हा महाराष्ट्र तुम्हाला माती खायला लावल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरे यांचा भाजपला इशारा

हा महाराष्ट्र तुम्हाला माती खायला लावल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरे यांचा भाजपला इशारा

मी मराठी मातेचा व मराठी मातिचा आशीर्वाद घेऊन दिल्लीच्या हुकुमशाहीविरोधात, तख्ताविरोधात लढायला उभा राहिलो आहे. त्यामुळे आता हा महाराष्ट्र तुम्हाला माती खायला लावल्याशिवाय राहणार नाही, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केला आहे. महाविकास आघाडी व शिवसेनेचे धाराशिवचे उमेदवार ओमराजे निबांळकर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत भाषण करताना उद्धव ठाकरे यांनी भाजप व मिंधे गटाची सालटी काढली.

”मी आता बातम्यांमध्ये वाचतोय की मोदींना माझ्यावर प्रेम आलंय. हे कंस काय? मोदींचं प्रेम एवढे उतू गेलंय की त्यांनी शिवसेनाप्रमुखांचा मुलगा म्हमून माझ्याबद्दल आस्था आहे असं सांगितलं. मी हॉस्पिटमध्ये होतो तेव्हा ते माझी चौकशी करत होते. माझं एवढं विचित्र ऑपरेशन झालेलं होतं. मी खांद्याखालून हलू शकत नव्हतो. एका बाजूला तुम्ही चौकशी करत असताना तुमचे पाव मुख्यमंत्री व आमच्यातले गद्दार रात्री भेटी करत होते. माझी शस्त्रक्रीया झालेली असताना तुमचे चेले चपाटे काय करतायत ते कळलं नव्हतं का तुम्हाला? मोदीजी म्हणतात उद्धवजी तुमच्यावर संकट आलं तर मी तुमच्या पाठीशी उभा राहिन. मलाही मोदीजींना सांगायचे आहे मोदीजी तुमच्यावरही संकट आलं तर मी देखील तुमच्या पाठीशी उभा राहिन. पण तुम्ही जर संकट म्हणून महाराष्ट्रावर येत असाल तर स्वत:ला आवर घाला, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना दिला.

हिंदुहृदयसम्राट म्हणा

ते म्हणतात उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं, बाळासाहेबांचे विचार सोडले. बाळासाहेब बाळासाहेब काय, हिंदुहृदयसम्राट म्हणा, हिंदुहृदयसम्राट म्हणायला जीभ का अडखळते तुमची. त्यांचं तुमच्यावर कर्ज आहे हे माहित आहे ना तुम्हाला. त्याच बाळासाहेबांच्या खोलीत अमित शहा यांनी मला अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाचे आश्वासन दिले होते. तो शब्द का मोडला. वर मला खोटं ठरवायला निघालात. आता जनतेने ठरवायचे खोटं कोण बोलतोय आणि कोण खरं. मी इथे जुगार लावायला आलेलो नाही. भाजपने चारशेचा जुगार लावला आहे. समोरची जनता यांना जुगार वाटते. पण त्यांना माहित नाही ही निवडणूक जनतेने हातात घेतलेले आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

हे तर गजनी सरकार

मी मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं. कापसाला, सोयाबिनला भाव दिला होता. कोट्यवधींचा व्यवसाय महाराष्ट्रात आणला होता, जनतेला १० रुपयात जेवण दिलं होतं. यांनी गद्दारी करून माझे सरकार पाडले. मात्र गेल्या दहा वर्षात मोदीजींनी काय केले. शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट झालं नाही, घर मिळालं नाही. पिकविमा मिळालं नाही. 15 लाख मिळाले नाही. काहीच मिळालं नाही. हे मोदी सरकार नाही हे गजनी सरकार आहे. यांना दिलेले आश्वासन आठवत नाही. मात्र आता यांना धडा शिकवायची वेळ आली आहे. आता जनतेची पाळी आली आहे. आता तुम्ही मोदींना इथून सटकवून लावायचे आहे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी जनतेा केले.

आक्रमणकर्त्याला नेस्तनाबूत करू

”आज मोदीजींना एवढ्या सभा घ्याव्या लागत आहेत. आता महाराष्ट्राच्या प्रत्येक गल्लीबोळात जात आहेत ते. पण हा महराराष्ट्र जिंकू शकणार नाही. यांना वाटतं आज हिंदुहृदयसम्राट आमच्यासोबत नाहीत. पण या सगळ्या समोर बसेलल्यांच्या हृदयात हिंदूहृदयसम्राट आहेत. औरंगजेब देखील असाच महाराष्ट्रावर चालून आला होता. मात्र औरंगजेब हा 27 वर्ष या महाराष्ट्रात राहिला पण त्याला पुन्हा आग्रा बघता आला नाही. महाराष्ट्र धर्म काय आहे ते आक्रमणकर्त्याला नेस्तनाबूत करून दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा घणाघात उद्धव ठाकरे म्हणाले.

देश पेटून उठल्याशिवाय राहणार नाही

”मोदीजींना चारशेपारचा आकडा हा संविधान बदलण्यासाठी हवा आहे. एका सामान्य कुटुंबातील, दलित कुटुंबातील तरुणाने लिहलेलं संविधान यांना पटत नाही. हा यांचा महाराष्ट्राबद्दलचा आकस आहे. हे यांचे बुरसटलेले गोमुत्रधारी हिंदुत्व आहे. आम्ही हिंदू आहोत पण तुमच्यासारखे बुरसटेलेलं आमचे विचार नाही. आमचं हिंदुत्व मंदिरात घंटा बडवणारं नाही. तर देशद्रोह्याला बडवणारं आहे. एका सामान्य कुटुंबातल्या महाराष्ट्रातल्या तरुणाने घटना लिहली म्हणून हे घटना बदलत आहेत. पण ज्या दिवशी घटना बदलायचा प्रयत्न करतील तेव्हा देश पेटून उठल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;