Prajwal Revanna case : प्रज्ज्वल रेवन्नाचे ‘सेक्स स्कँडल’ बाहेर काढणाऱ्या भाजप नेत्याला अटक
लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना कर्नाटकमध्ये माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा नातू आणि एनडीएचे उमेदवार प्रज्ज्वल रेवन्ना यांचे सेक्स स्कँडल उघड झाल्याने मोठी खळबळ उडाली. यामुळे भारतीय जनता पार्टी चांगलीच अडचणीत आली. आता याच प्रज्ज्वल रेवन्ना यांचे सेक्स स्कँडल बाहेर काढणारे भाजप नेते जी. देवराजे गौडा यांना अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री उशिरा बंगळुरूहून चित्रदुर्गकडे निघालेले असताना हिरियूर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जी. देवराजे गौडा यांच्याविरोधात एका 36 वर्षीय महिलेने लैंगिक छळाची तक्रार दिली होती. मालमत्ता विकण्यास मदत करण्याचे आमिष दाखवून देवराजे यांनी आपला विनयभंग केल्याची तक्रार पीडितेने दाखल केली होती. त्याआधारे पोलिसांनी देवराजे यांच्याविरोधात आयपीसी कलम 354 (ए), 354 सी, 448, 504, 506, 34 आणि माहिती तंत्रज्ञान कायदा 2008 कलम 66 (ई) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. या तक्रारीनंतर पोलिसांनी चित्रदुर्ग जिल्ह्यातील गुलिहाल टोल नाक्यावर सापळा रचून त्यांना अटक केली.
दरम्यान, देवराजे गौडा यांच्यावर खासदार प्रज्ज्वल रेवन्ना यांचे अनेक महिलांचे लैंगिक शोषण करतानाचे व्हिडीओ व्हायरल केल्याचा आरोप आहे. मात्र त्यांनी हे आरोप फेटाळून लावत यामागे काँग्रेसचा हात असल्याचा दावा केला होता. गौडा यांनीच प्रज्ज्वल रेवन्ना यांच्या कथित लैंगिक शोषणाच्या व्हिडीओवरून भाजपला सावध केले होते आणि त्यांना पुन्हा खासदारकीसाठी तिकीट देऊ नये अशी मागणी केली होती. मात्र गतवर्षी जेडीएससोबत युती केलेल्या भाजपने हसनमधून रेवन्ना यांनाच तिकीट दिले आणि स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या प्रचारासाठी सभाही घेतली होती. मात्र हे सेक्स स्कँडल समोर येताच रेवन्ना विदेशात पळून गेले.
प्रज्वल रेवन्नाने व्हिसाशिवाय देश कसा सोडला; कर्नाटक सरकारकडून ब्लू कॉर्नर नोटीस जारी
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List