आभाळमाया – ‘सन’ताप!
हा लेख लिहीत असताना बाहेर ऊन ‘मी’ म्हणतंय. पंख्याचा वारा गरम येतोय. ‘एसी’मधून बाहेर पडलं तर ‘ओव्हन’मध्ये गेल्यासारखी अवस्था. खिडकीबाहेरच्या उंबराच्या झाडावरचे चार-पाच वेगवेगळे पक्षी तहानेने चोच वासून बसलेले. त्यांच्यासाठी पाणी ठेवताच, सगळे एकदम आले. बातम्यांमध्येही ‘हीट वेव्ह’ असल्याचं सांगितलं जात होतंच. शिवाय मुंबईसारख्या समुद्राकाठच्या शहरात दमट हवेमुळे आणखी गरम होतं. कारण आर्द्रता (ह्युमिडिटी) वाढते.
आता याचा ‘आभाळमाया’शी काय संबंध? हे तर सारं पृथ्वीवर घडतंय. परंतु पृथ्वीसुद्धा विराट अवकाशाचाच एक भाग आहे हे विसरून कसं चालेल? सूर्यमालेतला हा एकमेव हवा-पाणी असलेला, सजीव सृष्टीने बहरलेला ग्रह आहे. पृथ्वीवरचा निसर्गाचा समतोल लाखो वर्षांच्या काळात अनेक कारणांनी बिघडलाय. त्याला काही नैसर्गिक, तर गेल्या दोनशे वर्षांतली मानवनिर्मित कारणंसुद्धा आहेत. प्रदूषण, ग्लोबल वॉर्मिंग आणि त्यावरच्या चर्चा आपण नेहमीच ऐकतो. त्यापैकी काही गोष्टींवर ताबा मिळवता येईल. परंतु त्सुनामी, चक्रीवादळं, दुष्काळ अशा अनेक नैसर्गिक आपत्ती आपल्या आवाक्याबाहेरच राहणार. अवकाशात कोसळू शकणारे अशनी किंवा प्लेट टॅक्टॉनिकच्या हालचालीमुळे होणारे भूपृष्ठाrय बदल अशा कितीतरी गोष्टी पृथ्वीवासीयांना आव्हानं देत असतात.
उष्णतेची लाट अर्थातच सूर्याच्या प्र‘तापा’मुळे येणारे हे उघड आहे. आपल्या देशात आता उन्हाळा सुरू झालाय. त्यातही संपूर्ण मे महिना सूर्य महाराष्ट्रातल्या कुठल्या ना कुठल्या शहरात अगदी माथ्यावर येतो. तो ‘झीरो शॅडो डे’ किंवा शून्य सावलीचा दिवस आता जवळ येतोय. त्यातच बंगालच्या उपसागरात किंवा अन्यत्र कमी दाबाचे पट्टे निर्माण झाले की, ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊस वगैरे गोष्टी घडतच असतात.
गेल्यावर्षी कॅनडापासून इंग्लंडपर्यंत अनेक देशांनी तीक्र ‘हीट वेव्ह’ किंवा उष्णतेची लाट अनुभवली. अशी तापदायक लाट येते तेव्हा त्या भागाच्या वातावरणाच्या वरच्या भागात ‘हाय प्रेशर एरिया’ किंवा तीक्र दाबाचा विभागच तयार होतो. तो काही दिवस किंवा काही आठवडेसुद्धा टिकतो. असा प्रकार जास्त करून सागरी प्रदेशात होतो. कारण तिथे ह्युमिडिटी अथवा आर्द्रता अधिक असते. हिंदुस्थानला सुमारे 7000 आणि महाराष्ट्राला 700 किलोमीटरचा समुद्रकिनारा आहे. मुंबई, ठाणे शहर तर पश्चिम सागरातलं मोठं बेटच आहे. त्यामुळे हवेतली उष्णता वाढली की, दमटपणा वाढणं ओघानेच आलं.
अशा वातावरणात जर वरच्या भागात ‘तीक्र दाबाचा एरिया’ तयार झाला तर पृथ्वीच्या पृष्ठभागावर निर्माण झालेली उष्णता मधेच कोंडली जाते आणि तलखी वाढते. एप्रिलच्या मध्याला असाच अनुभव येत होता. एखाद्या भागात उष्णतेची ‘लाट’ असं तेव्हाच म्हटलं जातं, जेव्हा त्याच काळात एरवी असणाऱ्या तापमानात एकदम 5 अंशापर्यंत वाढ होऊन ती काही काळ तशीच टिकते. यासाठी नॉर्मल हवामानाचा पायाभूत काळ (बेस) 1960 ते 90 असा ठरवलेला आढळतो. उष्णतेच्या लाटेच्या अशा व्याख्याही स्थलकालानुसार बदलू शकतात.
युरोपात 28 अंश सेल्सियस तापमान म्हणजे उन्हाळा, तर आपल्याकडे आपण त्याला चांगलं हवामान म्हणू. ग्रीसमध्ये सतत तीन दिवस 39 अंशाच्या वर तापमान गेलं तर उष्णतेची लाट म्हणतात. अमेरिकेत 100 अंश फॅरनहाइट किंवा 37 अंश सेल्सियस तापमान सतत तीन दिवस असलं तर उष्णतेची लाट आल्याचं म्हटलं जातं. आपल्यासारख्या उन्हाळी देशात (ट्रॉपिकल कन्ट्री) 40 अंशावर पारा गेला आणि सातत्याने तीन ते पाच दिवस टिकला तर उष्णतेची लाट असल्याचं मानलं जातं.
अशी लाट आली की, माणसांच्या कार्यशक्तीवर परिणाम होतो. उष्णतेचे आजार होऊ शकतात. व्यापार-व्यवसायावर परिणाम होतात. विजेची मागणी अचानक वाढते. पाण्याची चणचण भासू लागते. सतत तहानेने कंठशोष अनुभवाला येतो. अशा वेळी उन्हात बाहेर पडायची वेळ आलीच तर डोक्यावर टोपी, कानात हलकासा कापूस, प्रसंगी मानेभोवती गुंडाळायला पंचा आणि डार्क गॉगल, तसंच सोबत पुरेसा पाणीसाठा, ऊर्जादायी खाणं ठेवणं गरजेचं ठरतं.
निसर्गाच्या अशा लहरी वारंवार अनुभवाला येतात. त्यांच्यासहच जगायचं ठरवलं की, तशा उपाययोजना करता येतात. लहान मुलं, वृद्ध यांची या काळात विशेष काळजी घ्यावी लागते. 2021 मध्ये 13 हजार शहरांना उष्णतेच्या लाटेचा तडाखा जगभर बसला होता. 1983 ते 2016 पर्यंत पृथ्वीच्या नेहमीच्या तापमानात वाढ झाली. अनेक ठिकाणचं तापमान 30 अंश सेल्सियसच्या पुढे गेलं. समुद्रसपाटीपासून 10 ते 25 हजार फुटांपर्यंत ‘हायप्रेशर एरिया’ तयार होण्याचे प्रकार वातावरणीय बदलातून वाढते आणि ती स्थिती पाच-सात दिवस टिकली तर उष्णतेच्या लाटा अनुभवाला येतात. दिवस उन्हाळ्याचे आहेत तेव्हा काळजी घेणं आपलं काम. एरवी सूर्य-पृथ्वी आपल्याला सुखद जीवन देतात. त्यांचा ‘प्रकोप’ कधीतरी सहन करावा लागला तर तयारी ठेवली पाहिजे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List