प्रासंगिक – अक्षय ठेवते ती अक्षय्य तृतीया

प्रासंगिक – अक्षय ठेवते ती अक्षय्य तृतीया

>> प्रा. बी. एन. चौधरी

चैत्र-वैशाखातील रणरणत्या उन्हात खान्देशातील गावागावांत घराच्या दाराशी उभ्या असलेल्या झाडांना बांधलेल्या झोक्यावर बसून त्या घरातील लेकी, माहेरवाशिणी गाणं गुणगुणतात…
आथानी पैरी, तथानी पैरी,
पैरी झोका खाय वं.
पैरी तुटनी, खडक फुटना,
झुई झुई पानी व्हाय वं.
हे गाणं कानी पडलं म्हणजे आखाजीचा सण आलाय याची चाहूल लागते. आखाजी म्हणजेच अक्षय्य तृतीया. हा खान्देशी लोकांचा नववर्षाचा सण. या सणाला सासरी गेलेल्या लेकीबाळी माहेरपणाला माहेरी येतात. आपल्या मायेच्या माणसात येऊन सासरचा शीण घालवतात. झोक्यावर बसून झोके घेतात, गाणी गातात. मुलांच्या शाळांना सुट्टय़ा लागलेल्या असतात. ते मामाचा गाव डोक्यावर घेतात. घरातली सून, माहेरी आलेली लेक, नातवंडं, आप्तेष्ट, नातेवाईक यांनी घर भरलेलं असतं. पुरणपोळी, आंब्याचा रस, भजी, पापड आणि कटाची आमटी असा सुग्रास बेत असतो. अक्षय्य तृतीयेला पितरांची पूजा केली जाते. गौराईला पूजेचा मान असतो. भरलेले घट, माती, नवांकुर पुजले जातात. हा सृजनाचाच सोहळा असतो.
आता परिस्थिती बदलली, काळ कठीण आला आहे. आई-वडिलांना लेकीची काळजी वाटते. तिचा भाऊ मोठा लाडाचा आहे. तिला त्याची काळजी वाटते. दोघं भेटीचं निमित्त शोधतात. ती गरज आखाजी अर्थात अक्षय्य तृतीया पूर्ण करते. ती आई – वडिलांना निरोप पाठवते. भाऊ तिला न्यायला येतो. यातून नातेसंबंध दृढ होतात. काळानुसार सण-उत्सवाचं महत्त्व बदलत आहे. आज जगणं धावपळीचं आणि असुरक्षित होऊन बसलंय. माणसांच्या गरजा बदलल्या आहेत. नात्यांमध्ये कृत्रिमता आली आहे. सणासुदीला एकत्र येणारी माणसं सण आला तरी एकमेकांना टाळतात. सुरक्षित अंतर ठेवतात. मात्र आजही गावखेडय़ांत परंपरा म्हणून सण साजरे होतात. नाती जपली जातात. तोच आनंद, तोच जल्लोश दिसून येतो. आजही आखाजीला गावागावांत, गल्लीमोहल्ल्यात पत्त्यांचे डाव रंगतात. शहरांनी माणुसकी, रीतीभाती, परंपरा मोडीत काढल्या असल्या तरी गावखेडी ते जपत आहेत. कोरोना काळात शहरवासीयांना शहराने बाहेर काढलं तेव्हा गावखेडय़ांनी त्यांना मायेनं आपलं म्हटलं. आपल्यात सामावून घेतलं. म्हणून सण-उत्सवांचं महत्त्व अधिक वाढलं आहे. आता चित्रच बदललं आहे. गल्ल्या, रस्ते गजबजले आहेत. दुकानं ओसंडून वाहत आहेत. व्यवहार जोमात आहेत. पूर्वापार चालत आलेल्या परंपरा कोणत्या ना कोणत्या उद्देशाने सुरू झालेल्या असतात. तो उद्देश समजून घेतला तरच सण-उत्सव आनंदी होतील.
आखाजी म्हणजे अक्षय्य तृतीया. ज्या तृतीयेला केलेलं सर्व अक्षय राहतं ती अक्षय्य तृतीया. या सणाला पूजा, अर्चना हे तर कराच, पण त्यासोबत नात्यांना जपा. एकमेकांशी संपर्क ठेवा. एकमेकांचा सहवास संस्मरणीय करा. ज्येष्ठांचे चरणस्पर्श करा. आनंदी रहा. सण – उत्सव हे आनंदवृद्धीसाठी असतात. ते साजरे करताना आरोग्याची योग्य ती काळजी घ्या. सणांमुळे आपल्यावर कोणती आपत्ती यायला नको याचा विचार करण्याची ही वेळ आहे. सण-उत्सवात स्वतः सुरक्षित होऊन आपल्या कुटुंबाला सुरक्षित करणे हीच खरी कमाई आहे. कुटुंब सुरक्षित झालं की गाव, राज्य आणि देश आपोआप सुरक्षित होईल. ही वेळ एकमेकांना सावरायची, सांभाळून घ्यायची आहे. वर्षभरात आलेले वाईट अनुभव सण-उत्सवाच्या निमित्ताने विसरायचे असतात. ते मागे टाकायचे असतात. जीवनाला नव्याने भिडायचे असते. जगण्यात उत्सव करायचा असतो. सण-उत्सव त्यासाठीच तर असतात. ते आनंदी, अक्षर करू या!
सण आखाजीचा आला,
लेकी आल्या माहेराला.
गेला झोका आभायाले,
आंबा आला बहराला !

[email protected]

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘हा निवडणूक आयोगाचा अतिशय नीच खेळ’, उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप ‘हा निवडणूक आयोगाचा अतिशय नीच खेळ’, उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. महाराष्ट्रात लोकसभेच्या पाचव्या आणि शेवटच्या...
उद्धव ठाकरे प्रचंड संतापले, मतदानाच्या दिवशीच निवडणूक आयोगावर गंभीर आरोप
‘त्या’ निवडणूक प्रतिनिधी किंवा अधिकाऱ्यांची नावे शिवसेना शाखेला कळवा, उद्धव ठाकरे यांचं नागरिकांना आवाहन
आईसोबत फिरते जग, आराध्या बच्चन कधी जाते शाळेत?, ऐश्वर्या राय हिच्याकडून मोठा खुलासा, म्हणाली..
‘कॉन्स्टेबल मंजू’ मालिकेत सेलिब्रिटी किरण गायकवाडची एण्ट्री
मतदान न करणाऱ्यांवर भडकले परेश रावल; म्हणाले “अशा लोकांचा टॅक्स..”
‘ती’ गोष्ट लहानपणापासून मनावर कोरून ठेवलीय; मतदानानंतर मिलिंद गवळी यांनी शेअर केली पोस्ट