विशेष – सायबर तस्करीचा विळखा

विशेष – सायबर तस्करीचा विळखा

>> प्रसाद ताम्हनकर

जगभरातील अनेक सुरक्षा यंत्रणा या विविध गुन्ह्यांविरुद्ध लढत असताना त्यात आता `सायबर तस्करी’ या नव्या गुन्ह्याची भर पडली आहे. इंटरपोलसारखी तपास संस्थादेखील आता या नव्या गुन्हेगारीला सर्व जगाने गंभीरपणे घ्यावे असे आवाहन करताना दिसत आहे. इतर देशांप्रमाणे हिंदुस्थानमधील काही लोकदेखील अशा तस्करीला बळी पडले आहेत. तिच्याशी लढण्यासाठी मोह टाळणे आणि भूलथापांपासून सावध राहणे, आपली वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवणे असे महत्त्वाचे उपाय तातडीने अमलात आणणे गरजेचे. 

गभरातील अनेक सुरक्षा यंत्रणा या विविध गुन्ह्यांविरुद्ध लढत असताना त्यात आता `सायबर तस्करी’ या नव्या गुह्याची भर पडली आहे. विविध आमिषे दाखवून वा सक्तीने लोकांना कंबोडिया, म्यानमारसारख्या देशातील सायबर गुन्हेगारांना विकले जात आहे आणि त्यांना बळजबरीने सायबर गुन्हे करण्यासाठी भाग पाडले जात आहे. इंटरपोलसारखी तपास संस्थादेखील आता या नव्या गुन्हेगारीला सर्व जगाने गंभीरपणे घ्यावे असे आवाहन करताना दिसत आहे. या गुह्याची व्याप्ती इतकी मोठी आहे की, जगभरातील जवळपास सर्व मोठय़ा देशांना त्याचा फटका बसला असून आर्थिक फसवणुकीच्या जोडीने अनेक तरुणांचीदेखील बेकायदा तस्करी करण्यात आली आहे.

कंबोडियासारख्या देशामध्ये अशा तस्करी करून आणलेल्या लोकांचे प्रमाण मोठे आहे. 2019 साली कंबोडियामध्ये ऑनलाइन जुगारावर बंदी आणि अनेक निर्बंधांमुळे तेथील कॅसिनो आणि हॉटेल्सचे उत्पन्न मोठय़ा प्रमाणावर घसरले. त्यातच कोरोनाच्या साथीमध्ये बसलेला आर्थिक फटका, काम सोडून परत मायदेशी गेलेले कामगार अशा अनेक अडचणी उभ्या राहिल्या. त्यामुळे तेथील रिअल इस्टेटच्या किमतीदेखील वेगाने उतरल्या. अशा वेळी गुन्हेगारी टोळ्यांचे लक्ष प्रामुख्याने सायबर गुन्हेगारीकडे वळले. असे गुन्हे करण्यासाठी विविध भाषांवर प्रभुत्व असलेली मंडळी, तंत्रज्ञ यांची मागणी वाढू लागली. या सर्वांचा परिणाम म्हणजे मानवी तस्करीला एक संघटित रूप मिळाले आणि अशा तस्करांनी जगभरात आपले पाय पसरायला सुरुवात केली.

रिकाम्या पडलेल्या कॅसिनो अथवा हॉटेल्समध्ये सुरक्षा रक्षकांच्या धाकात झुंडीच्या झुंडीने लोकांना बसवून त्यांच्याकडून विविध सायबर गुन्हे जगभरात घडवले जात आहेत. कोरोना काळात अनेक लोक रोजगाराला मुकले. आपल्या देशात किंवा गावात परतलेले लोक धास्तावलेले होते आणि आर्थिक अडचणीतदेखील होते. अशा लोकांना तस्करांनी विशेष लक्ष्य केले. त्यातल्या त्यात ज्यांचे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व आहे अथवा जे एकपेक्षा जास्त भाषा बोलू शकतात, तंत्रज्ञ आहेत, सफाईने संगणक हाताळू शकतात अशा लोकांना मोठय़ा रकमेच्या पगाराचे, परदेशातील मोठय़ा पदावरच्या नोकरीचे लालूच दाखवून जाळ्यात ओढण्यात आले. व्हॉट्सअॅप, ई-मेल्स, खोटय़ा वेबसाइट अशा अनेक माध्यमांतून बनावट रोजगाराच्या संधी देणाऱ्या जाहिराती करण्यात आल्या. देशविदेशातील अनेक गरजवंत अशा जाहिरातींना भुलले आणि अलगद तस्करांच्या जाळ्यात अडकले.

या तस्करांची लोकांना फसवण्याची पद्धत अत्यंत सोपी आहे. सोशल मीडिया अथवा इतर माध्यमांतून एखाद्या व्यक्तीला लक्ष्य केले जाते. त्याची माहिती, शिक्षण, पूर्वीची आणि सध्याची नोकरी यांची इत्थंभूत माहिती गोळा केली जाते. त्यानंतर बनावट ई-मेल अथवा लिंकच्या माध्यमातून अशा व्यक्तीशी संपर्क साधला जातो. कधी कधी अगदी खोटा इंटरव्यूदेखील घेतला जातो. एकदा का सावज भुलले की, मग त्याला परदेशातील नोकरीची संधी, भरभक्कम पगार अशा सोयी देण्याचे आश्वासन दिले जाते. काही वेळा तर अशा सावजाचा परदेशी जायचा खर्चदेखील तस्कर उचलतात अथवा तिकिटासाठी कर्ज म्हणून पैसेदेखील पुरवतात.

एकूणच सगळ्या झगमगाटाला भुललेले सावज मग एका वेगळ्याच आनंदात विमानात बसते. परदेशात उतरल्याबरोबर मग खऱ्या हालांना सुरुवात होते. सर्वात प्रथम अशा सावजाचा पासपोर्ट काढून घेतला जातो आणि मग त्याला सायबर गुन्हेगारी टोळीला विकले जाते. या टोळीचा बॉस मग बळजबरीने सायबर गुन्हे करण्यासाठी दबाव आणायला लागतो. “माझे कर्ज परत कर, नाहीतर सांगेन ते काम कर” अशी सक्ती केली जाते. बऱ्याच प्रकरणांत तर अशा गुन्ह्यांना बळी पडलेल्या लोकांना मारहाण करणे, मानसिक छळ करणे असे प्रकार समोर आले आहेत. स्त्रियांचे हाल तर विचारू नये इतके वाईट करण्यात आले आहेत. लैंगिक छळ तर सर्रास होतोच, पण अशा स्त्रियांना सेक्ससंदर्भातील सायबर गुन्हे करण्यासाठी मॉडेल अथवा पार्टनर बनवून वापरले जात आहे.

तस्करीच्या मार्गाने मिळवलेल्या अशा तरुणींना जबरदस्तीने देशविदेशातील लोकांशी मैत्रीचे नाटक करण्यास भाग पाडले जाते. समोरचा पुरुष या मैत्रीच्या जाळ्यात अडकला की, त्याच्या सोबत अश्लील भाषेत संवाद साधणे, फोन कॉल्स करणे आणि त्याला भुलवून त्याचे नको त्या अवस्थेतले फोटो आणि व्हिडीओ मिळवणे हा यामागचा प्रमुख उद्देश असतो. एकदा का असे फोटो, व्हिडीओ हाताला लागले की, त्या पुरुषाला ब्लॅकमेल करायला सुरुवात होते. सोशल मीडियावर हे फोटो प्रकाशित करण्याची अथवा नातेवाईकांना ते फोटो, व्हिडीओ पाठवण्याची धमकी दिली जाते आणि त्या बदल्यात मोठय़ा प्रमाणावर रक्कम लुबाडली जाते. अशा प्रकारचे गुन्हे करण्यास नकार देणाऱ्या तरुणींवर बलात्कार केले जातात, त्यांचा लैंगिक छळ केला जातो. प्रसंगी उपाशी ठेवणे, अंधारात बांधून ठेवणे असे अत्याचारदेखील केले जातात.

काही सायबर तज्ञांच्या मते कंबोडियासारख्या देशात तर चक्क शहरांमध्ये कंपाऊंडच्या आत शेकडो लोकांना शस्त्रांच्या धाकात अशा सायबर गुन्हेगारीला जुंपण्यात आले आहे. मोठमोठय़ा आणि मोकळ्या पडलेल्या ऑफिसेसचा वापरदेखील अशा गुन्ह्यांसाठी करण्यात येत आहे. सायबर तस्करी हा एक आंतरराष्ट्रीय प्रश्न बनत चालला आहे या मुद्दय़ावर जवळपास जगभरातील सायबर तज्ञांचे एकमत आहे. गेल्या तीन वर्षांत सायबर गुन्हे आणि सायबर तस्करी या दोन्हीमध्ये प्रचंड वेगाने वाढ झालेली आहे. म्यानमार, कंबोडिया येथील तपास यंत्रणा फारशी विश्वासार्ह नाही असे स्पष्ट मत काही सायबर यंत्रणा व्यक्त करतात. इथले काही तपास अधिकारी, इमिग्रेशन विभागाचे काही अधिकारी या तस्करांना सामील असल्याचा संशय वारंवार व्यक्त केला जातो.

कंबोडिया सरकारने याची गंभीर दखल घेत एक वेगळी तपास यंत्रणादेखील उभी केली आहे. या यंत्रणेने काही कंपाऊंड, मोकळ्या जागा इथे छापेमारी करत काही परदेशी नागरिकांची सुटका करण्यात यशदेखील मिळवले आहे. मात्र कोणत्याही एका तस्करीविरुद्ध अथवा सायबर गुन्हेगाराविरुद्ध ठोस कारवाई करण्यात त्यांना यश मिळालेले दिसत नाही. सरकारी यंत्रणा गुन्हेगारांना सामील असल्याचा आरोप होत असताना, उलट एकही सरकारी अधिकारी अथवा कर्मचारी तस्करीत अथवा सायबर गुन्हेगारीत सामील असल्याचा ठोस पुरावा हाताला न लागल्याचे यंत्रणा सांगत आहे. थायलंड-म्यानमार सीमेवर तर कायदा अस्तित्वात आहे की नाही, अशी परिस्थिती आहे.

अमेरिका, चीन, हिंदुस्थान असे अनेक प्रमुख देश या मानवी तस्करीसंदर्भात जागरूक झाले असून विविध तपास यंत्रणादेखील कार्यरत झाल्या आहेत. तस्करीला बळी पडलेल्यांची सुटका करणे आणि मुख्य म्हणजे नवं नवी सावजे अशा तस्करीला बळी पडू नयेत यासाठी प्रयत्न करणे हे सध्या या यंत्रणांचे प्रमुख ध्येय आहे. मात्र सायबर विश्वातील अनेक तज्ञांच्या मते, देशविदेशातील तपास यंत्रणांबरोबरच सोशल मीडिया कंपन्यांनीदेखील थोडी जागरूकता बाळगण्याची विशेष गरज आहे. मानवी तस्करीसाठी प्रामुख्याने फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअॅप अशा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा सर्रास वापर केला जात आहे. त्यांच्या माध्यमातून आकर्षक जाहिराती, खोटी आश्वासने देणे, गरजू लोकांना शोधून संपर्क करणे अशी कामे प्रामुख्याने केली जात आहेत. अशा खोटय़ा जाहिराती ओळखण्यासाठी, त्या काढून टाकण्यासाठी या कंपन्यांनी अधिक प्रमाणात खर्च करून मजबूत यंत्रणा उभी करण्याची आवश्यकता असल्याचे तज्ञ सांगत आहेत.

कोरोना काळात या आजारासंदर्भात खोटे दावे करणाऱ्या, चुकीची माहिती पसरवणाऱ्या अनेक पोस्ट मेटाने (पूर्वीचे फेसबुक) एकतर काढून टाकल्या किंवा त्यावर लेबल्स लावून लोकांना सावध केले होते. सोशल मीडिया कंपन्या एकत्र येऊन नोकरीसंदर्भातील जाहिरातींची सत्यता तपासण्यासाठी अशीच एखादी यंत्रणा सहज उभी करू शकतात. अशा खोटय़ा जाहिराती लोकांपर्यंत पोहोचल्या नाहीत अथवा त्या खोटय़ा असल्याचे लोकांना लगेच दर्शविण्यात आले तरीदेखील मानवी तस्करीविरुद्धच्या या लढय़ाला भक्कम साथ लाभणार आहे. इतर देशांप्रमाणे हिंदुस्थानमधील काही लोकदेखील अशा तस्करीला बळी पडले आहेत. सायबर तस्करी थेट आपल्या दारापर्यंत पोहोचली आहे. तिच्याशी लढण्यासाठी मोह टाळणे आणि भूलथापांपासून सावध राहणे, आपली वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवणे असे महत्त्वाचे उपाय तातडीने अमलात आणणे गरजेचे.

n [email protected]

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;