ऋतुराजला बळीचा बकरा बनवला; श्रीकांत बीसीसीआयवर बरसले
आयपीएलमध्ये धावांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावणाऱ्या ऋतुराज गायकवाडकडे टी-20 वर्ल्ड कप संघनिवडीत दुर्लक्ष करणाऱ्या बीसीसीआयवर माजी सलामीवीर कृष्णाम्माचारी श्रीकांत अक्षरशः तुटून पडले आणि त्यानी संघ निवडीत बीसीसीआयने पक्षपातपणाचा कहर करत काही लोकांना खूश करण्यासाठी योग्य खेळाडूंना बळीचा बकरा केल्याचा आरोपही केला.
आयपीएलमध्ये 509 धावा करणारा ऋतुराज गायकवाड हा वर्ल्ड कप संघात असायलाच हवा होता. त्याने यंदा आयपीएलमध्येच नव्हे तर ऑस्ट्रेलियाविरुद्धही शतक झळकावले होते. तरीही त्याच्याकडे दुर्लक्ष केले गेले. शुबमन गिल आऊट ऑफ फॉर्म असूनही त्याला राखीव संघात ठेवण्याचा कारनामा बीसीसीआयच्या निवड समितीने का केला, असा सवालही त्यांनी केला. गिल अयशस्वी असूनही त्याला संघात स्थान मिळते. कसोटी, वन डे आणि टी-20त खराब कामगिरी केल्यानंतरही तो संघात खेळू शकतो. संघ निवडीत खूप मोठा पक्षपातपणा करण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर रिंकू सिंहला वगळल्याबद्दलही त्यांनी संघ निवडीला बकवास संघ निवड असल्याचा शिक्का मारला. अत्यंत संघर्षपूर्ण सामन्यातही रिंकूने अफलातून कामगिरी केली आहे. हे आपण दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत पाहिले आहे. निवड समितीचा निष्काळजीपणा अत्यंत वाईट आहे. त्यांनी काही लोकांना प्रसन्न करण्यासाठी योग्य खेळाडूंना बळीचा बकरा बनवल्याचा गंभीर आरोपही केला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List