अलंकापुरीतील इंद्रायणी नदीला जलप्रदूषण आणि जलपर्णींची बाधा
29 जून 2024 रोजी आळंदी मंदिरातून लाखो भाविकांच्या उपस्थितीत माऊलींच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान होणार आहे. त्यामुळे इंद्रायणी नदी स्वच्छ करण्याचे मोठे आव्हान पिंपरी चिंचवड महापालिकेवर आहे. अलंकापुरी येथून वाहणाऱ्या इंद्रायणी नदीला जलपर्णींचा विळखा पडला आहे. मात्र सामाजिक कार्यकर्ते, विविध सेवाभावी संस्थांनी इंद्रायणी नदी स्वच्छ करण्यासाठी कंबर कसून स्वच्छता मोहिम सुरू केली आहे.
‘इंद्रायणी नदीच्या प्रदुषण मुक्तीसाठी, एक पाऊल भावी पिढीसाठी’ असा संदेश देत इंद्रायणी नदी उगम ते संगम प्रदुषण मुक्त करण्यासाठी इंद्रायणी परिक्रमा अंतर्गत घाटावर इंद्रायणी नदी स्वच्छता अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. एकिकडे विविध सेवाभावी संस्था स्वच्छता कार्य वेगाने करीत आहेत. तर, दुसरिकडे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून इंद्रायणी नदीतील जलपर्णी पात्रातून बाहेर काढण्याचे कार्य संत गतीन सुरू आहे. “इंद्रायणी नदीवरील प्रदूषण रोखण्याच्या उपाय योजनांना गती देण्यात यावी. भाविकांचे श्रद्धास्थान स्वच्छ तसेच प्रदूषण मुक्त करण्यासाठी प्रथम प्राधान्य द्यावे,” अशी मागणी आळंदी जनहित फाउंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे.
आळंदी येथील स्मशान भूमी समोरील इंद्रायणी नदीतील जलपर्णी काढण्यासह परिसरात असलेले कचऱ्याचे साम्राज्य दूर करण्याची मागणी प्रवासी भाविक व्यक्त करीत आहेत. उगम ते संगम इंद्रायणी नदी जलपर्णी मुक्त करण्याची परिसरातील नागरीकांची मागणी आहे. त्यासाठी अधिक गतीने काम करण्याची गरज भाविकांनी व्यक्त केली. डुडुळगावं परिसरात पुढील काही दिवस काम करण्यात येणार आहे. त्यानंतर चिंबळी बंधारा ,केळगाव,आळंदी बंधारा नदी घाटावर जलपर्णी काढण्याचे काम सुरु आहे. “पावसाळा आणि आळंदी येथील पालखी सोहळ्याचे प्रस्थान या गोष्टींचा विचार करून पालखी सोहळ्यापूर्वी इंद्रायणी नदी परिसर स्वच्छ, जलपर्णी मुक्त करण्यात यावा. तसेच इंद्रायणी नदी वरील पुलाचे आळंदी येथे असलेला दुतर्फा सबवे वारकरी, भाविक, नागरिकांना सुरक्षित ये-जा करण्यासाठी स्वच्छता, देखभाल दुरुस्ती करून वापर योग्य ठेवण्यात यावा,” अशी मागणी आळंदी जनहित फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र घुंडरे पाटील यांनी केली आहे. “प्रदूषण मुक्त इंद्रायणी नदीसाठी काम करण्यासाठी नदी स्वच्छता अभियानात सर्वानी सहभागी व्हावे,” असे आवाहन आळंदी जनहित फाउंडेशन कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर यांनी केले आहे.
इंद्रायणी नदी स्वच्छता अभियानचे आयोजन आळंदी नगरपरिषद व नमामि इंद्रायणी प्रतिष्ठान, आळंदी जनहित फाउंडेशन, श्री आळंदी धाम सेवा समितीसह विविध सेवाभावी संस्थांच्या सहकार्याने केले जात आहे. रानजाई प्रकल्प देहूचे प्रमुख सोमनाथ आबा मुसुडगे यांच्या मार्गदर्शनात देहू येथे इंद्रायणी नदी स्वच्छता अभियानात विविध संस्थांचे पदाधिकारी, नगरसेवक,कार्यकर्ते, आळंदी ग्रामस्थ सहभागी होत असतात.
“पालखी सोहळा आणि येणारा पावसाळा या दृष्टीने विविध नागरी सेवा सुविधांचे कामास सुरुवात केली असून संबंधित विभाग प्रमुख यांना प्राधान्याने कामे हाती घेऊन वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत,” असे आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List