कोल्हापुरात मिंधे गटाच्या जिल्हाप्रमुखाची पत्रकाराला मारहाण, मुरगुडच्या राजेखान जमादारला अटक करा
‘भरचौकात बायकांनी मारहाण केल्याची बातमी का लावली?’ म्हणून मिंधे गटाचा जिल्हाप्रमुख व मुरगुडचा माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार याने साथीदारांसह पत्रकाराला मारहाण केल्याची गंभीर घटना गुरुवारी (9 रोजी) सायंकाळी घडली. याप्रकरणी संबंधित पत्रकाराने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला असता, पोलीस ठाण्याबाहेर बेकायदेशीर जमाव जमवून पत्रकारांवर प्रचंड दबाव आणि दहशत माजविण्याचा प्रयत्नही त्याने केला गेला. मात्र, पत्रकारांनी संघटित होऊन राजेखान जमादार आणि मारहाण करणाऱयांवर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत मुरगुड पोलीस ठाण्यात मध्यरात्री गुन्हा दाखल केला.
दरम्यान, पत्रकाराला मारहाण केल्याचे पडसाद आज जिह्यातील सर्व ग्रामीण भागातही उमटले. ग्रामीण भागातील अनेक पत्रकार संघटनांकडून निदर्शने करण्यात आली. कोल्हापुरातील पत्रकारांची मातृसंस्था असलेल्या कोल्हापूर प्रेस क्लबने याची दखल घेऊन गुंड प्रवृत्तीच्या राजेखान जमादार याचा तीव्र शब्दांत निषेध केला. तसेच अटकेच्या मागणीसाठी दसरा चौक येथे निदर्शने करण्यात आली.
एक-दोन आठवडय़ांपूर्वी कागल तालुक्यातील मुरगुड येथे दोन घरांतील कौटुंबिक जमिनीच्या वादातून संतप्त महिलांनी राजेखान जमादार याला भरचौकात चोपले होते. यासंदर्भात मुरगुडचे पत्रकार प्रकाश तिराळे यांनी कोणाचेही नाव न घेता बातमी लावली होती. त्यानंतर ‘बायकांनी चोप दिलेला तो नेता कोण?’ अशी चर्चा सर्वत्र होत होती. गुरुवारी (9 रोजी) सायंकाळी पत्रकार तिराळे यांना मारहाण केल्यामुळे तो नेता म्हणजेच राजेखान जमादार असल्याचे समोर आले. प्रकाश तिराळे यांना जमादार आणि त्याच्या साथीदारांनी मारहाण केली. तसेच काही अंतर फरफटतही नेले. या घटनेची माहिती मिळताच खळबळ उडाली.
मुरगुड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेलेले पत्रकार प्रकाश तिराळे यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे कोल्हापुरातून काही पत्रकार पोलीस ठाण्यात दाखल झाले. तरीसुद्धा रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांचा बेकायदेशीर जमाव जमवून पत्रकारावर दबाव आणि दहशत माजविण्याचा प्रयत्न जमादार गटाकडून करण्यात आला. या दहशतीला भीक न घालता अखेर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार राजेखान कादरखान जमादारसह आसिफखान ऊर्फ मॉण्टी असदखान जमादार आणि संदीप अशोक सणगर (तिघे. रा. मुरगुड, ता. कागल) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
पत्रकारांकडून निषेध; दसरा चौकात निदर्शने
n पत्रकाराला मारहाण झाल्याच्या घटनेची गंभीर दखल घेत कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीने आज गुंड प्रवृत्तीच्या राजेखान जमादार याचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. तसेच तातडीने अटकेच्या कारवाईसाठी ऐतिहासिक दसरा चौक येथे तीव्र निदर्शने केली. ‘जमादार यांना अटक करा’, ‘नहीं चलेगी नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी’ अशा घोषणा देत पत्रकारांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे, उपाध्यक्ष प्रशांत आयरेकर, कार्याध्यक्ष दिलीप भिसे, विश्वास पाटील, सुखदेव गिरी, तानाजी पोवार, समीर मुजावर, उमाकांत नलवडे, भारत चव्हाण, रणजित माजगावकर, सुनील पाटील, विजय पाटील, राहुल जाधव, रवि कुलकर्णी, दयानंद लिपारे, रणजित माजगावकर, सचिन सावंत, विश्वास कोरे, संदीप खांडेकर, संतोष मिठारी, महेश कांबळे आदी उपस्थित होते.
प्रेस क्लबचे शिष्टमंडळ मुरगुडमध्ये जाणार
n राजेखान जमादार याची भाषा मग्रुरीची आहे. त्याची ही दहशत मोडून काढण्यासाठी, तसेच गुन्हा दाखल होऊनही अटकेची कारवाई होत नसल्याने कोल्हापूर प्रेस क्लबकडून पूर्ण ताकतीनिशी पत्रकार प्रकाश तिराळे यांच्यामागे उभे राहण्याची भूमिका घेतली आहे. यासाठी कोल्हापूर प्रेस क्लबचे शिष्टमंडळ दोन दिवसांत मुरगुड येथे जाऊन तिराळे यांना पाठबळ देणार आहे, असे कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे यांनी सांगितले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List