मोदी पुन्हा सत्तेत आल्यास इंडिया आघाडीतील बड्या नेत्यांना तुरुंगात टाकण्याचा डाव; अरविंद केजरीवाल यांचा खळबळजनक दावा
केंद्रात नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आल्यास विरोधी पक्षातील अनेक नेत्यांना तुरुंगात टाकण्यात येईल, असा खळबळजनक दावा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. अंतरिम जामीन मिळाल्यानंतर केजरीवाल पक्ष कार्यालयात संवाद साधत होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, हुकूमशाही, भ्रष्टाचार यावर कडाडून टीका केली.
आता मोदी यांचे एकच धोरण ठरले आहे. नव नेशन वन लिडर हे देशासाठी घातक आहे. मोदी यांनी आपल्यासह आपच्या अनेक नेत्यांना अटक केली. हेमंत सोरेन यांनाही तुरुंगात पाठवले. ममता बॅनर्जी यांच्या पक्षाचे अनेक नेते तुरुंगात आहेत. त्यामुळे आता पुन्हा मोदी सत्तेत आले तर तेजस्वी यादव, पिनराई विजयन, ममता बॅनर्जी, एम. के. स्टॅलिन यांच्यासह विरोधी पक्षातील अनेक दिग्गज नेत्यांना तुरुंगात पाठवण्यात येईल, असा दावा केजरीवाल यांनी केला.
विरोधी पक्षांच्या नेत्यांना तुरुंगात टाकण्यासोबतच ते त्यांच्या पक्षाचील नेत्यांनाही संपवणार आहेत. त्यांनी लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, सुमित्रा महाजन, वसुंधरा राजे, मध्य प्रदेशात भाजपला विजय मिळवून देणारे शिवराजसिंह चौहान यांना राजकारणातून संपवले आहे. आता पुढचा क्रमांक योगी आदित्यनाथ यांचा आहे. मोदी पुन्हा सत्तेत आले तर दोन महिन्यात योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रई पदावरून हटवण्यात येतील, असा दावाही केजरीवाल यांनी केला.
केजरीवाल म्हणाले की, हेमंत सोरेन यांनीही राजीनामा द्यायला नको होता, त्यांनी तुरुंगातून सरकार चालवायला हवे होते. भाजप जिथे-जिथे निवडणूक हरतील तिथे त्या ठिकाणच्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकतील आणि सरकार पाडतील. त्यासाठीच आपण मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलेला नाही. आपण हुकूमशाहीविरोधात संघर्ष करत आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील वर्षी 75 वर्षांचे होतील. त्यावेळी लालकृष्ण अडवाणींप्रमाणे भाजप त्यांना निवृत्त करणार का, असा सवालही केजरीवाल यांनी केला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List