मुलांचे अपहरण करून विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, एकाच कुटुंबातील तिघांना बेड्या
गरीब कुटुंबातील मुलांचे अपहरण करून त्यांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात जालना पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेने एकाच कुटुंबातील तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. तसेच त्यांच्या ताब्यातून सहा वर्षाच्या मुलीची सुटकाही केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन वर्षांपूर्वी आईचे निधन झालेल्या व व्यसनाधीन वडील असलेल्या 6 वर्षाच्या नेहाचा सांभाळ तिची आजी सुशिलाबाई शिंदे (रा. बानेगाव, ता. घनसावंगी) या बसस्थानकावर भिक्षा मागून करत होती. 25 एप्रिलला पहाटे अडीच वाजता आजीजवळ झोपलेल्या नेहाचे अपहरण करण्यात आले होते. आजीच्या तक्रारीवरून सदर बाजार पोलीस स्थानकामध्ये अज्ञातांविरुद्ध भादवि कलम 363 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी सदर गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांच्याकडे वर्ग केला. मुलीचे अपहरण झाले तेव्हा बसस्थानक परिसरात अंधार होता. त्यामुळे सीसीटीव्हीही बंद होते. मात्र जालना रेल्वे स्थानकावरील एका सीसीटीव्हीमध्ये तीन संशयित एका मुलीला घेऊन रेल्वेत बसताना कैद झाले आणि तपासाला दिशा मिळाली.
सात दिवसात पोलिसांनी पूर्णा, नांदेड रेल्वे स्थानकासह शहागड येथील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता तिन्ही संशयित यात दिसले. त्यानंतर पोलिसांनी वेगाने चक्र फिरवले. सदर मुलीला पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथे विक्रीसाठी आणले जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी आरोपींना रंगेहाथ पकडण्यासाठी सापळा रचला. आरोपी समोर येताच पोलिसांनी त्यांच्यावर झडप घातली आणि मुलीची सुखरुप सुटका केली. पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
महादेव एकनाथ सकडे (वय – 39), शोभा महादेश सकडे (वय – 37) आणि राजेंद्र महादेव सकडे (वय – 21) अशी अटक करण्यात आलेल्या अपहरणकर्त्यांची नावे आहेत. अपहरणकर्ते एकाच कुटुंबातील पती,पत्नी आणि मुलगा असून ते बीड जिल्ह्यातील घोडका राजुरी गावचे रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List