छत्तीसगड – बिजापूरमध्ये सुरक्षा दलाची मोठी कारवाई, 12 नक्षलवाद्यांचा खात्मा
छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यातील पीडिया गावाजवळील जंगलामध्ये शुक्रवारी सुरक्षा दलाच्या जवानांनी नक्षलवाद्यांविरुद्ध धडक कारवाई केली. या कारवाईमध्ये 12 नक्षलवाद्यांचा खात्मा झाला. जवानांनी नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले असून त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीमध्ये सुरक्षा दलाचे दोन जवान जखमी झाल्याचीही माहिती मिळतेय. छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साई आणि डीआयजी कमलोचन कश्यप यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
#WATCH | Chhattisgarh CM Vishnu Deo Sai says, “An encounter broke out with the Naxals in Gangaloor area of Bijapur district…12 dead bodies of the Naxals have been found. I congratulate our jawans & senior officers…” https://t.co/OXMg9oAXUO pic.twitter.com/I9woGLlGRf
— ANI (@ANI) May 10, 2024
बिजापूर जिल्ह्यातील गांगलूर भागात सुरक्षा दलाच्या जवानांची नक्षलवाद्यांसोबत धुमश्चक्री उडाली. या चकमकीमध्ये 12 नक्षलवाद्यांचा खात्मा झाला असून त्यांचे मृतदेहही हस्तगत करण्यात आले आहेत. या मोहिमेत सहभागी जवान आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मी अभिनंदन करतो, असे मुख्यमंत्री विष्णुदेव साई म्हणाले.
सुकमा, बिजापूर आणि दंतेवाडा येथील डीआरजी आणि कोब्रा फोर्सच्या 210 बटालियन व एसटीएफच्या जवानांनी नक्षलवाद्यांविरुद्ध सर्च ऑपरेशन राबवले होते. यादरम्यान ही चकमक उडाली. चकमकीनंतर घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात स्फोटकं आणि दारूगोळा जप्त करण्यात आल्याचेही ते म्हणाले.
दरम्यान, याआधी बस्तरचे डीआजी कमलोचन कश्यप यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, चकमक उडालेल्या भागामध्ये अद्यापही सर्च ऑपरेशन सुरू आहे. पोलीस दल आणि जवान अजूनही जंगलात नक्षलवाद्यांचा शोध घेत आहे. सदर चकमक गांगलूर पोलीस स्थानकाच्या हद्दीत येणाऱ्या पीडिया गावातील जंगलामध्ये झाली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List