भयंकर! आईला गोळ्या घातल्या, पत्नीला हातोड्यानं मारलं; 3 मुलांना छतावरून फेकलं, नंतर स्वत: केली आत्महत्या
उत्तर प्रदेशमध्ये एका वेडसर तरुणाने आई, पत्नी आणि मुलांची हत्या करून स्वत:ही आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आरोपीने आधी गोळ्या घालून आईला ठार केले, त्यानंतर पत्नीवर हातोड्याने वार करत तिला संपवला. मग लहान मुलांना छतावरून फेकून त्यांचाही जीव घेतला आणि स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केली. सितापूर जिल्ह्यातील मथुरा पोलीस स्थानकाच्या हद्दीत येणाऱ्या पल्हापूर गावात ही भयंकर घटना घडली आहे.
‘आज तक’ने दिलेल्या वृत्तानुसार, पल्हापूर गावातील शेतकरी कुटुंबातील अनुराग सिंह याने शुक्रवारी रात्री हे हत्याकांड केले. मानसिक रुग्ण असलेल्या अनुरागने आई सावित्री देवी (वय – 62), पत्नी प्रियंका सिंह (वय – 40), मोठी मुलगी अश्विनी (वय – 12), मधली मुलगी अश्वी (वय – 10) आणि सर्वात लहान मुलगा अद्वैत (वय – 6) यांची हत्या केली. त्यानंतर स्वत: गोळी झाडून आत्महत्या केली.
शनिवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर संपूर्ण गावात खळबळ उडाली. याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले.
या हत्याकांडाबाबत माहिती देताना सीतापूरचे एसएसपी चक्रेश मिश्र यांनी सांगितले की, आरोपी मानसिक रुग्ण आणि वेडसर होता. तसेच त्याला नशा करण्याची सवय होती. कुटुंबीय त्याला नशामुक्ती केंद्रात घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करत होते. यातूनच शुक्रवारी रात्री मोठा राडा झाला आणि त्यानंतर हे हत्याकांड घडले. सध्या घटनास्थळी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List