबाईल घेऊन फरार झालेली आहे.
फुल म्हणजे साधीभोळी, अल्लड, गोंधळलेली, घाबरलेली, नवविवाहिता. दीपक हताश, निराश, उद्विग्नपणे आपली पत्नी समजून भलतीला घेऊन आलेला. स्वभावाने गरीब पण मनाने प्रामाणिक नवरा आहे. त्याच्या सोबत चुकून आलेली जया मात्र शांत, संयमी, धीरगंभीर. जणू तिच्या डोक्यात काहीतरी चालले आहे अशी सावध पवित्रा घेतलेली नवविवाहिता आहे. तिचा नवरा पंकज याला बायको हरवल्याचे दुःख नाही, तर फटफटी मिळाल्याचा आनंद आहे.
दीपकच्या घरची माणसे चांगली आहेत. जयाला तिचा पती भेटेपर्यंत तिची काळजी घ्यायची असे ते ठरवतात. दीपकची पत्नी फुल ही तगरीच्या फुलासारखीच अत्यंत साधी. लहान मुलीची मानसिकता असणारी पण परंपरावादी आहे. ती पतीचे नाव न घेता हातावर रंगवलेले नाव दाखवते. तिला तिचे सासर कुठे आहे हे माहीत नाही. जयाच्या प्रत्येक कृतीमध्ये प्रेक्षकांना छोटे छोटे धक्के बसतात. ती आपल्या माहेरचा चुकीचा नंबर देते. देवळात गेल्यानंतर तीन-चार तासांनी परत येते. पतीचे नाव पटकन घेते. फुल जितकी साधी तितकी जया विचारी व हिम्मतवाली आहे. तिला शेतीची आवड आहे. पिकावरची कीड आणि त्यावरच्या उपायांची तिला माहिती आहे. चार दिवसांत ती सगळ्यांशी मैत्री करते आणि तिच्या राहण्याने घरातले वातावरण बदलते. जया म्हणजे बदलाव आणणारी सक्षम, स्वाभिमानी तरुणी आहे.
श्याम मनोहर नावाचा पोलीस इन्स्पेक्टर आपल्या पोलीस स्टेशनमध्ये आलेल्या प्रत्येक पारदाराला कसे कापायचे याच्या तयारीत असतो. कापताना तो त्याच्या कपडय़ांवरून हा आपल्याला किती पैसे देऊ शकतो हे ओळखतो व त्याला कोणत्या केसमध्ये अडकवता येईल हे त्याच्या डोक्यात शिजत असते. दीपक त्याला आपण चुकून दुसऱयाची बायको आणल्याचे सांगतो. तोपर्यंत इन्स्पेक्टरला कळते की, दुसऱया गावात एकाची बायको त्याच ट्रेनमधून हरवलेली आहे आणि ती 15 लाखांचे दागिने घेऊन गेलेली आहे. तेव्हा ते 15 लाखांचे दागिने कसे मिळतील याचे इन्स्पेक्टरचे प्लॅनिंग सुरू होते.
इकडे हरवलेल्या फुलला छोटू आणि मंजू भेटतात. मंजू म्हणजे स्टेशनवर चहाची टपरी चालवणारी कणखर, स्वाभिमानी व आत्मभान जागृत झालेली एक वयस्कर स्त्राr आहे. तिचा स्रीपुरुष नात्यावर अजिबात विश्वास नाही. ती फुलला आपल्या घरात आसरा देते आणि चार दिवसांत आपल्या आयुष्यातला कणखरपणाही देते. जीवनाचे खरे तत्त्वज्ञान सांगत फुलचे एका कणखर मुलीत रूपांतर करते. पण त्याच वेळी तिच्या मनात संपलेले प्रेम फुल जागृत करून जाते. दोघांमध्येही परिवर्तन होते. फुल जेव्हा टपरीवर विकण्यासाठी कलाकंद बनवते तेव्हा ती मंजूला खायला सांगते; पण मंजू म्हणते माझ्या आयुष्यात तोंड गोड करण्यासारखे काही राहिलेले नाही. पण जेव्हा फुलला तिचे सासर सापडते तेव्हा मंजू सगळ्यांचे तोंड गोड करते. तिचे हे रूपांतर पडद्यावर पाहायला खूप वेगळे वाटते. याच त्या जागा आहेत ज्या चित्रपटाच्या प्रत्येक फ्रेमला भावपूर्ण सौंदर्याचे रंग भरण्यास मदत करतात.
जयाला पोलीस स्टेशनला जावे लागते. तिथे ती आपले नाव श्रेया, स्वतच्या गावाचे नाव भलतेच सांगते. श्याम मनोहरला तिचा पूर्ण संशय येतो. श्याम मनोहर व त्याचा असिस्टंट दोघेही तिचा पाठलाग करतात. पाठलागाच्या वेळी जेम्स बॉण्डचे सुपरिचित संगीत वाजते. त्याचे विडंबन अतिशय सुंदर करण्यात आलेले आहे. यात किरण राव यांनी दिग्दर्शनाच्या अनेक सुंदर जागा अभ्यासू प्रेक्षकांसाठी ठेवलेल्या आहेत. फुलचे माहेर ज्या गावात आहे त्या गावाला आणि रस्त्याला जोडणारा एक छोटासा लाकडी पूल आहे. म्हणजे हे गाव आधुनिक सुधारणांपासून खूप दूर आहे हे स्पष्ट होते.
सगळे झोपल्यानंतर जया मोबाईलमधले सिमकार्ड तुळशीसमोर लावलेल्या पणतीच्या ज्योतीने पेटवून फेकून देते. तुळस ही विवाहाशी संबंधित मान्यता असलेली एक पवित्र वनस्पती आहे. त्या तुळशीच्या समोर असलेल्या पणतीला पेटवून आपले सगळे जुने संबंध जया पेटवून फेकून देते आणि स्वतला सिद्ध करण्यास तयार होते. त्या घरातल्या आजोबांनी 35 वर्षे कोलकात्यात वाचमनचे काम केले असल्याने ते झोपेत ‘जागते रहो’ म्हणतात. ते ज्या-ज्या वेळी ‘जागते रहो’ म्हणतात त्या-त्या वेळी वेगळ्या संदर्भांनी त्यांचे ’जागते रहो’ प्रत्येकाला जागा करण्याचा प्रयत्न करते.
लग्नाचा फोटो आहे. नवऱयाचा चेहरा दिसतोय, पण नवरीचा चेहरा घुंगट ओढल्यामुळे दिसत नाही. या एका लाइनवर हा संपूर्ण चित्रपट आहे. जो आपल्या सामाजिक परंपरेवर अप्रत्यक्षपणे आघात करतो. फुलला घेण्यासाठी दीपक कच्च्या व खडकाळ रस्त्याने जातो, पण परत येताना तोच रस्ता डांबरी दाखवला आहे. आयुष्यातील खडतर अडचणींवरची मात दोन्ही दृश्यांतून व्यक्त होते. समाजातील पारंपरिक रूढींवर हलकेच प्रहार करणारे संवाद आहेत… ‘एक बार घुंगट ले लिया, तो आगे नही, नीचे देखकर चलना पडता है. तंबू जैसे घुंगट के पार ना तो लेडीज का शक्ल दिखता है ना लेडीज को जूता की अलावा कुछ दिखता है. कोई औरत अपने मुंह से अपने पति का नाम नही लेती है….’
पोलीस स्टेशनमध्ये जयावर चोरीचा आरोप झाल्यावर ती म्हणते, ‘हां, हमने चुराया है एक मौका जिंदगी के लिए.’ जयाची भूमिका एक सस्पेन्स आहे. रवी किशनचा श्याम मनोहर, प्रतिभा रंताची जया, नीतांशी गोयलची साधीभोळी फुल व स्पर्श श्रीवास्तवचा अगतिक पती दीपक आणि छाया कदमची मंजू एकदम अफलातून झालेली आहे. प्रत्येक व्यक्तिरेखा वास्तवातल्या वाटतात. तसंच त्या आपल्या सामाजिक परंपरांचा जाणीवपूर्वक विचार करायला लावतात.
(लेखक चित्रपट अभ्यासक आहेत)
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List