पंतप्रधान मोदींसोबत खुल्या चर्चेला तयार, राहुल गांधींनी स्वीकारलं न्यायमूर्तींचे निमंत्रण
सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मदन लोकूर आणि ए. पी. शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना खुल्या चर्चेचे आवाहन दिले आहे. न्यायमूर्तींनी दिलेले हे आवाहन राहुल गांधी यांनी स्वीकारले आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.
स्वस्थ लोकतंत्र के लिए प्रमुख दलों का एक मंच से अपना विज़न देश के समक्ष रखना एक सकारात्मक पहल होगी।
कांग्रेस इस पहल का स्वागत करती है और चर्चा का निमंत्रण स्वीकार करती है।
देश प्रधानमंत्री जी से भी इस संवाद में हिस्सा लेने की अपेक्षा करता है। pic.twitter.com/YMWWqzBRhE
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 11, 2024
लोकशाहीसाठी देशातील मुख्य पक्षांनी एका मंचावर येऊन आपलं व्हिजन देशासमोर ठेवणं ही एक सकारात्मक बाब आहे. काँग्रेस याचे स्वागत करते व चर्चेचे निमंत्रणही स्वीकारते. देशाचे प्रधानमंत्री देखील या चर्चेत सहभागी होतील अशी अपेक्षा करतो, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मदन लोकूर आणि ए. पी. शहा यांनी हे पत्र लिहिलं आहे. लोकूर आणि शहा यांच्याखेरीज द हिंदू या नियतकालिकाचे माजी संपादक एन. राम यांनीही हे आवाहन केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांना लिहिलेल्या पत्रात असं म्हटलं आहे की, दोघांनाही खुल्या चर्चेचं हे आवाहन निष्पक्षपाती आणि व्यापक राष्ट्रहित साधण्याच्या हेतूने केलेलं आहे. एखाद्या निष्पक्षपाती आणि गैरव्यावसायिक मंचावर अशा जाहीर चर्चेमुळे नागरिकांना खूप फायदा होईल आणि लोकशाहीची प्रक्रिया आणखी मजबूत होईल.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा आणखी महत्त्वाची ठरेल कारण, आपण जगातली सगळ्यात मोठी लोकशाही राज्यव्यवस्था आहोत. त्यामुळे जगभराची नजर आपल्या निवडणुकांकडे आहे. त्यामुळे अशा प्रकारे सार्वजनिक पातळीवर केलेली चर्चा जनतेला राजकीय साक्षर तर बनवेलच पण एक मजबूत आणि जिवंत लोकशाहीचं उदाहरण जगासमोर येईल, असं या पत्रात म्हटलं आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List