इंस्टाग्राम रील्स करताना विद्यार्थिनीला ट्रेनची धडक; जागीच मृत्यू
उत्तराखंडमधील रुरकी येथे रेल्वे ट्रॅकजवळ 20 वर्षीय विद्यार्थिनी तिच्या मोबाइल फोनवर इंस्टाग्राम रीलचे चित्रीकरण करत असताना ट्रेनने धडक दिली. ही घटना गुरुवारी घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुरकीच्या शिवपुरम भागात ही घटना घडली. वैशाली असे या तरुणीचे नाव असून, ती तिच्या मैत्रिणीसोबत रीलचे चित्रीकरण करत असताना तिला ट्रेनची धडक बसली. तिच्या सोबतच्या मित्राने वैशालीच्या घरी जाऊन कुटुंबीयांना या दुर्घटनेची माहिती दिली.
रुरकी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगची विद्यार्थिनी वैशाली हरिद्वारच्या हरिपूर टोंगिया गावची असून ती रुरकीमध्ये तिच्या मामासोबत राहत होती.
2 मे रोजी वैशाली रेल्वे ट्रॅकजवळ रीलचे चित्रीकरण करत असताना बाडमेर एक्स्प्रेस खाली ती आली. तिचा जागीच मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले.
गंगनाहरचे स्टेशन हाऊस ऑफिसर (एसएचओ) गोविंद राम म्हणाले, ‘घटना घडली तेव्हा मुलगी आणि तिचा मित्र रेल्वे ट्रॅकजवळ रील चित्रीकरणात व्यस्त होते. मुलींच्या नातेवाईकांना माहिती देण्यात आली आणि मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला’.
या घटनेनंतर हरिद्वार पोलिसांनी लोकांना रील्स तयार करताना सुरक्षा घेण्याची विनंती केली.
‘सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी तरुण-तरुणी रोज धोकादायक रिल्स बनवून आपला जीव गमावत आहेत. तुम्ही अशी चूक करता का?’ हरिद्वार पोलिसांनी मायक्रोब्लॉगिंग साइट X वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
गेल्या वर्षी, अशाच एका घटनेत, छत्तीसगडच्या बिलासपूर जिल्ह्यातील एका महाविद्यालयात एका 20 वर्षीय व्यक्तीचा त्याच्या मित्रांसह इंस्टाग्राम रीलचे चित्रीकरण करताना पडून मृत्यू झाला होता.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List