रुग्णाच्या नातेवाईकाकडून परिचारिकेला मारहाण, कुर्लाच्या भाभात ‘काम बंद’ आंदोलन
पालिकेच्या कुर्ला भाभा रुग्णालयात बुधवारी रात्री एका परिचारिकेला रुग्णाच्या नातेवाईकाकडून मारहाण झाल्याचा तीव्र निषेध करीत आज सकाळी रुग्णालयातील सर्व परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱयांनी जोरदार घोषणाबाजी करीत ‘काम बंद’ आंदोलन केले. यामुळे ऐन सकाळच्या सुमारास आरोग्य सेवा कोलमडली. अखेर कुर्ला भाभा रुग्णालयाचे मेडिकल सुप्रिटेंडंट यांच्या उपस्थितीत झालेल्या कर्मचारी प्रतिनिधींच्या बैठकीत रुग्णालायात आवश्यक सुरक्षा व्यवस्था देण्याच्या आश्वासनानंतर दोन ते तीन तासांनी आरोग्य सेवा पूर्ववत झाली.
कुर्ला भाभा रुग्णालयात काल रात्री साफसफाईचे काम सुरू असताना एका रुग्णाचे नातेवाईक त्या ठिकाणी आले. तेव्हा या ठिकाणी काम करणाऱया परिचारिकेने त्यांना काही वेळ थांबण्यास सांगितले. मात्र परिचारिकेचे ऐकून न घेता दमदाटी करीत संबंधित रुग्णाच्या नातेवाईकाने परिचारिकेच्या कानशिलात लगावली. या घटनेमुळे परिचारिका-आरोग्य कर्मचाऱयांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला. याबाबत प्रशासनाला माहिती देऊनही सकाळपर्यंत कोणतीही दखल घेतली गेली नसल्याने परिचारिका-कर्मचाऱयांनी सकाळी 7.30 वाजताच्या डय़ुटीपासून ‘काम बंद’ आंदोलन सुरू केले. मात्र याची माहिती नागरिकांना नसल्याने या ठिकाणी उपचारासाठी येणाऱया रुग्णांची गर्दी वाढली. दरम्यान, सर्वच परिचारिका-कर्मचाऱयांनी रुग्णालयात धाव घेत जोरदार घोषणाबाजी करीत मारहाणीचा निषेध केला. मारहाण करणाऱया नातेवाईकावर एफआयआर नोंदवून कारवाई करण्याची मागणी या वेळी करण्यात आली.
दरम्यान, मारहाणीच्या घटनेची दखल घेत दोषींवर कठोर कारवाई व्हावी, सुरक्षा रक्षकांची नेमणूक करावी यासाठी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम व चिटणीस अजय राऊत यांनी अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे यांना पत्र दिले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List