बलात्काऱ्याला देशातून पळून जाण्यास मदत केली हीच मोदी गॅरंटी! राहुल गांधी यांचा जोरदार हल्ला
माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांचा नातू प्रज्वल रेवण्णाच्या सेक्स स्कँडलवरून राजकारण चांगलंच तापलं असून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज कर्नाटकातील सभांमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर जोरदार हल्ला चढवला. मास रेपिस्टला हिंदुस्थानातून पळून जाण्यास मदत केली हीच मोदी गॅरंटी आहे, असा निशाणा राहुल गांधी यांनी साधला.
प्रज्वल रेवण्णाने 400 महिलांवर बलत्कार केला. सेक्स स्कँडल नव्हे हे ‘मास रेप’चे प्रकरण आहे. हे सगळं माहिती असूनही मास रेपिस्ट प्रज्वलसाठी पंतप्रधान मोदी कर्नाटकात जाहीर सभांतून मते मागत होते. हा महिलांचा अपमान असून बलात्काऱ्याला मदत करण्याचे पाप करणाऱ्या मोदी, अमित शहा आणि भाजपच्या प्रत्येक नेत्याने देशातील महिलांची हात जोडून, त्यांच्यापुढे मान झुकवून माफी मागायला हवी.
प्रज्वल रेवण्णा जर्मनीत पळून गेल्याने मोदी सरकारची गोची झाली आहे. या प्रकरणावरून चौफेर टीका होऊ लागली आहे. दरम्यान, प्रज्वलविरुद्ध लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली असून कर्नाटकच्या प्रचारात हे प्रकरण सध्या गाजत आहे. आज शिवमोगा, रायचूर येथील सभा तसेच पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी यांनी मोदी व भाजपला लक्ष्य केले.
रेवण्णाला पंतप्रधान अटक करू शकले असते, पण त्यांनी त्याला देशातून पळून जाऊ दिले. आता मोदींना कर्नाटकात येण्याची भीती वाटते, म्हणूनच त्यांनी येथील सर्व जाहीर सभा रद्द केल्या आहेत. पण प्रिय मोदीजी, कर्नाटकातून पळून जाऊ नका, प्रज्वल रेवण्णाबद्दल सर्वांना सांगा, असे आव्हान रायचूर येथील सभेत राहुल गांधी यांनी मोदी यांना दिले.
भाजपच्याच एका नेत्याने शहा यांना पत्र लिहून प्रज्वल महिलांवर बलात्कार करत असल्याचे कळवले होते. जर अमित शहांना हे माहीत होते, तर पंतप्रधानांनाही त्याची माहिती दिली गेली असेल. या पीडितांमध्ये अल्पवयीन मुलीही होत्या. हे सर्व माहिती असूनही कारवाई झाली नाही याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. याला पाठीशी घातल्याबद्दल मोदी आणि शहांना कर्नाटकातील, देशातील प्रत्येक महिलेला उत्तर द्यावे लागेल, अशी टीका राहुल यांनी केली.
रेवण्णासाठी लुकआऊट नोटीस
रेवण्णासाठी एसआयटीकडून जगभरातील सर्व इमिग्रेशन केंद्रांवर लुकआऊट नोटीसही जारी करण्यात आली आहे. दरम्यान, राजनैतिक पासपोर्टधारकाला जर्मनीसाठी वेगळा व्हिसा लागत नाही. आम्ही त्याला व्हिसा दिलेला नाही. कोर्टाने आदेश दिल्यावरच पासपोर्ट रद्द करता येईल, असे परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.
प्रज्वलचे काका एच.डी. कुमारस्वामी यांनी कार्तिकला उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी मलेशियाला पाठवल्याचा दावा केला होता. त्याचा शिवकुमार यांनी इन्कार केला. पेन ड्राइव्हची चिंता करण्यापेक्षा भाजप नेत्यांनी तसेच कुमारस्वामी व देवेगौडा यांनी पीडित महिलांची भेट घेऊन त्यांचे अश्रू पुसावेत, असे शिवकुमार म्हणाले.
एच.डी. रेवण्णा याची अटकपूर्व जामिनासाठी धावाधाव
कथित सेक्स स्कँडल आणि पेन ड्राइव्हमधील 2972 क्लिप व्हायरल झाल्यामुळे भयभीत झालेल्या प्रज्वलने हसन मतदारसंघातील मतदान झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी जर्मनीला पळ काढला आहे. एच.डी. रेवन्ना याच्यावर अटकेची टांगती तलवार असून अटकपूर्व जामिनासाठी त्याने अर्ज केला आहे.
व्हीडीओ उघड करणारा रेवण्णाचा ड्रायव्हर बेपत्ता
रेवण्णाने महिलांचा लैंगिक छळ करून बनवलेले व्हीडीओ व्हायरल झाले होते. हे व्हीडीओ आपणच उघड केल्याचा दावा करणारा त्याचा वाहनचालक कार्तिक अचानक गायब झाला आहे. त्यानेच हे व्हीडीओ असलेला पेन ड्राइव्ह भाजप नेते देवराजे गौडा यांना दिल्याची कबुली दिली होती.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List