पराभव समोर दिसताच खेकडा चवताळला, मिंधे गटाचे तानाजी सांवत यांच्या कार्यकर्त्याने शिवसैनिकाला भोसकले!

पराभव समोर दिसताच खेकडा चवताळला, मिंधे गटाचे तानाजी सांवत यांच्या कार्यकर्त्याने शिवसैनिकाला भोसकले!

धाराशिव मतदारसंघात पराभव समोर दिसत असल्यामुळे ‘खेकडा’ फेम मंत्री गद्दार तानाजी सावंत बिथरले आहेत. याच वैमनस्यातून भूम तालुक्यातील पाटसावंगी येथे सावंतांच्या कार्यकर्त्याने शिवसैनिकाला मतदान केंद्राच्या आवारातच भोसकले. या कार्यकर्त्याचा घटनास्थळावरच तडफडून मृत्यू झाला. या घटनेचा मतदानावर कोणताही परिणाम होऊ नये म्हणून पोलिसांनी चक्क हा हल्ला प्रेमप्रकरणातून झाल्याचा जावईशोध लावला. एवढेच नाहीतर सावंतांची चाटुगिरी करत मतदान केंद्राच्या आवारात काहीच घडले नाही असा दावा तर केलाच पण रात्री उशिरापर्यंत गुन्हाही नोंदवला नाही. या घटनेची सखोल चौकशी करून अपराध्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केली आहे.

धाराशिव मतदारसंघात मंगळवारी मतदान घेण्यात आले. मोदीविरोधाचे वारे धाराशिवमध्येही वाहत आहेत. महाविकास आघाडीचे ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना मिळणारा उदंड प्रतिसाद पाहून तानाजी सावंतांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. या विमनस्क अवस्थेतच त्यांनी राजेनिंबाळकर यांच्यावर अर्वाच्च शब्दांत टीका केली. सावंत यांच्याबरोबरच त्यांचे चेलेचपाटेही बिथरले आहेत. त्याचेच पडसाद आज भूम तालुक्यातील पाठसावंगी येथे बघायला मिळाले.

भूम तालुक्यातील पाठसावंगी येथे दोन मतदान केंद्र आहेत. जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्रावर सकाळी सात वाजता मतदान सुरू झाले. मतदान सुरू असतानाच तानाजी सावंत यांचा कार्यकर्ता गौरव उर्फ लाल्या अप्पा नाईकनवरे हा तेथे आला. मतदान केंद्रावर असलेला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा कार्यकर्ता भारत पाटील याच्याशी त्याने वाद घातला. हे भांडण सोडवण्यासाठी शिवसैनिक समाधान नानासाहेब पाटील (31) आणि शंकर शरद शिंदे पाटील हे मध्ये पडले. थोडी बाचाबाची झाली. इतरांनी मध्यस्थी केल्याने हा वाद तेथेच थांबला. समाधान पाटील, शंकर शिंदे हे मतदान केंद्राच्या आवारातून बाहेर पडत असतानाच घरातून चाकू घेऊन आलेल्या गौरवने हल्ला केला. या हल्ल्यात समाधान रक्तबंबाळ अवस्थेत तेथेच पडला. या घटनेमुळे मतदान केंद्रावर एकच अफरातफर उडाली.

पोलिसांनी मृत समाधानला बार्शीला हलवले
रक्तबंबाळ अवस्थेत असलेल्या समाधानचा घटनास्थळावरच मृत्यू झाला. परंतु या घटनेचे मतदार संघात पडसाद उमटू नयेत म्हणून पोलिसांनी समाधानला तातडीने बार्शीला हलवले. त्यानंतर भूमचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांनी वैयक्तिक कारणातून ही घटना घडली असून राजकारणाशी त्याचा काही संबंध नसल्याचे पत्रक काढले. हल्ला केल्यानंतर गौरव कुटुंबासह पोलिसांच्या डोळ्यादेखत फरार झाला. परंतु तानाजी सावंतांच्या दबावामुळे पोलिसांनी हाताची घडी घातली. यामुळे पोलिसांच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे.

महाविकास आघाडीचे नेते धावले
घटनेची माहिती मिळताच मतदान सुरू असतानाही ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी बार्शी येथे रुग्णालयात जाऊन समाधानच्या कुटुंबाची भेट घेतली. जखमी शंकर शिंदेलाही ते भेटले. माजी आमदार राहुल मोटे, ज्ञानेश्वर पाटील हे पाठसावंगीत दाखल झाले. निवडणूक निरीक्षकही आले. शिवसेना संपर्कप्रमुख सुनील काटमोरे यांनीही मतदान केंद्राला भेट दिली. त्यांच्यासोबत नानासाहेब पाटील, विधानसभा प्रमुख प्रल्हाद आडागळे, शिवसेना भूम तालुकाप्रमुख अ‍ॅड.श्रीनिवास जाधवर, बाळासाहेब नाईकवाडी उपस्थित होते.

पोलिसांचा जावईशोध
धाराशिवचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी पाठसावंगीत आले. हा हल्ला प्रेम प्रकरणातून घडला असल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले. मात्र गावकर्‍यांनी हे म्हणणे फेटाळून लावले आणि हल्लेखोराला तातडीने अटक करून कारवाई करण्याची मागणी केली.

शिवसैनिक असलेला समाधान पाटील हा मध्यमवर्गीय कुटुंबातील असून गावात त्याचे मावळा नावाचे छोटेसे हॉटेल आणि किराणा दुकान आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;