ठेकेदार संस्थेला नोटीस, एप्रिल 2023 पासून प्रतिदिन 5 हजार दंड आकारण्याचे आयुक्तांचे आदेश
बुरुडगाव कचरा डेपोत 100 टन क्षमतेच्या खत प्रकल्पातील कचऱ्याला वारंवार आग लागण्याची घटना घडत आहे. या प्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळाने वायू प्रदूषण झाल्याचा अहवालही दिला आहे. महापालिकेने वारंवार सूचना देऊनही व पाण्याची व्यवस्था उपलब्ध करूनही सुरक्षेबाबत ठेकेदार संस्थेने उपाययोजना न केल्याने मागील महिन्यात पुन्हा आग लागली. त्यामुळे घनकचरा व्यवस्थापन विभागाने दिलेल्या प्रस्तावानुसार ठेकेदार संस्थेला नोटीस बजावून एप्रिल 2023 पासून प्रतिदिन 5 हजार रुपये दंड आकारण्याचे आदेश आयुक्त पंकज जावळे यांनी दिले आहेत.
बुरुडगाव येथील 100 टन क्षमतेच्या खतनिर्मीती प्रकल्पात मागील वर्षी एप्रिल महिन्यात मोठी आग लागली होती. वर्षभरानंतरही या आगीची धग कायम असल्याने व धुरामुळे वायूप्रदूषण होत असल्याचा अहवाल प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिला होता. त्यानंतरही उपाययोजना न केल्याने 19 एप्रिल रोजी दुपारी पुन्हा आग लागली. हा प्रकल्प चालवणाऱ्या मे. मायोव्हेसल्स अॅन्ड मशीन्स या संस्थेने सुरक्षेविषयक उपाययोजना करणे आवश्यक होते. तसे न केल्याने ही आग लागल्याचे घनकचरा विभागाने म्हटले आहे. मनपाने या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करुन देखील सदर संस्थेने उपाययोजना केलेल्या नाहीत. हा प्रकार मनपाची फसवणूक व नुकसान करणारा आहे. करारनाम्यातील अटीनुसार याबाबत प्रतिदिन 5 हजार रुपये दंड आकारण्याची तरतूद आहे. त्यानुसार एप्रिल 2023 पासून दंड आकारणी करण्याचे आदेश आयुक्त पंकज जावळे यांनी दिले आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List