…म्हणून तुरुंगात टाकल्यानंतरही मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला नाही, केजरीवाल यांचा मोठा खुलासा
आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन दिला. 1 जूनपर्यंत ते जामिनावर बाहेर असणार आहेत. तुरुंगातून बाहेर येताच केजरीवाल यांना भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. तसेच तुरुंगात टाकल्यानंतरही मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा का दिला नाही याचाही खुलासा केला.
अरविंद केजरीवाल यांना 10 मे रोजी अंतरिम जामीन मिळाला. रात्रीच्या सुमारास त्यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली. त्यानंतर शनिवारी सकाळी त्यांनी हनुमान, शंकराच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि त्यानंतर आपच्या मुख्यालयात पोहोचले. इथे त्यांनी पत्रकार परिषद घेत सरकारवर टीकेचा बाण सोडले. मोदींनी आप सारख्या छोट्या पक्षाला चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला. चार नेत्यांना तुरुंगातही टाकले. पण हा फक्त पक्ष नसून एक विचारधारा आहे, असे केजरीवाल म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, माझ्या मनात कोणत्याही पदाची लालसा नाही. मी मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान बनण्यासाठी राजकारणात आलेलो नाही. आयकर विभागातील नोकरी सोडून दिल्लीमध्ये गेल्या 10 वर्षांपासून काम करतोय. मुख्यमंत्री बनण्यासाठी लोकं नस कापायलाही तयार असतात, पण माझ्यासाठी हे पद महत्त्वाचे नाही.
तुरुंगात टाकल्यानंतरही मी मुख्यमंत्रीपद सोडले नाही, कारण 75 वर्षात पहिल्यांदाच दिल्लीत एका पक्षाला प्रचंड बहुमत मिळाले होते. भाजप दिल्लीमध्ये आपचा पराभव करू शकत नाही. दिल्लीत बहुमताचे सरकार असल्याने भाजपने षडयंत्र रचले. त्यांना वाटले केजरीवाल राजीनामा देईल आणि सरकार पडेल. परंतु मी राजीनामा दिला नाही. लोकशाही निवडून आलेल्या सरकारच्या प्रतिनिधीला तुरुंगात टाकणार असेल, तर सरकारही तुरुंगातून चालेल. भाजपच्या सापळ्यात अडकणार नाही, असे केजरीवाल म्हणाले.
आम आदमी पार्टी जैसी एक छोटी सी पार्टी को कुचलने में प्रधानमंत्री जी ने कोई कसर नहीं छोड़ीI
एक साथ हमारे 4 टॉप लीडर को जेल में डाल दिया, उनको लगा था कि पार्टी खत्म हो जाएगी।
लेकिन AAP सिर्फ एक पार्टी नहीं, एक सोच है, जितना ये खत्म करेंगे, उतनी ही हमारी पार्टी आगे बढ़ेगी।… pic.twitter.com/qQhgwopUyw
— AAP (@AamAadmiParty) May 11, 2024
हेमंत सोरेन यांनाही मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची गरज नव्हती. त्यांनी तुरुंगातून सरकार चालवायचे होते. असेच होत राहिले तर हे (भाजप) ज्या राज्यात निवडणूक हरतील तिथल्या मुख्यमंत्र्याला तुरुंगात टाकतील आणि सरकार पाडतील. म्हणून मी राजीनामा दिला नाही आणि हुकुमशाहीविरोधात शड्डू ठोकून उभा राहिलो, असेरी केजरीवाल म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List