तुमच्यात हिंमत असेल तर जनतेच्या प्रश्नावर बोला! उद्धव ठाकरे यांचे अमित शहांना आव्हान
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शुक्रवारी विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ कणकवली येथे विराट सभा पार पडली. या सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्यावर सडकून टीका केली. शिवसेनेला नकली म्हणणाऱ्या बेअकली जनता पक्षाचे सरदार अमित शहा रत्नागिरीत येऊन आव्हान देऊन गेले. अरे, तुमच्यात हिंमत असेल तर जनतेच्या प्रश्नावर बोला. दहा वर्षे नुसतीच अंडी उबवत बसलाय. कोंबडीचोराला सोबत घेतले तरी अंड्यातून पिल्लू का बाहेर आले नाही, त्याच्यावर बोला, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दिले. तुमच्यापेक्षा खरंच कोंबडं बरं. अंडे उबवले तर पिल्लू तरी येतेय. तुम्ही दहा वर्षे खुर्च्य उबवताय तरी त्यातून काही बाहेर पडत नाही. ढेकणं झाली असतील खुर्चीमध्ये. तरीही लाज नाही, अशी खिल्लीही उद्धव ठाकरे यांनी उडवली.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे शिवसेना उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ कणकवली येथे आज जाहीर सभा झाली. त्या सभेला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी अमित शहांनी राम मंदिर, स्वातंत्र्यवीर सावरकर, काँग्रेसचा जाहीरनामा यावरून दिलेल्या आव्हानांचा समाचार घेतला.
बाळासाहेब, बाळासाहेब काय? हिंदुहृदयसम्राट बोला
अयोध्येत राम मंदिर बांधले ते चांगले केले की वाईट हे उद्धव ठाकरे यांनी सांगावे, असे अमित शहा म्हणाले होते. त्याला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, राम मंदिर बांधले हे चांगलेच केले, पण भाजपची हिंमत नव्हती म्हणून त्यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला होता. बाळासाहेबांबद्दल बोलताना भान ठेवा अशी तंबी मोदी-शहांना देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, बाळासाहेब बाळासाहेब काय? ते काय तुमच्या वर्गात होते? हिंदुहृदयसम्राट बोला. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे बोला. हिंदुहृदयसम्राट बोलायला जीभ अडखळत असेल तर ती सरळ कशी करायची तर कोकणातीलच नव्हे संबंध देशातील जनता जाणते, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला.
मी मुख्यमंत्री होण्याच्या आधीही अयोध्येला गेलो होतो आणि मुख्यमंत्री झाल्यानंतरही गेलो. तुम्ही काढाल तो मुहूर्त हे आम्हाला पटत नाही. श्रीराम आम्हाला बोलवतील तेव्हा जाऊच, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे बजावले. मी अयोध्येला जाऊन आलो, तुम्ही अजून भवानीमातेच्या मंदिरात का नाही गेलात? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांना करताच उपस्थितांनी जय भवानी जय शिवाजी अशा घोषणांनी परिसर दुमदुमला. भाजपवाल्यांची कढी पातळ व्हायला हवी इतक्या जोरात घोषणा द्या, असे उद्धव ठाकरे यांनी सांगताच भवानीमातेचा पुन्हा गगनभेदी जयघोष झाला. मला आव्हान देता मंदिरावरून, २२ जानेवारीला राम मंदिराच्या उद्घाटनावेळी शंकराचार्यांना न घेता भ्रष्टाचायांना घेऊन बसला होतात तेव्हा? असा खोचक सवालही उद्धव ठाकरे यांनी केला.
7 तारखेला बटण दाबून 20तारखेला मुंबईत या, चाकरमान्यांना आवाहन
उन्हाळी सुट्टीनिमित्त मुंबईकर चाकरमानी कोकणात गेले आहेत. उद्धव ठाकरे यांनी त्यांनाही यावेळी आवाहन केले. ते म्हणाले की, महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी महाराष्ट्रभर फिरतोय. कोकण तर शिवसेनेच्या हक्काचे आहे. शिवसेनेचे कोकणशी नाते मोदी-शहांसारखे नाही. आपला बहुत पुराना रिश्ता है, असे सांगतानाच, येत्या ७ मे रोजी कोकणात मतदान झाल्यानंतर २० मे रोजी मुंबईत या.
अमित शहांवर यावेळी उद्धव ठाकरे यांनी चांगलेच तोंडसुख घेतले. शिवसेनेला नकली म्हणणाऱ्या बेअकली जनता पक्षाचे नेते अमित शहा आज रत्नागिरीत पचकून गेले. जे शिवसेनेला नकली म्हणतात ते बेअकली नाहीतर काय? आजपर्यंत भाजपाला मी भेकड जनता पक्ष म्हणत होतो तरी लाज नाही. भाकड म्हणतो तरी लाज वाटायला तयार नाही. कमळाबाई म्हणतो तरीही काय फरक नाही. म्हणून आज नवीन नाव दिले. आता बेची बाराखडी किती म्हणायची. मला बाराखड्या येतात, पण शांत, संयमी असा शिक्का बसल्याने मी बोलू शकत नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
शुभ बोल नाऱ्या… आडवा आलास तर गाडूनच टाकतो
उद्धव ठाकरे यांनी यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या धमकीला जोरदार प्रत्युत्तर दिले. ‘आज मी कोकणात येणार म्हटल्यानंतर कोणीतरी मला धमकी दिली. (यावेळी उपस्थितांमधून कोंबडीचोर… असा जोरदार आवाज आला) मराठीत एक म्हण आहे. शुभ बोल रे नाऱ्या. मी येणार म्हटल्यानंतर कसे येतात बघतो म्हणाला. अरे, हा बघ मी येऊन उभा आहे. तू आडवा येच तुला गाडूनच पुढे जातो. अरे तुला लाज वाटली पाहिजे. दोन- तीन वेळेला कोकणात येऊन तुला आडवा केला. माझ्या घराजवळ उभा राहिलास तिकडे साफ करून टाकला. तरीही लाज नाही लज्जा नाही. फक्त बडबडतो. म्हणूनच म्हटले शुभ बोल रे नाऱ्या,’ अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List