“मोदी ब्रँड महाराष्ट्रच नव्हे तर देशातून संपलेला, कितीही आदळआपट केली तरी…”, संजय राऊत यांचा घणाघात
पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात 27 सभा घेत आहेत. त्यातील 7-8 सभा मुंबईत घेत आहेत. कारण त्यांच्यासोबत असलेल्या नकली शिवसेनेचा आणि अजित पवारांच्या नकली शिवसेनेचा त्यांना काहीही फायदा होणार नाही. मुख्य म्हणजे स्वत: मोदी हा ब्रँड महाराष्ट्रच नव्हे, तर देशातून संपलेला आहे. त्यामुळे कितीही आदळआपट करा, सभा घ्या, भाषण करा, आमच्या नावाने बोटं मोडा, दाढी खाजवा त्याने काहीही होणार नाही, असा जबरदस्त घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी नाशिक येथे पत्रकारांशी संवाद साधताना केला.
महाराष्ट्रात महाविकास आघाडी 35 ते 40 जागा जिंकत आहे. मोदींनी येथे ठाण मांडून बसले, मुंबईत तात्पुरते घर घेऊन राहिले तरी त्याचा काहीही फायदा होणार नाही. आम्ही महाराष्ट्र आणि देशही जिंकतोय, असा ठाम विश्वास खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरही जोरदार प्रहार केला. अमित शहा, नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात पाय ठेवू देऊ नका, ते महाराष्ट्राचे, मराठी माणसाचे शत्रू आहे असे सांगणारे आता त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात याबद्दल ईडीचे विशेष आभार, असा टोला राऊत यांनी लगावला.
ते पुढे म्हणाले की, काही नेते आणि काही पक्षांची फार दखल घ्यावी अशी महाराष्ट्रातील स्थिती नाही. सध्या महाराष्ट्रात आणि देशात संविधान वाचवण्याची मोठी लडाऊ सुरू आहे. लोकशाही, स्वातंत्र्य आणि संविधान धोक्यात आलेले असताना हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, शीख, बौद्ध यासह सर्व जाती, धर्माचे, पंथाचे लोकं संविधान वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरू इच्छितात आणि मतदानाच्या माध्यमातून सत्ता परिवर्तन करू इच्छितात. अशावेळी राज ठाकरे महाराष्ट्रद्रोही नरेंद्र मोदी आणि अमित शहांच्या मांडीला मांडी लावून बसत असतील तर प्रबोधनकार ठाकरे आणि हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला किती यातना होत असतील याती कल्पनाच न केलेली बरी.
ठाकरे कुटुंबाने महाराष्ट्राच्या अखंडतेसाठी, निर्मितीसाठी, स्वाभिमानासाठी आपले संपूर्ण जीवनाचे समर्पण केले आहे. मराठी माणसाला ताकद दिली. त्यात कुटुंबातील व्यक्ती महाराष्ट्रावर औरंगजेबी वृत्तीने चाल करून येणाऱ्या लोकांना मदत करू इच्छित असेल तर प्रबोधनकार ठाकरे आणि हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पवित्र आत्मा अस्वस्थ होत असेल, असेही राऊत म्हणाले.
17 तारखेला केजरीवाल मुंबईत
मुंबईत 20 मे रोजी मतदान होत असून 17 तारखेला लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीची सांगता सभा आहे. या सभेसाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आमंत्रित करण्यात आले असून त्यांनी येण्याचेही मान्य केले आहे. 17 तारखेला नरेंद्र मोदी हे देखील मुंबईत असून त्याचवेळी महाविकास आघाडीच्या मंचावर केजरीवालही असतील, असेही राऊत यांनी सांगितले.
भूमरे, गोडसे तिसऱ्या क्रमांकावर राहतील
संभाजीगनरची जागा परंपरेने हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची म्हणजेच आमची असून चंद्रकांत खैरे प्रचंड मताधिक्क्याने जिंकत आहेत. संदिपान भूमरे तिसऱ्या क्रमांकावर राहतील. तसेच नाशिकमध्येही होईल. नाशिकची भूमिका गद्दारांना थारा देत नाही. ज्या शिवसेनेने गोडसे यांना दोन वेळा खासदार केले, प्रतिष्ठा दिली त्या शिवसेनेच्या पाठीत त्यांनी खंजीर खुपसला. राजाभाऊ वाजे येथून तीन ते चार लाख मताधिक्क्याने विजयी होती, तर गोडसे यांच्यापेक्षा जास्त मते शांतीगिरी महाजारांना मिळतील, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List