या निवडणुकीत जनतेचा निर्णय हा बारामतीकरांच्याच नाही तर महाराष्ट्राच्या हिताचा – शरद पवार
ही निवडणूक देशात लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी महत्त्वाची आहे. देशाला नवीन रस्ता दाखवण्याची गरज आहे. त्यामुळे ही निवडणूक महत्वाची आहे. भाजपच्या हातात देशाची सत्ता आहे. संपूर्ण देशाचे राज्य दिल्यानंतर देखील ज्याप्रकारे ते निर्णय घेतात यावर देश नाराज असे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराच्या सांगता सभेत बोलताना म्हटले. बारामती येथे शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराच्या सांगता सभेत माजी गृहमंत्री अनिल देशमुख, सुनील केदार, डॉ. अमोल कोल्हे, आमदार रोहित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष भूषणराजे होळकर यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, नेते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सभेत बोलताना शरद पवार साहेब म्हणाले की, निवडणुकीच्या शेवटची सभा आपण दुसरीकडे घेत असतो. मात्र, आज सत्ता ज्यांच्या ताब्यात आहे, त्यांनी ती जागा घेतली. त्यामुळे आपण या ठिकाणी सभा घेत आहोत. ही निवडणूक अतिशय महत्वाची निवडणूक आहे. मध्यंतरी कन्हेरीच्या सभेत एका कोपऱ्यात एक अनओळखी माणूस उभा होता. माझ्या लक्षात आले की ते पत्रकार असावेत. त्यांना मी बोलावून घेतले आणि विचारले तर ते म्हणाले मी अमेरिकेतून आलो आहे. त्यांनी सांगितले की, अमेरिकेत भारताच्या लोकशाही पद्धतीच्या निवडणुकीबाबत मोठी उत्सुकता असते. त्यामुळे आम्ही या ठिकाणी आलो आहोत. त्यामुळे आज बारामतीच्या निवडणुकीबाबत अमेरिकेलाही चिंता आहे. एवढे महत्व तुमच्या लोकांच्या निर्णयावर असणार आहे असे शरद पवार म्हणाले.
पुढे ते म्हणाले की,आमदार रोहित पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांचे भाषण झाले. ते मीदेखील ऐकले. या तीनही भाषणामध्ये अनेक चांगले मुद्दे मांडले. तीनही उमेदवारांनी चांगली मुद्दे मांडली. आता जोपर्यंत आपण सर्वजण एक आहोत, तोपर्यंत बारामतीकरांना कोणीही धक्का लावू शकत नाही. त्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे. प्रश्न खूप आहेत. महागाई, शेती, रोजगारासह अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे या निवडणुकीत जनतेचा निर्णय हा बारामतीकरांच्याच नाही तर महाराष्ट्राच्या हिताचा होईल, असं यावेळी बोलताना पवार म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List