सोनगावात निलेश लंके यांचा प्रचारफलक जाळला; समर्थकांकडून निषेध व्यक्त
नगर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांचा प्रचारफलक राहुरी तालुक्यातील सोनगाव येथे जाळण्यात आला आहे. हे फलक कोणी जाळले, याची माहिती अद्याप मिळालेली नाही. मात्र, विखे समर्थकांनी फलक जाळल्याचा आरोप लंके यांच्या समर्थकांनी केला आहे. विखे समर्थकांच्या पायाखालची वाळू सरकल्याने त्यांनी फलक जाळून लंकेची बदनामी करण्याचे षडयंत्र रचले आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. याबाबत आचारसंहिता कक्ष व राहुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली नसल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय ठेंगे व आचारसंहिता कक्ष प्रमुख गटविकास अधिकारी वैभव शिंदे यांनी दिली.
राहुरी तालुक्यातील सोनगाव येथे दक्षिण नगर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांचे प्रचारफलक लावण्यात आले होते. हे फलक लावल्यानंतर येथे निलेश लंके यांच्या झालेल्या सभेला प्रचंड गर्दी झाली होती. लंके यांना मिळणारे समर्थन पाहून विखे समर्थकांच्या पायाखालची वाळू सरकल्याने विखे समर्थकांकडून हे कृत्य केल्याचा आरोप करण्यात येत आहे.
सोनगावात लंके यांचे फलक जाळण्यापूर्वी गावातील पथदिवे बंद करण्यात आल्याचे स्थानिकांनी सांगितले. हे फलक कोणी जाळले, याबाबत माहिती मिळालेली नाही. मात्र, लंके समर्थकांकडून विखे समर्थकांवर आरोप होत आहेत. लंके यांच्या सभेला प्रचंड गर्दी होत असल्याने विखे समर्थक धास्तावले आहेत. त्यामुळे लंके यांच्या विरोधात षडयंत्र रचून त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप लंके समर्थकांनी केला आहे.
सध्या आचारसंहिता लागू आहे. या काळात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना आचारसंहितेचा भंग होत आहे. उमेदवाराचे फलक फाडणे व जाळणे हादेखील आचारसंहितेचा भंग आहे, असे असतानाही राहुरी तालुक्यातील सोनगावात निलेश लंके यांचा फलक जाळण्यात आला आहे. मात्र, याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात व अचारसंहिता कक्षात कोणीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. लंके समर्थकांनी या घटनेचा निषेध करत पोलिसांनी फलक जाळणाऱ्या व्यक्तींविरोधात कडक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
मतदानातून याचे उत्तर विरोधकांना मिळेल
राहुरीच्या सभेवरुन रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास घरी जाताना फलक चांगल्या स्थितीत होता. रात्री 12.45 वाजण्याच्या सुमारास माझ्या मुलाला फोन आला की, गावातील लंके यांचा फलक जाळण्यात आला आहे. सोनगाव ग्रामपंचायत समोरील हॅलोजन बंद करुन हा फलक जाळण्यात आला. सकाळी गावकऱ्यांनी एकत्र येत फलक जाळण्याच्या घटनेचा निषेध केला. फलक विखे समर्थकांनी जाळण्याचा आरोपही करण्यात आला. जनता मतदानातून या घटनेला सडेतोड उत्तर देईल. या घटनेमुळे विखेंविरोधात नाराजी वाढत असून लंके यांना जनतेचा पाठिंबा मिळत आहे.
– सीताराम पा. दिघे, नेते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष
लंकेचे समर्थन वाढणार
लंके यांचा फलक जाळल्याने काही फरक पडणार नाही. थोड्याशा पैशांसाठी फलक जाळण्याचे काम विखे समर्थकांचे आहे. यामुळे लंकेच्या मतदानाची टक्केवारी वाढणार आहे. मतदार मतदानातून यावर प्रतिक्रिया देतील. लंके यांना जनतेचा पाठिंबा वाढत आहे. त्यामुळे त्यांचे मताधिक्यही वाढणार आहे.
– सतिश दिघे, निलेश लंके समर्थक
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List