पिंपोडे-बुद्रूकमध्ये मतदारांना पैशांचे वाटप; राजकीय दबावातून पोलिसांनी फिर्यादीलाच ठरविले आरोपी
कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे बुद्रूक येथे लोकसभा निवडणुकीत मतदारांना पैसेवाटप करत असल्याच्या संशयावरून दोन राजकीय गटांत हाणामारी झाली होती. त्यानंतर घडलेल्या प्रकाराची तक्रार देण्यासाठी आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील फिर्यादीलाच आरोपी करत त्यांच्यावर राजकीय दबावातून गुन्हे दाखल करण्यात आल्याने पिंपोडे बुद्रूक गावात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गावाला पोलीस छावणीचे स्वरूप आले असून, गावात तणाव आहे.
लोकसभा निवडणुकीत आपल्या उमेदवाराला मतदान करावे म्हणून काहीजण मतदारांना पैसेवाटप करत असल्याची माहिती गावातील कार्यकर्त्यांना समजली. त्यानंतर या कार्यकर्त्यांनी संबंधित ठिकाणी जाऊन पैसे वाटप होत आहे किंवा नाही, याबाबत खात्री करताना दोन्ही गटांत बाचाबाची झाली. या बाचाबाचीचे रूपांतर मारामारीत झाले. त्यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिकांनी ही माहिती वाठार स्टेशन पोलिसांना दिली होती.
मतदानाच्या आदल्या दिवशी म्हणजे सोमवारी (दि. 6) ही घटना घडल्याने राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनसमोर मोठी गर्दी केली होती. दरम्यान, कोरेगावच्या उपविभागीय पोलीस अधिकारी सोनाली कदम यांनी शांतता व सुव्यवस्था ठेवण्यासाठी गावात भेट दिली. मंगळवारी (ता. 7) मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. या पार्श्वभूमीवर गावात गेले दोन दिवस पोलिसांचे पेट्रोलिंग सुरू आहे. आज दुपारी वाठार पोलीस व एसआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत. भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, आमदार जयकुमार गोरे यांनी, तर गुरुवारी माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी स्थानिक कार्यकर्त्यांना भेटून घटनेबाबत माहिती घेतली.
माढा लोकसभा मतदारसंघात कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील 16 गावांचा समावेश होतो. येथील जवळपास 33 हजार मतदार मते माढा लोकसभा मतदारसंघाला जोडली आहेत. त्यामुळे या मतदासंघातील मतदारांना पैसे देऊन मतदान वळवण्यासाठी आलेल्या लोकांना या भागातील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पकडून त्यांना चोप दिला आणि पोलीस ठाणे दाखवले. मात्र, या पोलीस ठाण्यात राजकीय दबाव वाढल्याने पैसे वाटणारे बाजूला राहिले आणि ज्यांनी पैशांची चोरी उघड केली, त्यांच्यावरच पैसे लुटल्याची तक्रार दाखल झाल्याने ‘चोर सोडून संन्याशाला फाशी’, अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, गावात आजही तणावपूर्ण शांतता असून, पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List