जनतेच्या स्वप्नांचा नरेंद्र मोदींनी चुराडा केला; भास्कर जाधव यांचा हल्लाबोल
नरेंद्र मोदींनी मागील दोन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये जनतेला अनेक मोठी आश्वासने दिली होती. जनता मोदींच्या आश्वासनांच्या स्वप्नात होते. मात्र, मोदींनी गेल्या 10 वर्षांत जनतेच्या सर्व स्वप्नांचा चुराडा करत देशाला महागाई, बेरोजगारीच्या खाईत लोटले आहे. नगर लोकसभा मतदारसंघात विखेंच्या बलाढ्य धनशक्तीसमोर निलेश लंकेंची जनशक्ती भारी ठरणार आहे. निलेश लंके खासदार होणारच, असा विश्वास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार भास्कर जाधव यांनी व्यक्त केला.
महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारासाठी जामखेड शहरात प्रचार सभा घेण्यात आली. यावेळी भास्कर जाधव म्हणाले की, निलेश लंकेंचा विजय लोकशाही व संविधानाचा विजय असणार आहे. मोदींकडे विकासाचा मुद्दा नाही म्हणून भावनिक मुद्दे पुढे करतात पुलवामा हल्ल्यात आपले 42 जवान नाहक मारले गेले. देशावर शोककळा असताना पंतप्रधान चित्रीकरणात व्यस्त होते. आपणास भावनिक राजकारण करून दोन वेळा गंडवले आहे. आपले पक्ष फोडणाऱ्यांना जनता कदापी माफ करणार नाही मोदी सरकार चारशोपार नाही तर तडीपार होणार आहे, असा घणाघातही जाधव यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, भाजपाने पवार कुटुंबियांना इडीचा त्रास दिला. त्यांनी आपल्यासोबत यावे म्हणून दाबाव आणला पण रोहित पवार घाबरले नाहीत, त्यांनी या सर्वांचा सामना केला. भाजपने जीएसटीच्या रूपाने आपला खिसा कापला आहे. सगळ्या वस्तूवर जीएसटी लावला आहे. आतापर्यंत आपली भरपूर लूट केली आहे. भाजपच्या काळात देश आराजकतेकडे चालला आहे. पंचवीस लाख कोटी रुपये उद्योगपतींची कर्जे माफ केली आहेत. पण सर्व सामान्य जनतेचे हाल होत आहेत, असेही ते म्हणाले.
रोहित पवार म्हणाले की, विखे वर नाराज असणारे प्रा. राम शिंदे प्रवरेवरून खाऊ आल्यावर विखे चा प्रचार करू लागले. आमदार प्रा. राम शिंदे यांच्या माझ्या विरोधातील वक्तव्यास अजित दादांनी चूना लावला. कोरोना काळात जनतेला धीर देण्याऐवजी शिंदे यांना बंगल्यातील झाडे महत्त्वाची वाटली. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ते माझ्या समोर उभेच राहू शकणार नाहीत. माझे काम जनतेच्या हृदयात आहे. त्यामुळे माझा पराभव त्यांना शक्य नाही, असेही ते म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List