50 हजार बेरोजगारांना मिंधे सरकारने दाखवला ठेंगा, हायकोर्टात बैठकीचा तपशील सादर
तब्बल 50 हजार बेरोजगारांची अपेक्षेप्रमाणे मिंधे सरकारने घोर निराशा केली आहे. बेरोजगारांच्या मुंबई शहर समितीला सफाईच्या कंत्राटात सामावून न घेणारी महापालिकेची निविदा प्रक्रिया योग्य असल्याचा निष्कर्ष मिंधे सरकारने काढला आहे. रीतसर प्रशासकीय बैठकीत हा निष्कर्ष काढण्यात आला. त्याची माहिती शुक्रवारी उच्च न्यायालयात देण्यात आली.
मुख्य न्यायाधीश देवेंद्र पुमार उपाध्याय व न्या. आरीफ डॉक्टर यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. सरकारी वकील अभय पत्की यांनी या बैठकीचा तपशील न्यायालयात सादर केला. मिंधे सरकारच्या निष्क्रियतेवर न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. या बैठकीतील निष्कर्षाला समिती आव्हान देणार आहे. त्यास न्यायालयाने परवानगी दिली. या बैठकीचे सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश न्यायालयाने मिंधे सरकारला दिले आहेत. यावरील पुढील सुनावणी 9 जुलै 2024 रोजी होणार आहे.
100 मार्ग आहेत, पण तुमची इच्छा नाही
2002च्या अध्यादेशानुसार बेरोजगारांना काम द्यायला हवे. या अध्यादेशाची अंमलबजावणी करण्यासाठी 100 मार्ग आहेत. पण सरकारची इच्छा नाही. पालिकेची निविदा प्रक्रिया योग्य आहे हे कोणत्या आधारावर ठरवले गेले, अशी विचारणा आम्ही केली होती. प्रशासनाने थेट बैठकीचा तपशील सादर केला. हा तपशील मराठीतून आहे. यावरून स्पष्ट दिसते की सरकार बेरोजगारांना काम देण्यास किती तत्पर आहे, असे खडेबोल न्यायालयाने सुनावले.
मिंधे सरकारचा दुटप्पीपणा
बेरोजगारांच्या समितीला पंत्राटात सामावून न घेणारी निविदा प्रक्रिया योग्य असल्याचा निष्कर्ष बैठकीत काढण्यात आला. पण शासनाच्या 2002च्या अध्यादेशाची अंमलबजावणी पालिकेने करायला हवी, असेही या बैठकीत ठरले, असे मिंधे सरकारने सादर केलेल्या तपशीलात नमूद आहे.
चांगल्या दिलाचा अधिकारी काम देईल
बेरोजगारांना सफाईचे काम देण्याची सूचना आम्ही महापालिकेला करत आहोत. ही सक्ती नाही. पण कोणीतरी चांगल्या दिलाचा अधिकारी असेल जो बेरोजगारांना काम देईल, अशी अपेक्षा न्यायालयाने व्यक्त केली. ही निविदा प्रक्रिया पालिकेने पूर्ण करावी. पंत्राट द्यावे. मात्र या याचिकेवर जे अंतिम आदेश दिले जातील ते पालिकेवर बांधील असतील, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List