जगभरातून थोडक्यात आणि सुटसुटीत बातम्या
विमानात जागेसाठी जुगाड
विमान प्रवासाचे अनेक हटके व्हिडियो, फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यावर नेटीजन्स भरभरून प्रतिक्रियाही देत असतात. असाच एक व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होतोय. हा व्हिडियो एका महिलेच्या विमान प्रवासाचा आहे. त्यामध्ये महिला चक्क विमानातील वरच्या लगेज कंपार्टमेंटवर झोपलेली दिसत आहे. या व्हिडियोबद्दल कोणत्याही विमान कंपनीकडून खुलासा करण्यात आलेला नाही.
झिपलाइनवरून पडून महिलेचा मृत्यू
इटलीत झिपलाइनवरून 60 फूट खाली पडून एका 41 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. गिझलेन मुताहिर असे या महिलेचे नाव आहे. ही महिला आपल्या कुटुंबासोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी लोम्बार्डोच्या फ्लाय इमोशन पार्कमध्ये आली होती. अपघाताच्या वेळी मुताहिरच्या दोन भाच्याही त्यांच्या सोबत होत्या. त्यांनी संपूर्ण घटनेचा व्हिडीओ बनवला आहे.
जन्मदर घसरल्याने आणीबाणी
दक्षिण कोरियामध्ये जन्मदर घसरल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. देशात आणीबाणीसारखी परिस्थिती आहे, असे सांगून सरकारने जन्मदर वाढवण्यासाठी एका मंत्रालयाची घोषणासुद्धा केली आहे. दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती युन सुक योल यांनी गुरुवारी जन्मदर सुधारण्यासाठी संसद सहकार्य करणार असल्याची घोषणा केली आहे.
रोजगारासाठी हाय वोल्टेज ड्रामा
उत्तर प्रदेशातील हरदोई जिह्यात एक महिला अंगावर डिझेल टाकून आणि गळय़ात फाशीचा दोरखंड अडकवून झाडावर चढली. महिलेने स्वतःला जाळून घेण्याची धमकी दिली आणि जोरदार हंगामा केला. शिवरानी असे या महिलेचे नाव आहे. शिवरानीच्या म्हणण्यानुसार, ती स्वयं सहायता गटात सखी म्हणून काम करते. ब्लॉक मिशन मॅनेजरने तिला कामावरून काढून टाकल्याने तिने हा ड्रामा केला.
अमेरिकेत कृष्णवर्णीय सैनिकाची हत्या
अमेरिकन पोलिसांनी कृष्णवर्णीय सैनिकाची हत्या केली. रॉजर फोर्टसन असे कृष्णवर्णीय हवाई दलाच्या सैनिकाचे नाव आहे. मृताच्या कुटुंबीयांनी सांगितले की, तक्रारीची चौकशी करण्यासाठी आलेला पोलिस चुकीच्या घरात घुसला होता, त्यानंतर त्याने 23 वर्षीय रॉजरला दारातच गोळ्या घातल्या. अमेरिकन पोलिसांनी हे आरोप फेटाळून लावले. स्वसंरक्षणासाठी गोळीबार केल्याचे सांगितले.
ब्राझीलमध्ये पावसाचा कहर, 100 ठार
ब्राझीलमध्ये मुसळधार पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. ब्राझीलच्या दक्षिण येथील रियो ग्रेनेड डो सुल राज्यात आठवडाभरापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसात जवळपास 100 लोकांचा मृत्यू झाला असून 15 लाख लोकांना या पावसाचा फटका बसला. 130 लोक अजूनही बेपत्ता आहेत. दोन लाख लोकांनी आपले घर सोडले आहे. घरात, रस्त्यांवर पाणीच पाणी झाले आहे. ब्राझीलच्या सिव्हिल डिफेन्स एजन्सीनुसार, पावसामुळे आतापर्यंत जवळपास एक लाखांहून जास्त घरे पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहेत. ब्राझीलमध्ये 29 एप्रिलपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. रियो ग्रेनेड डो सुल राज्यातील 497 शहरांपैकी 414 शहरांत पूर आला आहे.
जन्मठेपेचे नऊ कैदी झाले बारावी पास
गुजरातच्या सुरतमधील लाजपोर कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले नऊ कैदी हे बारावी पास झाले आहेत. या कैद्यांनी नुकतीच बारावीची परीक्षा दिली होती. या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यात हे नऊ कैदी परीक्षा पास झालेत. कारागृहातील नऊ कैदी परीक्षेला बसले ते सर्व पास झाल्याने लाजपोर कारागृहाचा निकाल 100 टक्के लागल्याची माहिती कारागृहाचे प्रमुख जाशुआ देसाई यांनी दिली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List