भिमा कोरडीठाक; काठावरील गावांचा पाणीप्रश्न ऐरणीवर; मंगळवेढा तालुक्यात पाण्याचा प्रश्न बिकट
मंगळवेढा तालुक्यातून वाहणारी भीमा नदी कोरडी पडल्याने नदीकाठावरील गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे. दरम्यान, तालुक्याच्या दक्षिण भागात टँकर सुरू करून नागरिकांची तहान भागविली जात असतानाच, नदीकाठच्या भागात मात्र टँकर मिळणे मुश्किल झाले असल्याने पाण्याचा बिकट प्रश्न निर्माण झाला आहे.
मंगळवेढा तालुक्याच्या सीमेवरून भीमा नदी वाहते. या नदीतील पाण्याचा सोर्स उजनी धरण असल्याने धरण भरले तरच नदीत पाणी उपलब्ध होऊ शकते; अन्यथा नदीचे पात्र कोरडे ठणठणीत राहण्याची शक्यता असते. मागील दोन महिन्यांपूर्वी उजनी धरणातून सोलापूर शहरासाठी पाणी सोडण्यात आले होते. हे पाणी नदीपात्रातील कोप बंधाऱयात काही अंशी सोडल्याने आजपर्यंत नदीकाठावरील मंगळवेढा शहर, उचेठाण, बठाण, ब्रह्मपुरी, माचणूर, मुंढेवाडी, तामदर्डी, रहाटेवाडी, तांडोर, बोराळे, अरळी सिद्धापूर, नंदूर आदी गावांचा नळ पाणीपुरवठा सुरू होता. मात्र, मागील पंधरा ते वीस दिवसांपासून नदीच्या पात्रात चिमणीला पिण्याइतपतही पाणी नसल्याने प्राण्यांचे हाल होत आहेत.
माचनूर सिद्धेश्वर मंदिर परिसरात अनेक पक्ष्यांसाठी वसतिस्थान आहे. हे मंदिर भीमा नदीच्या काठी आहे. पाण्यावर विहार करणाऱया पक्ष्यांबरोबरच इतर पशू-प्राण्यांचे हाल होत आहेत. पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या चारापाण्याचा बिकट प्रश्न निर्माण झाला आहे. नागरिक पाण्यासाठी दाहीदिशा फिरतानाचे चित्र आहे. पाण्याअभावी शेतातील उभी पिके करपत आहेत. शेतकऱयांनी बँकांकडून कर्ज घेऊन ऊस, केळीची लागवड केली आहे. मात्र, पाण्याअभावी आता काय? या विवंचनेने शेतकरी ग्रासले आहेत.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोलापूर शहरासाठी शुक्रवारपासून (दि.10) उजनी धरणातून भीमेच्या पात्रात पाणी सोडणार असल्याचे सांगितले. यामुळे भीमा नदीपात्रात पाणी येणार आहे. मात्र, त्याचा उपयोग नदीकाठच्या शेतकऱयांना होणार नाही. कारण पाणी पुढे पोहचेपर्यंत वीज खंडित केली जाते, त्यामुळे पाण्याचा उपसा करता येत नाही. परिणामी नदीपात्रात पाणी असूनही त्याचा लाभ घेता येणार नाही.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List