Lok Sabha Election 2024 : भाजपला आलेली सत्तेची गुर्मी उतरवा! शरद पवार यांचे आवाहन बीड येथे जाहीर सभा
भाजपला आलेली सत्तेची गुर्मी उतरवा, असे आवाहन बीड येथील जाहीर सभेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केले. मोदी सरकार हे शेतकरी विरोधी सरकार आहे. अशा शेतकरी विरोधी सरकारला हिसका दाखवण्याची हीच वेळ आहे. उद्याच्या निवडणुकीत शेतकरीपुत्र बजरंग सोनवणेंना विजयी करा, असे आवाहन केल्यानंतर आधीच सोनवणेंचं वारं निर्माण झालं होतं. त्यात पवारांच्या बीडच्या सभेने वादळ निर्माण झाले आहे.
महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ शेवटच्या टप्प्यात बीडमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची छत्रपती संभाजी महाराज क्रीडागणावर विराट सभा पार पडली. आपल्या सभेत बोलताना त्यांनी भाजप सरकारवर घणाघाती टीका केली.ते म्हणाले, मोदी सरकारचे शेतकर्यांविषयीचे प्रेम नाटकी आहे. त्यांनी कधी कर्जमाफी केली नाही. व्याजदर कमी केला नाही, शेतीमालाला भाव दिला नाही. मोदी सरकार हे शेतकरीविरोधी सरकार आहे. त्यांना धडा शिकवण्याची गरज निर्माण झाली आहे. मोदींनी जेथे जायला हवे तेथे ते गेले नाहीत. प्रचारासाठी मात्र जिल्ह्याजिल्ह्यात फिरत आहेत. मनिपूर जळत होतं. आया बहिणींची इज्जत चव्हाट्यावर आली होती. तेथे जाऊन मणिपूरच्या जनतेला आधार देण्याचे काम त्यांनी करायला हवे होते. मात्र, मोदी त्या ठिकाणी गेले नाहीत. मोदी सरकारने सामूहिक बलात्कार करणार्या अत्याचार्यांची सजा माफ केली आणि दुसरीकडे प्रामाणिकपणे काम करणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, झारखंडचे मुख्यमंत्री शिबु सोरेन यांना तुरुंगात डांबण्याचे काम केले. त्यांच्यावर केलेली टीका त्यांना सहन होत नाही. त्यांच्यावर टीका केली की तुरुंगात टाकले जाते ही सत्तेची गुर्मी, सत्तेचा माज उतरून टाकण्याची वेळ आली आहे.
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, बीड जिल्हा हा दिलदार लोकांचा जिल्हा आहे. माझ्या आवाहनावर एकदा त्यांनी सर्वच आमदार आमच्या पक्षाचे निवडून दिले होते. पण, सरकार विरोधकांचे होते. शेतकर्यांसाठी झगडणारे क्रांतिवीर क्रांतिसिंह नाना पाटील यांनाही एकदा बीड जिल्ह्याने निवडून दिले होते. त्यांनी निवडणुकीत मिटले फिटले हा नारा दिला होता. ते शब्द पूर्ण करण्यासाठी मी बीडमध्येच शेतकर्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली होती. बीडच्या शेतकर्यांसाठी केलेली ही घोषणा देशभरातल्या शेतकर्यांना फायदा देऊन गेली होती. तब्बल ७१ हजार कोटी रूपयांचे कर्ज आपण कृषिमंत्री असताना देशातील शेतकर्यांना माफ केले होते. मोदींनी शेतकर्यांची तर कधी कर्जमाफी केलीच नाही, मात्र आपल्या हक्कासाठी हरयाणा, पंजाब, उ.प्रदेशमधील आंदोलन करणार्या शेतकर्यांना चिरडून टाकण्याचे काम त्यांनी केले. आंदोलनकर्त्यांना दिल्लीच्या बाहेर रोखून धरले, पाऊस, उन, थंडीत शेतकर्यांचे हे आंदोलन वर्षभर सुरू राहिले. दरम्यान, ७०० शेतकर्यांना मरण प्राप्त झाले. अशा शेतकरीविरोधी राज्यकर्त्यांना या निवडणुकीत धडा शिकवण्याचे काम करा, असे आवाहन त्यांनी केले. तत्पूर्वी माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे, उत्तमराव जानकर, बजरंग सोनवणे, संदीप क्षीरसागर यांचीही भाषणे झाली. व्यासपीठावर महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List