मोदी डोळा मारताहेत, पण शिवसेना तुम्हाला इंगा दाखवणारच! उद्धव ठाकरे यांनी ठणकावले
प्रचंड पोलीस बंदोबस्तात राहणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आता विरोधक मला संपवायला निघालेत असे म्हणू लागले आहेत. पराभवाची चाहूल लागल्याने मोदींची अवस्था केविलवाणी झाली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी पह्डली तरी कधी मला डोळा मार तर कधी शरद पवारांना डोळा मार, हे सुरूच आहे. मोदींनी डोळा जरी मारला असला तरी शिवसेना पुन्हा भाजपला पाठिंबा देणार नाही, असे ठणकावून सांगतानाच, महाराष्ट्र डोळय़ादेखत लुटला जात असेल तर नकली संतान म्हणताय त्या शिवसेनाप्रमुखांच्या पुत्राचा इंगा तुम्हाला दाखवतोच, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी आज छत्रपती संभाजीनगरातील विराट सभेत दिला.
छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारासाठी मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदानावर आज सभा झाली. या सभेला अलोट गर्दी उसळली होती. याच गर्दीच्या साक्षीने उद्धव ठाकरे यांनी मोदी, भाजप आणि गद्दारांचा समाचार घेतला. अक्षय तृतीया, परशुराम जयंती आणि बसवेश्वर महाराजांची जयंती अशा तीन मुहूर्तांच्या संयुक्त योगावर महाविकास आघाडीची सभा होतेय, त्यामुळे विजय निश्चित आहे, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
जालनावासीयांना केले आवाहन
पावसामुळे जालनातील सभेला जाता न आल्याने यावेळी उद्धव ठाकरे यांनी जालनाकरांची माफी मागितली. पण ही सभा चंद्रकांत खैरेंना विजयी करण्यासाठी आहे तशीच जालनातील डॉ. कल्याण काळे यांना विजयी करण्यासाठीही आहे, असे ते म्हणाले. जालनातील मतदार गेली पाच टर्म म्हणजे आयुष्यातील 25 वर्षे रावसाहेब दानवे यांना निवडून देत आहेत. जालनात काही मतदानकार्डे कचऱयाच्या पेटीत सापडली. मतदान करायचे कशाला असे मतदारांना वाटले असेल. म्हणजे ती 25 वर्षे फुकट गेली, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी दानवेंना चपराक लगावली. जालनाकरांनो, रावसाहेबांना म्हणा, जा बाबा आता. आता आम्हाला जालनाकरांचे कल्याण करायचेय, असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केले. जालनामध्ये सकाळी आठ वाजता नळ उघडला की दूध येते, दहा ते बारा पाणी येते म्हणतात मग छत्रपती संभाजीनगरमध्ये जो गुत्तेदार गद्दार उभा आहे त्याचा नळ उघडला तर काय येईल? तुम्हाला दारूवाला हवाय की पाणीवाला? अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी संभाजीनगरातील महायुतीचे उमेदवार सांदिपान भुमरे यांच्यावरही निशाणा साधला.
मोदींना एअरफोर्सची विमाने देता, मग इतरांनाही द्या
मोदी प्रचंड बंदोबस्तात शहेनशाहसारखे फिरताहेत. प्रचारासाठी एअरफोर्सच्या विमानांतून जातात. त्यांच्यासाठी हवेतही ट्रफिक जॅम आणि रस्त्यावरही. लोकशाहीमध्ये निवडणुका येतात तेव्हा पंतप्रधान, मुख्यमंत्री काळजीवाहू असला पाहिजे. त्यालाही इतरांप्रमाणेच न्याय लावला पाहिजे, असे शिवसेनाप्रमुख म्हणायचे. मोदींना जर एअरफोर्सची विमाने दिली जात असतील तर मग ती अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरेनाही दिली पाहिजेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
मोदींची भाषा महाराष्ट्र खपवून घेणार नाही
मोदी जी भाषा वापरतात ती महाराष्ट्र कदापि खपवून घेणार नाही असे त्यांनी ठणकावून सांगितले. महाराष्ट्र हा साधुसंतांचा आहे. पंढरपूरच्या वारीतही फुगडय़ा खेळल्यानंतर एकमेकांच्या पाया पडून आशीर्वाद घेण्याची, शुभेच्छा देण्याची प्रथा-परंपरा महाराष्ट्रात आहे हे लक्षात ठेवा, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
मोदींचे नाणे बंद करणार
एका रात्रीत अचानक मोदींनी नोटाबंदी केली. आता महाराष्ट्र नाणेबंदी करणार आहे. मोदींचे नाणे 4 जून रोजी महाराष्ट्र बंद करणार आहे. मतमोजणीनंतर पंतप्रधान नाही फक्त मोदीच राहणार असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
मोदींना कळून चुकलेय की आता दिल्ली बघत नाही
पंतप्रधान मोदींनी शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली तरीही कधी मला डोळा मार, कधी शरद पवारांना डोळा मार असे त्यांचे चाललेय. आज सकाळी त्यांनी पवारांना डोळा मारून सांगितले की या भाजपबरोबर. एका ठिकाणी बोलायचे नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी काँग्रेस आणि मग म्हणायचे, आजा मेरी गाडी मे बैठ जा! अशी खिल्ली उद्धव ठाकरे यांनी उडवली. मोदी एवढे घाबरलेत की आता त्यांना कळून चुकलेय दिल्ली बघत नाहीत आणि महाराष्ट्रही त्यांना दिल्ली बघू देणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.
याप्रसंगी व्यासपीठावर खासदार चंद्रकांत हंडोरे, आमदार पैलास पाटील, उदयसिंग राजपूत, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, मराठवाडा सचिव अशोक पटवर्धन, सहसंपर्कप्रमुख त्र्यंबक तुपे, विजय साळवे, अॅड. आसाराम रोठे, माजी खासदार सुभाष वानखेडे आदी उपस्थित होते.
तुमचा आत्मा सैतानाला विकलात का?
शिवतीर्थावर महाविकास आघाडीच्या संयुक्त सभेमध्ये कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अदृष्य शक्तीला संपवण्याचे आवाहन केले होते. त्या सभेला उद्धव ठाकरे हेसुद्धा उपस्थित होते. त्यावरून मोदींनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. बाळासाहेबांच्या आत्म्याला काय वाटले असेल, असे ते म्हणाले होते. त्याचा समाचारही यावेळी उद्धव ठाकरे यांनी घेतला. उद्धव ठाकरे म्हणाले की, बाळासाहेबांची नकली संतान म्हणालात, तुमचा आत्मा सैतानाला विकलात की काय, सगळं अदानीला विकलात तसे? बाळासाहेबांच्या आत्म्याला काय वाटले असेल? 2014 मध्ये बुडाला पंतप्रधानपदाची खुर्ची चिकटवण्यासाठी बाळासाहेबांच्याच शिवसेनेचा पाठिंबा घेतला होतात ना आणि नंतर एकनाथ खडसे यांना फोन करून युती तोडायला लावलीत. 2019 मध्ये शिवसेनाप्रमुखांच्या खोलीत शब्द देऊनही तो तोडलात. काय वाटले असेल तेव्हा बाळासाहेबांच्या आत्म्याला? चेल्याचपाटय़ांना पुढे करून गद्दारी करवून माझे सरकार पाडलेत तेव्हा बाळासाहेबांच्या आत्म्याला काय वाटले असेल?
मोदीजी, वानप्रस्थाश्रमात जा, पण माझ्या देशाची वाट लावू नका
मोदीजी, माझ्या आईवडिलांचा अवमान करताय. ही भाषा पंतप्रधानपदाला शोभणारी नाही. संपूर्ण जगात तुम्ही अब्रू घालवताय, असे उद्धव ठाकरे म्हणाले. त्यानंतर त्यांनी मोदींना एक विनंतीही केली. ते म्हणाले, मोदीजी, आता थोडा आराम घ्या. थोडं शांत रहा. डोक्यावर पतंजलीच्या रामदेव बाबांचे तेल घाला. कपालभाती करा. थोडा विलंब झाला तरी चालेल, पण अनुलोम विलोम करा. वानप्रस्थाश्रमाकडे तुमची पावले आता पडताहेत. हळूवार तिकडे मार्गस्थ व्हा. पण माझ्या देशाची वाट लावू नका.
गेल्या काही वर्षात मुसलमानांची लोकसंख्या वाढली अशी एक बातमी आली. त्याबद्दल मोदींचे कौतुक करायचे की विरोध करायचा हेच कळत नाही. कारण मोदींची दहा वर्षे राजवट होती. त्याच्या आधी महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांची पाच वर्षे आणि त्याआधी केंद्रात अटलजींचे सरकार होते. मग नेमकी कोणाची मते भाजपला हवीत?
राहुल गांधींनी अदानी अंबानींबद्दल बोलायचे का सोडले, टेम्पो भरून कितना माल उठाया असे मोदी म्हणतात. मग तो काळा पैसा जात असताना तुमची ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स काय करत होती. गद्दारांच्या ठेल्यावर लिंबू पाणी प्यायला गेली होती का? काळा पैसा राहुल गांधींना गेला असेल तर मोदींनी नोटबंदी केली होती तेव्हा ते कळले नाही का? म्हणजेच त्यांनी नोटबंदीच्या अपयशाची आज कबुली दिली.
देवेंद्र फडणवीस म्हणतात मोदींच्या इंजिनाला विकासाचे डबे आहेत. दहा वर्षे फक्त बोलताहेत आणि फक्त डबेच लागताहेत, पण त्या डब्यांना भ्रष्टाचाराची चाकेही लागताहेत. देशाने आता ठरवलेय की मोदींचे इंजिनच बदलायचे. त्यांचे इंजिन वाफा काढत नाही नुसत्या थापा मारतेय. द्या गुजरातला पाठवून…
जालनातील लाठीमाराच्या जखमा, वेदना मराठा समाज विसरलेला नाही
जालनातील मराठा आंदोलकांवर मिंधे सरकारच्या पोलिसांन केलेल्या अमानुष लाठीमाराच्या घटनेचा संदर्भही उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला. मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणासाठी केलेल्या उपोषण आंदोलनात महिला, वयोवृद्धही न पाहता पोलिसांनी त्यांची टाळकी फोडून टाकली. छर्रे घुसले होते त्यांच्या शरीरात. वरून फोन आला आणि त्यानंतर पोलिसांनी सैतानासारखा लाठीमार केला असे आंदोलकांनी सांगितले होते. मराठा बांधवांच्या त्या जखमा, वेदना अजूनही कुणी विसरलेले नाही, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List