घटना बदलण्याविषयी मोदींचे खासदारच बोलतात, शरद पवारांनी डागली तोफ
पंतप्रधान मोदी यांनी कितीही म्हटलं की घटना बदलायचं नाही, तरीही त्यांचे खासदार मात्र घटना बदलायचं म्हणतात. मग मोदी आणि त्यांचे खासदार वेगवेगळं कसं काय बोलतात, अशी तोफ काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी डागली. शिराळ्यातील हातकणंगले मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरुडकर यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत ते बोलत होते.
या सभेला संबोधित करताना शरद पवार म्हणाले की, देशाची घटना बदलायची आहे असे मोदींचेच खासदार सांगतात. उत्तर प्रदेशमधील खासदार 400 पेक्षा जागा द्या, म्हणजे घटना बदलता येईल असे म्हणाले. मोदी घटना बदलायची नाही म्हणतात आणि खासदार असे वेगळे कसे काय बोलतात? आता पुन्हा सत्ता आल्यावर हे देखील करू शकतात, अशी टीका करतानाच महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त खासदार संसदेत गेले पाहिजेत असं आवाहन पवार यांनी केलं.
दरम्यान, या सभेत बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी संबोधित केले. ते म्हणाले की, ही निवडणूक आपण जिंकू शकतो. सत्यजित पाटील विजयी होतील हा विश्वास लोक देत आहेत. देशातील परिस्थिती पाहत असून शरद पवार यांना प्रतिसाद मिळत आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या मागे महाराष्ट्र आपली ताकद लावत आहे. मतदान झालेल्या ठिकाणी मविआच्या बाजूने निकाल लागेल असा अंदाज आहे. सत्यजित पाटील यांना शिरोळ, वाळवा तालुक्यात चांगले मताधिक्य मिळेल. ते पुढे म्हणाले की, मोदींमुळे नव्हे तर पवारांमुळेच एफआरपी वाढली आहे. शरद पवार कृषिमंत्री झाले तेव्हा ऊस उत्पादकांसोबत एक फॉर्म्युला तयार केला आहे. ज्यामुळे दरवर्षी एफआरपी वाढत आहे. भाजपने शेती उत्पादनाबाबत अडचणी आणल्या आणि कमी म्हणून शेती अवजारावर कर लावल्याचा टीकाही जयंत पाटील यांनी केली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List