उघडले केदारनाथांचे दार! शून्य अंश तापमानात हजारो भाविकांची उपस्थिती
अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर उत्तराखंडच्या चारधाम यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे. सकाळी 6.55 वाजता केदारनाथचे दरवाजे उघडण्यात आले. शुक्रवारी, 29030 भाविकांनी बाबा केदारनाथचे दर्शन घेतले. केदारनाथ पाठोपाठ गंगोत्री आणि यमुनोत्रीचे दरवाजेही उघडण्यात आले. तीनही धाम भव्य प्रमाणात सजवण्यात आले आहेत. 12 मे रोजी सकाळी 6 वाजता बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडतील. विधिवत हवन, पूजापाठ, मंत्रोच्चार आणि धार्मिक प्रथेपरंपरेने चारधाम यात्रेचा आज शुभारंभ झाला. या ठिकाणी दिवसाचे तापमान शून्य ते 3 अंशांवर नोंदवले जात आहे. त्याचवेळी रात्रीचा पारा उणेपर्यंत पोहोचत आहे. असे असतानाही सुमारे दहा हजार भाविक केदारनाथ धामपूर्वी 16 किमी अंतरावरील गौरीकुंडात पोहोचले आहेत. गंगोत्री धामजवळ सुमारे पाच हजार, तर यमुनोत्री धामजवळ सुमारे सहा हजार यात्रेकरू पोहोचले.
दररोज किती भाविकांना दर्शन
पर्यटन सचिव सचिन कुर्वे यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका दिवसात 15 हजार भाविक केदारनाथ धामला, 16 हजार लोक बद्रीनाथ धामला, 9 हजार भाविक यमुनोत्रीला आणि 11 हजार लोकांना दर्शन घेता येणार आहे. म्हणजेच दररोज 51 हजार लोक चारधामला भेट देतील.
पहिल्यांदाच 400 हून अधिक डॉक्टर तैनात
चारधाम यात्रा मार्गावर प्रथमच 400 हून अधिक डॉक्टरांना तैनात करण्यात आले. यामध्ये 256 आपत्कालीन वैद्यकीय अधिकारी आणि तज्ञ डॉक्टरांचा समावेश आहे. चारही धाम तीन हजार मीटरच्या वर आहेत आणि पर्वतांवर अधूनमधून बर्फवृष्टी होत आहे.
15 हजारांहून अधिक प्रवासी हरिद्वार आणि ऋषिकेशला पोहोचले आहेत. चारधाम यात्रेसाठी आतापर्यंत 22.15 लाखांहून अधिक भाविकांनी नोंदणी केली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List